पणजी: गिरी, सांगोल्डा, पर्वरी दरम्यानच्या महामार्गावरून प्रवास करणे हे सध्या प्रवाशांसाठी मोठे संकट बनले आहे. या मार्गावर रस्ता कमी आणि खड्डेच अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पावसाच्या आगमनानंतर या खड्ड्यांमध्ये साचणारे पाणी मोठ्या अपघातांना आमंत्रण देत आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी तर ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.
चारचाकी वाहन चालक तरी काहीसा अंदाज घेऊ शकतात, पण दुचाकी चालकांना रस्त्यात खड्डा आहे की, सरळ रस्ता हेच कळत नाही. गिरी, सांगोल्डा, पर्वरीपर्यंत या मार्गावर २४ तास वाहतूक असते. मात्र आता रस्त्यांची परिस्थिती इतकी खराब आहे की, वाहन चालवणे म्हणजे अक्षरशः कसरतीसारखे झाले आहे.
या मार्गावर तब्बल ७० टक्क्यांहून अधिक अंतरावर खड्डे आणि उखडलेला डांबर दिसतो. त्यामुळे वाहने स्लो स्पीडमध्ये चालवावी लागतात, परिणामी वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने पावसाअगोदरच या रस्त्यांची डागडुजी केली असती तर खड्डे अधिक खोलवर गेले नसते. त्यातून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
सांगोल्डा येथे काही महिन्यांपूर्वी सुमारे ५०० मीटर अंतराचा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात त्या रस्त्यावरदेखील खड्डे पडले असून, हे काम दुय्यम दर्जाचे असल्याचे दिसून येते. या मार्गाच्या तातडीने डागडुजी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.