श्रावण महिना सुरू होण्याआधीच श्रावणाबद्दल इतकी चर्चा सुरू होते की ती चर्चा ऐकून पोट भरतं. जे श्रावण ‘पाळणार’ नसतील म्हणजे संपूर्ण महिना शाकाहार करणार नसतील त्यांच्यासाठी त्यांना या चर्चेत काही रस नसतो. पण जे श्रावण कडक शाकाहार करून साजरा करणार त्यांचे नियोजन सुरू होते.
ज्या घरांमध्ये वर्षातले सगळेच दिवस शाकाहार असतो त्यांना याचं फार मोठं अप्रूप वाटणार नाही. पण ज्यांच्या घरी तिन्ही त्रिकाळ मासळी असते अशांसाठी श्रावण म्हणजे शिक्षा आहे की काय! असे वातावरण असते. अशा मंडळींच्या पचनसंस्थेलादेखील मासळीचीच सवय त्यामुळे त्यांना शाकाहारी पदार्थ पचत नाहीत. अशी मंडळी घरी शाकाहारी स्वयंपाक असला की हळूच बाहेर जाऊन नुस्त्यांवर ताव मारून येतात.
श्रावणात कधी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर या व्यक्ती लगेच ओळखायला येतात. अगदी कोपऱ्यातलं, न दिसणारं टेबल पकडून कोणी चिकन, नुस्ते खाताना नजरेस पडला की याच्या घरी कडक श्रावण आहे हे समजायचं. या काळात अशी मंडळी सहजपणे हेरता येतात.
मलाही यापूर्वी श्रावण महिन्यातील आहाराचे एवढे अप्रूप नव्हते. माहेरी सगळे कायमचे शाकाहारी त्यामुळे आजूबाजूला श्रावणातील शाकाहाराची चर्चा म्हणजे ‘अवडंबर’ वाटायची. पण आता हा दृष्टिकोन बदलला आहे.
आहारातील जो भाग सवयीचा नाही, अशा भागाशी महिनाभर मैत्री करणे तसे सोप्पे नाही हे लक्षात येते. मला स्वतःला स्वयंपाकाच्या दृष्टीने श्रावण महिना आवडतो. एक तर अतिशय ताज्या, रसरशीत पालेभाज्या - फळभाज्या उपलब्ध असतात. हवेत छान गारवा असतो.
एरवी स्वयंपाकघरात न शिजणाऱ्या भाज्या या काळात मुद्दाम आणल्या जातात. कितीतरी वेगवेगळ्या चवीच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आपल्या पानात वाढल्या जातात. तुरीची डाळ घालून केलेली तायकिळयाची भाजी, तेऱ्याची अंबाडे घालून केलेली आंबट -गोड भाजी, दुधीच्या -अळसांद्याच्या, मस्काच्या (शेवगा) पानांची भाजी याच काळात खाण्यात मजा आहे.
वर्षभर अगदी सढळ हाताने आपल्या स्वयंपाकात कांदा-लसूण -आले वापरणाऱ्या, याच्या वाटणाशिवाय स्वयंपाकाचा विचार न करणाऱ्यांना कांदा लसूण न घालता भाजी चविष्ट होऊ शकते हे श्रावण महिन्यातच लक्षात येते. रोजच्या ताज्या भाज्या आणि त्यापासून केलेले वेगवेगळे पदार्थ हे गोव्यातल्या शाकाहारी स्वयंपाकाचे वेगळेपण आहे.
याच काळात म्हार्दोळची तवशी (काकडी) आली की सांगतील त्या किमतीत घेऊन त्याचा आस्वाद घेतला जातो, कणगा -काटेकणगा या काळात स्वयंपाकघरात हवीच. कणगांच्या नेवऱ्या आणि कणगाची खीर एकदा तरी बनवली पाहिजेच. परसबागेत लावलेली हळदीची पानं स्वयंपाकघरात आली की समजायचं आज पातोळ्या मिळणार.
इथं नागपंचमी आणि पातोळी हे ठरलेलं समीकरण तर माहेरी पुरणाचे ‘दिंड’ नावाचा पदार्थ असतो. माहेरी आईकडे नागपंचमीच्या दिवशी भाजी चिरायची नाही, विळी वापरायची नाही अशी पद्धत आहे.
आम्हा भावंडाना लहानपणी अशा गोष्टींची गंमत वाटायची. मग आई आदल्या दिवशी सगळ्या भाज्या चिरून ठेवायची. वाफाळलेला गरम गरम पुरणाचे दिंड, त्यावर तुपाची धार घालून आम्हांला खायला द्यायची. वर्षातून एकदाच याच दिवशी हा पदार्थ बनवला जायचा.
इकडे पातोळ्या आणि तिकडे पुरणाचे दिंड. पुरणाचे दिंड म्हणजे आजच्या मुलांच्या भाषेत पुरण भरलेले स्वीट मोमो. मग नारळी पौर्णिमेला केला जाणारा नारळीभातदेखील वर्षातून एकदा याच दिवशी खायला मिळायचा.
श्रावणात घरोघरी बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांची भली मोठी यादी तयार होऊ शकते. गोव्यातील महिलांच्या दृष्टीने श्रावणी ‘आयतार’ला वेगळे महत्त्व आहे. आयतारच्या आदित्य पूजनासाठी नैवेद्य म्हणून केल्या जाणाऱ्या गोड पदार्थांवर घरातील सर्वांना आवडतो. कधी मुठल्यो, पातोळ्या, मनगणे, कधी खीर असा प्रत्येक रविवारी एक गोड पदार्थ खायला मिळतो.
गोव्यातले आपले शाकाहारी पदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गोव्याचे खाद्यपदार्थ म्हणताच ‘फिशकरी राईस’ हेच डोळ्यासमोर येतात; पण इथले शाकाहारी पदार्थदेखील तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मसाल्यांचा वापर कमी, तेल न वापरता नुसत्या वाफेवर शिजवलेल्या भाज्या हे इथले वेगळेपण आहे.
पावसाळी रानभाज्या, केळफुलं - भोपळ्याची फुलं, शेवगा -सुरणाची फुलं, भारंगीची फुले अशा विविध फुलांपासून बनवलेले पदार्थ, तऱ्हेतऱ्हेच्या फळभाज्या यात अतिशय वेगळी अशी नीरफणस, फागलाची भाजी असे पदार्थ आपल्या पानात असणे म्हणजे गोव्याची समृद्धता अनुभवणे. श्रावण महिन्यात ही समृद्धता अनुभवूया.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.