पणजी: अभियांत्रिकी क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या गोमंतकीय अभियंत्यांच्या कामगिरीला ‘गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्ड’ने आज सलाम केला. ११ प्रथितयश अभियंते आणि ‘स्प्रिंटली’ कंपनीचा गौरव करण्यात आला, तर अरविंद खांडेपारकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्तृत्वाची दखल, गुणवत्तेला प्रोत्साहन आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सन्मान सोहळा ठरला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, उद्योगपती अनिल खंवटे, ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, युनिट हेड विजू पिल्लई आणि सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यपालन अधिकारी (सीओओ) दिनेश ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे थाटात वितरण झाले. या सोहळ्यात अनिल लोटलीकर, मयूर हेदे, डॉ. गौरांग पाटकर, डॉ. पूर्णानंद सावईकर, गौरी दीपक ढवळीकर, समर्थ बोरकर, आर्मस्ट्राँग फर्नांडिस, पी. व्ही. के. नायर, रश्मी शिरोडकर यांना गौरविण्यात आले.
पुरस्कार सोहळा म्हटला, की औपचारिकता, टाळ्यांचा कडकडाट आणि छायाचित्रांची लगबग ठरलेली. मात्र, येथे वातावरण काहीसे वेगळे होते. पुरस्कार विजेत्यांसोबत कुटुंबीय आणि मित्रपरिवारही सहभागी झाल्याने कर्तृत्वाचा हा सोहळा कौटुंबिक जिव्हाळ्याने फुलला. कुठे जुन्या आठवणी, कुठे यशोगाथा आणि कुठे सहकाऱ्यांच्या गप्पा रंगल्या. त्यामुळे मंचावर सन्मान सुरू असताना सभागृहात आपलेपणाचा माहोल होता. सुरेंद्र शानभाग (गिटार व गायन) व डेस्मंड सिल्वा (किबोर्ड) यांनी गीते सादर करून वातावरण हलके-फुलके केले.
समस्येतून संधी शोधतो तो अभियंता : झा
कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा म्हणाले, मी विज्ञानाचा द्विपदवीधर, विज्ञान ज्ञान देते तर त्या ज्ञानाचा वापर कसा करावे हे अभियांत्रिकी शिकवते. आजही ‘नासा’मध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टीवेळी गेल्यास निम्मे लोक हिंदीत बोलताना आढळतात, ते सारे भारतीय आहेत. भारतीय रेल्वेतील ४० टक्के अभियंते आयआयटीतील आहेत. एलन मस्क म्हणतो, अभियंता अस्तित्वात असलेली; पण माहीत नसलेली जादू दाखवतो. काश्मीरमध्ये आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच पूल चिनाब नदीवर बांधणे, हे याच सदरात मोडते. दुबईतील लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबत असल्याची तक्रार होती, त्यावर अभियंत्यांनी लिफ्टमध्ये संगीताची सोय करत आरसा बसविला आणि तक्रारच राहिली नाही, असा वेगळा विचारही अभियंताच करू शकतो.
‘एस’ आकाराच्या पुलाने दिली अभियंता कौशल्याची साक्ष : कामत
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत म्हणाले, गोवा छोटे राज्य असले तरी अभियांत्रिकी क्षेत्रात गोव्याचे योगदान खूप मोठे आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नातील विकसित भारत २०४७ आणि मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेला विकसित गोवा २०३७ घडविण्यासाठी तंत्रज्ञानतज्ज्ञांचे (टेक्नोक्रॅट) योगदान महत्त्वाचे असेल. सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार पुढे नेताना अभियंत्यांच्या गाभा पथकाशी चर्चा करतो व सामूहिक संमतीने निर्णय घेतले जातात. पर्वरीसारख्या एखाद्या उन्नत मार्गावरून अभियंत्यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले जातात, तसे होऊ नये.
मडगावात कोकण रेल्वेचा उड्डाणपूल बांधण्याचे वचन मी निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते, याची आठवण सांगून ते म्हणाले, रेल्वेचे तत्कालीन अध्यक्ष ई. श्रीधरन यांनी या पुलासाठी आराखडा तयार केल्यावर काही इमारती-घरे पाडावी लागणार म्हणून मतदार नाराज झाले. त्यावर श्रीधरन यांनी अभियांत्रिकी कौशल्याने मार्ग काढत इंग्रजी एस. आकाराचा उड्डाणपूल बांधला. ही अभियंत्यांची कमाल असते. आताही कोकण रेल्वेच्या विस्ताराला मडगावात मदत केली जाईल. रत्नागिरी रेल्वे स्थानकासारखे स्थानक मडगावला उभारावे.
नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे घडवा : ज्युरी
ज्युरी भालचंद्र आंगले यांनी सांगितले, की महाविद्यालयांत उद्योजकतेचे शिक्षण देणे सुरू केले आहे. यासाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रत्येकी दोन प्राध्यापकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी उद्या नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनावे अशी भावना यामागे आहे. त्याशिवाय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सौर ऊर्जा निर्मितीकडे वळण्यासाठी नाममात्र अर्धा ते एक टक्का दराने वित्त साहाय्य ईडीसीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ज्युरी संदीप चोडणेकर यांनी नमूद केले, की जैवविविधतेने नटलेल्या गोव्यात कोणतेही बांधकाम करताना निसर्गावर ते आभूषण असेल, अशी भावना ठेवली जाते. त्याचमुळे पणजीच्या मध्यवर्ती वाचनालयाकडे जाणारा पूल ज्ञानसेतू बनतो. खारेबांध येथे नूपुर पूल आकाराला येईल. त्यामागे साळ नदीचा उगम वेर्णा येथे देवीच्या नूपुरातून (पायातील दागिन्यातून) झाल्याची भावना आहे.
पुरस्कारविजेते म्हणतात...
१ गौरांग पाटकर यांनी एका प्रश्नाला मिश्कीलपणे उत्तर देताना नमूद केले, की ते वाईन चाखण्याच्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे नातेवाईकांना, मित्रांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांची वाईन मिळावी, अशी अपेक्षा असते. येथे उपस्थितांनाही वाईनची चव घ्यायची असल्यास खुले निमंत्रण आहे.
२ स्प्रिंटली कंपनीचे सहसंस्थापक माल्कम डिसोझा म्हणाले, की अमेरिकेतून नोकरी सोडून येथे कंपनी सुरू केली तेव्हा पालक व ओळखीचे लोक काय काम करता, अशी विचारणा करत होते. आज ८ वर्षांनी २०० अभियंत्यांना काम दिले, तेव्हा मी काहीतरी करत असल्याचे त्यांना वाटत आहे.
३ पी. व्ही. के. नायर म्हणाले, की कला अकादमीची वास्तू, गोमेकॉ परिसर, कांपाल तरण तलाव परिसर आदी वास्तू पाहिल्या की थांबून त्या आजही न्याहाळाव्याशा वाटतात. त्यांच्या निर्मितीत माझाही हातभार होता, ही भावनाच आज सुखावून जाते.
४ अनिल लोटलीकर म्हणाले, आता संवादाची अनेक साधने निर्माण झाली आहेत. संवाद सुलभ झाल्याने गोव्यात राहून व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. चार दशकांपूर्वी अशी स्थिती नव्हती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.