डिचोली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जिल्हा पंचायत निवडणूक म्हणजे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि माजी आमदार नरेश सावळ यांच्यासाठी ‘सेमीफायनल’च आहे. त्यामुळे दोघांसाठी लाटंबार्सेतील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक जवळ आल्याने सध्या डिचोलीतील लाटंबार्से जिल्हा पंचायत मतदारसंघात प्रचाराला जोर आला आहे. वातावरण हळूहळू तापू लागले आहे. आमदार चंद्रकांत शेट्ये आणि माजी आमदार नरेश सावळ यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. सावळ यांनी तर शेट्ये यांना वारंवार लक्ष्य केले आहे. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
दुसऱ्या बाजूने टीकाकारांनी टीका केली म्हणून काहीही परिणाम होणार नाही, उलट भाजपने डिचोलीत केलेला विकास मतदारांच्या डोळ्यांसमोर आहे, असा दावा आमदार शेट्ये करत आहेत. विरोधकांचे राजकारण जनतेला माहीत आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
लाटंबार्सेतून भाजपचे उमेदवार म्हणून पद्माकर मळीक निवडणूक लढवत आहेत. सध्या या मतदारसंघातील चारही पंचायत क्षेत्रात भाजप उमेदवाराचा प्रचार जोरात सुरू आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती राजेश पाटणेकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह प्रदीप रेवोडकर, संजय शेट्ये, विश्वास गावकर हे विद्यमान आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत.
सर्वमान्य अपक्ष उमेदवाराचाही प्रचार जोरात
काँग्रेसच्या उमेदवारीवर गत विधानसभा निवडणूक लढविलेले मेघ:श्याम राऊत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वमान्य उमेदवार म्हणून राऊत निवडणूक लढवत असले तरी माजी आमदार नरेश सावळ यांनी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
सावळ यांच्यासह माजी जिल्हा पंचायत सदस्य संदीप राऊत, लाटंबार्सेचे सरपंच डॉ. रामा गावकर, साळ सरपंच नीता राऊत, माजी सरपंच सावित्री घाडी यांच्यासह पंचसदस्य आणि समर्थक कार्यकर्ते राऊत यांच्या प्रचारकार्यात उतरले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.