भारतीय संस्कृतीत शक्ती आणि भक्तीचा पुरस्कार करणारे दैवत म्हणून पवनपुत्र हनुमानाकडे पाहिले जाते. आज (12 एप्रिल) मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाते आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या मनोभावे हनुमान जयंती साजरी केली जाते. गोव्यातही हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गोव्यात अनेक हनुमानाची जागृत मंदिरे आहेत. गोव्यातील लोकमानसानेही रामायण-महाभारत महाकाव्यांप्रमाणे अन्य धार्मिक ग्रंथातल्या हनुमानविषयक शौर्य, पराक्रमाच्या कथांनी त्याला देवत्व प्रदान केले. आज आपण या लेखाच्या माध्यमातून गोव्यातील हनुमानाच्या मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत...
गोवा कदंब राज्यकर्त्यांच्या ध्वजावर हनुमानाचे चित्र होते. मध्वाचार्यांनी वैष्णव संप्रदायात हनुमान पूजेला स्थान बहाल केल्याने गोव्यात ठिकठिकाणी हनुमान मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीत हिंदूची मंदिरे नष्ट केली. त्यांच्या राजवटीत हनुमानाच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याचे देखील सांगितले जाते. दरम्यान, पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीय निस्सीम भावाने भगवान हनुमानाची पूजा करायचे.
1840 मध्ये म्हापसा येथील मारुती मंदिरात हनुमानाच्या चित्राचे लोक पूजा करायचे. नंतर 1843 मध्ये तिथेच लोकांनी पंजमुखी मूर्तीची प्रतिष्ठापना करुन मनोभावे हनुमानाची आराधना सुरु केली. पुढे जावून 1933 मध्ये पणजीतील मळा येथे हनुमानाच्या मंदिराची उभारणी करण्यात आली. त्याकाळी बार्देशातील हणजूण येथील हनुमानाच्या मंदिराचा नावलौकिक होता. लोक मोठ्या भक्तीभावाने तिथे राम भक्ताची पूजा करायचे.
सतराव्या शतकात संत रामदास स्वामींनी शेजारील महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी सर्वसामान्य लोकांना बळ, प्रेरणा मिळावी म्हणून सुमारे चारशेहून अधिक हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करुन बलोपसनेला सुरुवात केली होती. हाच आदर्श समोर ठेवत गोव्यातही सह्याद्रीचे डोंगर, टेकडीच्या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यास लोकांनी सुरुवात केली. त्यांनी त्या परिसराला 'हनुमानगड' (मारुतीगड) असे संबोधले.
चला तर मग गोव्यात कुठे-कुठे हनुमानाची प्रसिद्ध मंदिरे आहेत याबाबत जाणून घेऊया...
पणजीतील मिरामार येथे हनुमानाचे मंदिर आहे. हे सुंदर वास्तुशैलीत बांधलेले असून हनुमान जयंतीस येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण जमा होतात. संध्याकाळच्या वेळी मंदिराला दिव्यांनी सजवले जाते, जे फारच सुंदर दिसते.
म्हापसा शहरात हे एक प्राचीन आणि लोकप्रिय हनुमान मंदिर आहे. स्थानिक लोक येथे नियमित दर्शनासाठी येतात. मंदिरात हनुमान जयंतीस मोठी मिरवणूक आणि उत्सव साजरा केला जातो.
फोंडा हे गोव्याचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. येथे असलेले हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर डोंगराच्या उतारावर असून, आजूबाजूचा निसर्गही मनमोहक आहे. येथे विशेषतः शनिवारच्या दिवशी भक्तांची गर्दी असते. तसेच, येथे हनुमान जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
उत्तर गोव्यातील अळणे गावातील हनुमान मंदिर जागृत आहे. स्थानिक गोमंतकीय भक्तीभावे हनुमानाची पूजा-आर्चा करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.