olympic association
olympic association Dainik Gomantak
गोवा

आयओए प्रभारी अध्यक्षपदास आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय ऑलिंपिक संघटनेचे ( आयओए ) आपण स्वःघोषित प्रभारी अध्यक्ष असल्याचा दावा अनिल खन्ना करत आहेत, तो अंशतः बेकायदा असल्याचे नमूद करत गोवा ऑलिंपिक संघटनेचे (जीओए) सचिव गुरुदत्त भक्ता यांनी आव्हान देणारी नोटीस शुक्रवारी पाठविली. या प्रकरणी गरज भासल्यास न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला जाईल, असे भक्ता यांनी स्पष्ट केले. (Guru Dutt Bhakta challenged IOI's claim by Anil Khanna )

जीओए आमसभा व निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी संध्याकाळी राज्याच्या राजधानीत झाली. त्यानंतर भक्ता यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जीओए कार्यकारी समिती 2022- 2026 कालावधीसाठी बिनविरोध ठरली. त्यास आमसभेने मान्यता दिली. श्रीपाद व भक्ता यांची अनुक्रमे अध्यक्ष व सचिवपदी तिसऱ्यांदा फेरनियुक्ती झाली आहे.

जीओए निवडणूक प्रक्रिया संघटनेच्या जुन्या घटनेनुसार झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा संहिता तरतुदींनुसार झालेली नाही. त्यास आयओएतर्फे अनिल खन्ना यांनी पत्र पाठवून आक्षेप घेतला आहे, त्यामुळे भक्ता व खन्ना यांच्यात वाद उफाळून आला आहे. भक्ता आयओए कार्यकारी मंडळाचे सदस्यही आहेत. खन्ना यांच्या स्वःघोषित नियुक्तीस आक्षेप घेणारे पत्र आयओए कार्यकारी मंडळाचे आणखी एक सदस्य अधिप दास यांनी सर्व सदस्यांना यापूर्वीच पाठविले आहे.

खन्ना बेकायदेशीरपणे पदावर

‘‘अनिल खन्ना स्वतःला आयओएचे प्रभारी अध्यक्ष मानतात, पण ते बेकायदा आहे. आयओए घटनेच्या कलम १६.२ नुसार अध्यक्षाच्या अनुपस्थितीत कार्यकारी मंडळाच्या मंजुरीने एक वरिष्ठ उपाध्यक्ष बैठकीचे अध्यक्षपद भूषवू शकतो. अध्यक्षाच्या दीर्घकालीन अनुपस्थितीत कार्यकारी मंडळाच्या संमतीने एक वरिष्ठ उपाध्यक्ष या कालावधीत अध्यक्षाचे कर्तव्य व जबाबादारी पार पाडू शकतो.

अध्यक्ष, कार्यकारी मंडळ अथवा आमसभेच्या निर्देशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष इतर कोणतेही कार्य करू शकतो,’’ असे भक्ता यांनी नवी दिल्ली येथील अनिल खन्ना यांना पाठविलेल्या नोटिशीत नमूद केले आहे. घटनेच्या कलम 16.2 नुसार आयओएचे वरिष्ठ उपाध्यक्ष आर. के. आनंद आहेत आणि आपण नव्हे, असे भक्ता यांनी खन्ना यांना सुनावले आहे. याप्रकरणी खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे भक्ता यांचे म्हणणे आहे.

सर्व संलग्न संघटनांना पत्र

आयओए प्रभारी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी गतआठवड्यात सर्व संलग्न राज्य संघटनांना पत्र पाठवून कार्यकारी समिती निवडणूक राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेतील तरतुदीनुसार घेण्याची सूचना केली आहे. त्यासाठी संलग्न संघटनेस घटना दुरुस्ती व निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत दिली होती.

जीओए निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रीय क्रीडा संहिता तरतुदींनुसार पदाधिकारी कालमर्यदा व पदाधिकारी वयोमर्यादा हे नियम पाळण्यात आलेले नाहीत. गोवा ऑलिंपिक संघटनेची निवडणूक प्रक्रिया संघटनेच्या जुन्याच घटनेनुसार निवडणूक अधिकाऱ्याने हाताळली आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता तरतुदींनुसार निवडणूक घेणाऱ्या संलग्न संघटनेच्या कार्यकारी समितीला आयओएकडून मान्यता मिळणार नाही, तसेच निवडणूक हक्कही गमवावा लागणार असल्याचे खन्ना यांनी पत्रात सुचीत केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात नरेंद्र बत्रा यांना आयओए अध्यक्षपदी काम करण्यास प्रतिबंध करत दूर केले, त्यानंतर हे पद रिक्त आहे.

म्हणून जुन्या घटनेनुसार निवडणूक

आयओएचे माजी अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी २१ डिसेंबर रोजी सर्व आयओए संलग्न संघटनांना पाठविलेल्या पत्रानुसार, क्रीडा संहिता राष्ट्रीय महासंघाना लागू होते व त्यातील तरतुदी राज्य संघटनांसाठी बंधनकारक नाहीत. या पत्रानुसार, जीओए निवडणूक अधिकाऱ्याने जीओए निवडणूक प्रक्रिया संघटनेच्या जुन्या घटनेनुसार पार पाडली, असे गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT