Govind Gaude: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘इथे ओशाळला मृत्यू’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू होता. पहिल्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला हाऊसफुल्ल प्रेक्षागृहाने दाद दिली होती. नाटकाच्या मध्यंतरात गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचा सत्कार नियोजित होता.
त्यासाठी मान्यवर व्यासपीठावर आले आणि सत्कार स्वीकारण्यासाठी चक्क संभाजी महाराजांच्या वेशातील कलाकारच पुढे आला. एका राज्याचे मंत्रीच नाटकातील मध्यवर्ती भूमिका साकारत होते, हे कळताच नाट्यगृहातील प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
एखाद्या खात्याचा मंत्री त्याच क्षेत्राविषयी इतका जाणकार आहे आणि त्यात सक्रिय देखील आहे, हे पाहून पुण्यातील रसिकांना सुखद धक्का बसला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनीही गावडे यांच्या या भूमिकेचे कौतुक केले.
जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित या कार्यक्रमात गोव्याच्या श्री सिद्धीनंदन थिएटरने हे नाटक सादर केले. अवघ्या पंधरा दिवसांच्या तालमीवर त्यांनी हे नाटक सादर केले. मात्र, त्यांच्या व सर्वच कलाकारांच्या संवादफेक आणि अभिनयातील सफाईने प्रभावित झालेल्या रसिकांनी त्यांना दाद दिली.
गावडे यांच्याकडे सध्या गोव्याच्या राज्य मंत्रिमंडळात कला व सांस्कृतिक खात्यासह, क्रीडा खाते आणि ग्रामीण विकास संस्थेचाही कार्यभार आहे. 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपतर्फे प्रियोळ मतदारसंघातून निवडून आले आहेत.
यापूर्वीही त्यांनी ‘शिव गोमंतक’, घाशीराम कोतवाल’, ‘गर्जले सह्याद्रीचे कडे’ अशा विविध नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नाटकाची आवड असल्याने वयाच्या दहाव्या वर्षीपासून ते विविध नाटकांत काम करत होते.
कलाकार म्हणून कारकीर्द घडत असतानाच राजकारणात प्रवेश करण्याची संधी आली. पुढे राजकीय कारकिर्दीतच व्यग्र झाले असले तरी वेळ मिळेल तसा नाटक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, आपल्या भाषेचे, आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचावा, त्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने मी हे नाटक करतो.
नाट्यकलेवर, तसेच मराठी भाषेवर माझे प्रेम आहे. त्यामुळे व्यग्र वेळापत्रक असले तरी देखील त्यातून वेळ काढून हे नाटक करण्याचे मी ठरवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.