
डिचोली: देश-विदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रेला राज्य सरकारने घोषित केलेल्या ‘राज्योत्सव’ दर्जाला देवस्थानच्या विद्यमान समितीसह महाजनांनी विरोध केला आहे.
लईराई देवीच्या जत्रेला राज्योत्सवाचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर श्री लईराई संस्थानची एक तातडीची सर्वसाधारण सभा आज (रविवारी) देवस्थान सभागृहात बोलाविण्यात आली होती. दीनानाथ गावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आमसभेस देवस्थान समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह बहुतांश महाजन उपस्थित होते.
श्री लईराई देवीची ख्याती देश-विदेशात पोचलेली आहे. देवीच्या जत्रा काळात धोंड मिळून लाखो भक्तगण शिरगावात येतात. लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रेला आता राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अलीकडेच विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तशी घोषणाही केली आहे.
लईराई देवस्थानच्या जत्रोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा नकोच, अशी ठाम भूमिका आज (रविवारी) पार पडलेल्या देवस्थानच्या आमसभेत महाजनांनी घेतली असून, तसा निर्णयही आमसभेत घेतला आहे. राज्योत्सवाच्या दर्जाची घोषणा करण्यापूर्वी सरकारने देवस्थानच्या महाजनांना अंधारात ठेवले, असा त्यांचा दावा असून राज्य सरकारच्या अनपेक्षित हस्तक्षेपावरून महाजनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्योत्सवाचा दर्जा देण्याऐवजी श्री लईराई देवीचे मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असेही या महाजनांचे म्हणणे आहे. आजच्या आमसभेत घेतलेला निर्णय सरकारला कळविण्यात येईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी आमसभेनंतर दिली.
आतापर्यंत प्रशासकीय यंत्रणा आणि भक्तगणांच्या सहकार्याने देवीचा जत्रोत्सव सुरळीतपणे साजरा होत असताना सरकारने अचानक महाजनांना विश्वासात न घेता या देवस्थानाबाबत निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे महाजनांचे म्हणणे आहे.
लईराई देवस्थानला राज्योत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यापूर्वी तसा प्रस्ताव सरकारने देवस्थानसमोर ठेवायला हवा होता. परंतु तसे झालेले नाही. यासंबंधी कला व संस्कृती खात्याशी आम्ही संपर्क साधला, त्यावेळी तसा प्रस्तावही संबंधित खात्याकडे आलेला नाही असे सांगण्यात आले, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी दिली.
निर्णयासंबंधी प्रामुख्याने चर्चा : सरकारच्या या निर्णयासंबंधी लईराई संस्थानच्या आजच्या आमसभेत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. महाजनांना अंधारात ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याचा आक्षेप या आमसभेस नोंदवत सर्व महाजनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
लईराई देवस्थान हे महाजनकीचे देवस्थान आहे. तेव्हा महाजनांच्या मान्यतेशिवाय सरकार परस्पर निर्णय घेऊ शकत नाही. जत्रा काळात सरकारतर्फे पोलिस आदी आपत्कालीन व्यवस्था करण्यात येते. त्यात सरकारने वाढ करावी. मात्र, राज्योत्सवाचा दर्जा महाजनांना मान्य नाही.
दीनानाथ गावकर, अध्यक्ष, श्री लईराई देवस्थान.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.