पणजी: आक्षेपार्ह विधानांबद्दल कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई निश्चित असली तरी आज भाजपच्या तंबूत वादळापूर्वीची शांतता होती. केरळच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे २४ तास आधीच गोव्यात परतल्याने राजकीय चर्चेला ऊत आला असला तरी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत राजभवनावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही निरोप पोचला नव्हता.
फोंडा येथील प्रेरणा दिन कार्यक्रमात गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याचा जाहीर पंचनामा केला होता. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारवाई होणारच, असे जाहीरपणे सांगितल्याने गावडे यांना राजीनामा देण्याची सूचना केली जाईल, अशी अटकळ होती. तसे संकेतही दिले जात होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. गोवा घटकराज्य दिन सोहळ्यात मुख्यमंत्री आणि गावडे शेजारी शेजारी बसल्याने कारवाई कधी, हा प्रश्न चर्चेला आला.
भाजप हा शिस्तप्रिय पक्ष मानला जातो. त्यामुळे गावडे यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्यांवर पक्ष पातळीवर कारवाई होईल, अशी जनभावना तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे ही शक्यता आणखी बळावली आहे. ‘कारवाई होणारच’, असे दोघांनीही सांगितल्याने राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये ही कारवाई कधी आणि कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीत एका अभ्यास वर्गाच्या निमित्ताने गेलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे पक्षश्रेष्ठींना भेटतील आणि लांबलेला मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय मार्गी लावतील, अशीही चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात दामू कोणाला भेटले, त्याचे पुरावे माध्यमांसमोर आले नाहीत. नाही म्हणायला पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे याविषयी चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मंत्री गोविंद गावडे यांनी अद्याप या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्याकडे फारसे पर्याय खुले राहिलेले नाहीत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्याच्या राजकारणात आज दिवसभर एकच चर्चा रंगली. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा दिला का? सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चर्चा थेट वर्तमानपत्र कार्यालयांपर्यंत पोहोचली. खातरजमा करण्यासाठी अनेकांनी पत्रकारांशी संपर्क साधला, तर काहींनी वर्तमानपत्र कार्यालयांतून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
गावडे यांच्या राजकीय भवितव्याबाबत सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यांच्या कृतींमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ते राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यभरात राजकीय घडामोडींविषयी चर्चा व उत्सुकता होती. असे असले, तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नियोजित कार्यक्रमांमध्ये निवांत होते. शनिवार असल्याने शासकीय निवासस्थानी बैठकांचे आयोजन नव्हते. त्यामुळे राज्यपालांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार, अशी चर्चा रंगली तरी मुख्यमंत्री मात्र साखळी येथील निवासस्थानी होते.
राज्यपाल गोव्याबाहेर असल्याने राजकीय हालचाली होत नसल्याची चर्चा होती. राज्यपाल नियोजनानुसार उद्या (ता.१) सायंकाळी गोव्यात पोचणार होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजकीय घडामोडींची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला आणि आज सायंकाळी उशिरा ते राजभवनावर दाखल झाले. त्यानंतर राजकीय हालचाली गतिमान होतील असे वाटत होते. मात्र, हालचाली आणखीन थंडावल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.