Goa Politics: खरी कुजबुज; मढ्याच्या टाळूवरील लोणी!

Khari Kujbuj Political Satire: कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर भाजप सरकारकडून कारवाई झाली, तर पुढील नियोजन काय?
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political Satire:Dainik Gomantak
Published on
Updated on

मढ्याच्या टाळूवरील लोणी!

रोजंदारीवरील असो की कंत्राटी कामगार असो त्यांचा वाली कोणच नसतो. अशा कामगारवर्गाचा वापर करून आपली झोळी भरण्याचे काम करण्यासाठी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा ऊत आला आहे. साफसफाई करणाऱ्या या कामगारांना कमी वेतन देऊन संबंधित कंपनी किंवा खासगी कंपन्यांकडून बक्कळ पैसा मिळविणाऱ्या गोव्यातही कंपन्या आहेत. विशेष बाब म्हणजे या कंपन्यांकडून गोव्यातीलच स्थानिक कामगारांची पिळवणूक होत असल्याचे पुढे आले आहे. या कंपनी विरोधात तक्रार आल्याने कामगार आयुक्तांनी त्या सेवा देणाऱ्या कंपनीकडून होत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या शोषणाच्या चौकशीचे नुकतेच आदेश दिले आहेत. कामगार कायद्याप्रमाणे आणि सरकारने ठरवलेला रोजंदारीचा दरही त्यांना दिला जात नाही, त्यामुळे त्या कंपनीच्या चौकशी अहवालात काय तथ्य बाहेर आले आहे, हे पाहणे उचित ठरणार आहे. खरे तर कागदोपत्री पगार वेगळा आणि त्या कामगारांच्या हाती पगाराची रक्कम भलतीच देण्याचे कृत्य अशा संस्था करीत असल्याची बाब आता प्रकर्षाने पुढे आली आहे. त्यामुळे आठ तासांहून अधिक काम करणाऱ्या या कामगारांच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा प्रकार आहे, हे स्पष्ट दिसते. ∙∙∙

गोविंद गावडे पुन्हा आमदार होतील?

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर भाजप सरकारकडून कारवाई झाली, तर पुढील नियोजन काय? यासंबंधी प्रियोळ मतदारसंघात सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तसे पाहिले तर या मतदारसंघात एक आमदार फक्त दोनवेळाच निवडून आला आहे. मागच्या काळात डॉ. काशिनाथ जल्मी व त्यानंतर दीपक ढवळीकर हे प्रत्येकी दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. आताही गोविंद गावडे यांची प्रियोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून ही दुसरी खेप आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा गोविंद गावडे आमदार होतील की नाही, याबाबत काहीच सांगता येत नाही, अशीच प्रतिक्रिया या मतदारसंघातून व्यक्त होताना दिसत आहे. ∙∙∙

कृषिमंत्र्यांचे रोपटी वाटप

राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक हे तसे धोरणी राजकारणी. आपल्याकडे असलेल्या खात्याचा पुरेपूर वापर गोमंतकीयांना व्हावा हेच त्यांचे धोरण असते. फोंड्यात झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द कृषी खात्याच्या संचालकांनी रवी नाईक यांच्याकडे यापूर्वी कृषी खात्याचा ताबा असताना त्यांनी सुरवातीला सर्व शेतकऱ्यांना मोफत कलमे व रोपटी वाटण्याचा उपक्रम सुरू केला, जो आत्तापर्यंत सुरूच आहे. किंबहुना या रोपटी वाटपात वाढच झाली आहे. गोवा हरित व्हावा, सुंदर व्हावा हीच त्यांची मनीषा असल्याचे संचालक म्हणाले, जे खरेच आहे ∙∙∙

चर्चा तरी कशाची?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई होणारच असे जाहीर केले आहे. घटक राज्य दिन सोहळ्यात शुक्रवारी प्रथमच दोघेही जाहीरपणे एकत्र आले होते. त्याआधी राज्य मंत्रिमंडळ बैठक आणि खुलासा करण्यासाठी गावडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा ते एकत्र आले होते. मात्र, ते सारे चार भिंतीआड होते. शुक्रवारी कला अकादमीत ते जाहीरपणे एकत्र आले. त्यांच्यात कोणताही ताण तणाव दिसला नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी गप्पा मारल्या. एवढे सारे घडूनही जणू काही झालेच नाही असे वावरण्याने अचंबित होण्याची वेळ पाहणाऱ्यांवर आली होती.∙∙∙

तवडकर उभारणार प्रति ‘कोटा’

‘केल्याने होत आहे रे, आदी केलेची पाहिजे’ या बोध वाक्याचा बोध घेऊन काणकोणसारख्या दुर्गम भागातील बलराम शिक्षण संस्थेचे प्रमुख सभापती रमेश तवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखे उपक्रम हाती घेतले जात आहेत. बलराम शिक्षण संस्थेत आता ‘कोटा’च्या धर्तीवर नीट, जेईई व इतर स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी निवासी ‘कोचिंग’ व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा मोफत असणार आहे. एसटी समाजातील एक नेता वादग्रस्त विधाने करून आपल्या अकलेचे तारे तोडीत आहे व मंत्रिपद सांभाळण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरा नेता एसटीच्या भल्यासाठी झटत आहे. म्हणतात ना, ‘बोया पेड बबुल का आम कहाँ से खाये?’ ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री अजूनही ‘कूल’

काँग्रेसचा उमेदवार कोण?

जेव्हा चिराग नायक कॉंग्रेसमध्ये सामील झाला, तेव्हा २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत तोच कॉंग्रेसचा उमेदवार असेल असे दिसत होते, पण चिरागने एका मुलाखतीत स्पष्ट केले, की आपण कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला याचा अर्थ आपणच उमेदवार असेल असे होत नाही. वेळ व परिस्थितीनुसार कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. कदाचित आपण असेल, सावियो कुतिन्हो असेल किंवा एखादा तिसरा कोण तरी असेल. हे सांगून चिरागने आपल्या काँग्रेस प्रवेशाने नाराज झालेल्या सावियोला थंड करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिसरा उमेदवार कोण असू शकेल याबद्दलच्या गुपिताचा उलगडा होत नाही. कदाचित तो विद्यमान नगरसेवकांपैकी एक असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Breaking News: गोव्यात निम्मे मंत्रिमंडळ बदलणार? अनेकांचे धाबे दणाणले; हालचालींना वेग

कला मंदिराची समिती केव्हा?

तीन वर्षे झाली फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिराला अध्यक्षही नाही आणि समितीही नाही. वास्तविक हे कलामंदिर म्हणजे सध्याचे कृषिमंत्री असलेले रवी नाईक यांचे. २००२ साली विपरीत परिस्थितीत त्यांनी हे कलामंदिर अस्तित्वात आणले होते. सलग सात वर्षे ते या कला मंदिराचे अध्यक्षही होते. आता तेच परत फोंड्याचे आमदार आहेत आणि कलामंदिर फोंड्यात येत असल्यामुळे त्यांना अध्यक्ष करून त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करावी अशी चर्चा सध्या अंत्रुज महालातल्या कलाकारांत सुरू आहे. बघुया... ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर पडते की काय ती आणि उशिरा का होईना कलाकारांची इच्छा फलद्रूप होते की काय ती... ‘देर से आये, दुरुस्त आये हेच खरे नाही का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com