Savitribai Phule: विरोधाचे उंबरठे ओलांडून नव्या क्रांतीला जन्म देणाऱ्या 'सावित्रीबाई', वाखाणण्याजोगे शैक्षणिक योगदान

Savitribai Phule Contribution: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन काल झाला. सावित्रीबाईंना जाऊन १३० वर्षे झाली आहेत त्यांचे कार्य आजही एखाद्या सुवर्णालंकाराप्रमाणे चमकत आहे.
Savitribai Phule death anniversary
Savitribai Phule death anniversaryDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन काल झाला. सावित्रीबाईंना जाऊन १३० वर्षे झाली आहेत त्यांचे कार्य आजही एखाद्या सुवर्णालंकाराप्रमाणे चमकत आहे. ३ जानेवारी १८३१ हा सावित्रीबाईंचा जन्मदिन. त्या जन्मल्या त्या काळात महिलांचे स्थान अगदी गौण असायचे.

किंबहुना त्यांना स्थान होते असे म्हणणेसुद्धा चुकीचे ठरू शकेल. अगदी लहान वयात लग्न होणे आणि नंतर आयुष्यभर संसारात जखडून घेणे एवढीच त्या काळात स्त्रीची भूमिका असायची.

त्यात परत पतीचे अकाली निधन झाले तर बाईची अवस्था ’भीक नको पण कुत्रा आवर’ अशी व्हायची. सावित्रीबाईंचे लग्नसुद्धा अगदी कमी वयात झाले होते. शिक्षण तर पदरी नव्हतेच.पण त्यांना जोतिबा फुलेंसारखा दूरदृष्टी असलेला पती मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली.

जोतिबांनी त्यांना शिक्षित केले. एवढेच नाही तर समाजाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळवून दिली. त्यामुळे त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका नंतर मुख्याध्यापिका बनू शकल्या. त्या काळात महिलांनी घराबाहेर पडणे म्हणजे अक्षम्य गुन्हा समजला जायचा. सावित्रीबाईंनाही अनेक संकटाशी सामना करावा लागला. पण पती जोतिबा यांच्या पाठिंब्यामुळे त्या या सर्व संकटाच्या दरी पार करू शकल्या. आणि म्हणूनच त्या अनेक पीडित महिलांच्या तारणहार बनू शकल्या.

१८४८ साली पुणे येथे तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी त्यांनी मुलींकरता पहिले विद्यालय सुरू केले. त्यावेळी त्यांना बराच विरोध झाला.

मुलींनी शिक्षण घेणे ही त्यावेळी समाजविघातक कृती समजली जायची. पण सावित्रीबाईंनी विरोधाचे उंबरठे ओलांडून एका नव्या क्रांतीला जन्म दिला. १८५१साली महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्याकरता त्यांनी महिला सेवा मंडळ स्थापन केले.

१८७३साली सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यातल्या महिला गटाच्या त्या नेत्या बनल्या. महिलांना आत्मनिर्भर करणे हे त्यांचे ध्येय बनले होते. परिस्थिती विपरीत होती. देशावर त्या काळात ब्रिटिशांचे राज्य होते. पण असे असूनसुद्धा त्या डगमगल्या नाही.

विधवांचे पुनर्वसन करणे त्यांनी शेवटपर्यंत थांबविले नाही. अशाच एका विधवेला तिच्यावर झालेल्या अत्याचारापोटी जन्मलेल्या मुलाला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी एक नवा आयाम तयार केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण१८ महिला विद्यालये स्थापन केली. म्हणूनच तर महिला विकासाच्या प्रणेत्या म्हणून सावित्रीबाईंचेच नाव घेतले जाते.

त्यांनी पती जोतिबा व दत्तक पुत्र यशवंत यांच्या साहाय्याने आपल्या कारकिर्दीत अनेक समाजसुधारक उपक्रम राबविले. त्या काळात पसरत चाललेल्या प्लेगच्या साथीबरोबरसुद्धा त्यांनी लढा दिला होता. पण याच प्लेगने १० मार्च १८९७ रोजी त्यांचा ६६ व्या वर्षी बळी घेतला.

पण आजही सावित्रीबाईंचे महत्त्व अबाधित आहे. पुणे विद्यापीठासारख्या देशातील एका महत्त्वाच्या विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देण्यात आले आहे. आज ज्याप्रकारे महिला विविध क्षेत्रे गाजवीत आहे, पुरुषांना ’ओव्हरटेक’ करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवीत आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाईंना जाते यात शंकाच नाही.

मुख्य म्हणजे त्यांनी महिलांत आत्मविश्वास निर्माण केला. पुरुषप्रधान संस्कृतीतसुद्धा महिला आत्मनिर्भर होऊ शकतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले. म्हणूनच तर महाराष्ट्रात त्यांची जयंती व पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी केली जाते.

Savitribai Phule death anniversary
Savitribai Phule Jayanti 2024 : सावित्रीबाई फुलेंची जयंती शासकीय स्तरावर साजरी व्हावी : ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद म्हाडगुत

त्यामानाने गोव्यात तेवढी जागृती नाही. आम्ही सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान स्थापन केल्यानंतर थोड्याफार प्रमाणात राज्यात जागृती व्हायला लागली आहे. राज्यातील काही भागांत कार्यक्रम होताना दिसत आहेत. खरे तर गोवा सरकारने शिवजयंती, गांधी जयंतीप्रमाणे सावित्रीबाई फुले जयंती ही सरकारी पातळीवर साजरी करून व्यापक प्रमाणात जागृती करायला हवी.

त्याचप्रमाणे शैक्षणिक आस्थापनात सावित्रीबाईंची जयंती- पुण्यतिथी साजरी करण्याचेही बंधन घालायला हवे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखणण्यासारखे होते हे कोणाच नाकारू शकणार नाही.

Savitribai Phule death anniversary
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी: ज्ञान नाही विद्या नाही तयास मानव म्हणावे का? 

त्यांनी इतिहास घडविला व तो इतिहास आजही गिरवला जात आहे याबद्दलही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांचे अविस्मरणीय कार्य सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे. आजही अनेक सावित्रीच्या लेकी अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत.

अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रेरणादायक स्मृतींना हार्दिक अभिवादन!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com