आठ कारकुनांसह एकूण 43 जागा भरण्यासाठी मडगाव पालिकेने सुरू केलेल्या प्रक्रियेला सरकारकडून चाप लावण्यात आला आहे. पालिकेला स्वतःहून नोकर भरती करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे स्पष्ट करून पालिकेने सुरू केलेली नोकर भरती प्रक्रिया रद्द करावी, असे आदेश पालिका प्रशासन संचालकांनी दिले आहेत.
आठ कनिष्ठ गटातील कारकून, एक साहाय्यक गवंडी आणि ३४ कामगारांची भरती करण्यासाठी मडगाव पालिकेने हल्लीच जाहिरात जारी केली होती. मात्र, ही जाहिरात मागे घ्यावी, अशी सूचना करणारे पत्र पालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी मडगाव पालिका मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांना पाठविले आहे.
दरम्यान, आता मडगाव पालिकेच्या सत्ताधारी मंडळासमोर वेगळाच पेचप्रसंग उभा राहिला आहे. सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांना या नोकर भरतीतून आपल्या मुलींना आत घुसवायचे होते; पण त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.
मडगाव पलिकेत ज्यावेळी सत्ताबदल घडवून आणला गेला त्यावेळी या दोन्ही नगरसेवकांना आपला गट बदलण्यासाठी त्यांच्या मुलींना पालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
पालिकेत कर्मचारी भरती करण्याचे पालिकेला कोणतेही अधिकार नसून अशी नोकर भरती एक तर पालिका प्रशासन संचालक कार्यालयातून किंवा राज्य नोकर भरती आयोगाकडूनच होऊ शकते, असे या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. पालिका प्रशासन संचालक कार्यालयातून आलेल्या या पत्रानंतर ही नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
- गौरीश शंखवाळकर, मुख्याधिकारी, मडगाव पालिका
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.