Goa ZP Election 2022: जिल्हा पंचायतींच्या रिक्त तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपने दोन जागा जिंकल्या, तर त्याच पक्षाने पाठिंबा दिलेला एक अपक्ष उमेदवारही निवडून आला. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा विजयाचा वारू सुसाट; परंतु काँग्रेस तिन्ही ठिकाणी भुईसपाट झाल्याचे दिसून आले.
दवर्लीत भाजपचे परेश नाईक, रेईश मागूशमध्ये संदीप बांदोडकर, तर कुठ्ठाळीत अपक्ष उमेदवार मर्सियाना वाझ निवडून आल्या आहेत. दक्षिण गोव्यातील दवर्ली आणि कुठ्ठाळी तर उत्तर गोव्यातील रेईश मागूश या रिक्त जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. 50 टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली.
दवर्ली मतदारसंघाची मतमोजणी मडगावातील माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलात, कुठ्ठाळी मतदारसंघाची मतमोजणी बायणा-वास्को रवींद्र भवनात तर रेईश मागूश मतदारसंघाची मतमोजणी पेडे-म्हापसा येथील इनडोअर मैदानावर सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली होती.
जिल्हा पंचायतीच्या तिन्ही जागा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत गोवा भाजप आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. गोव्यात मिळालेले यश हे विकासकामांची पावती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोदी, नड्डांकडून गोवा भाजपचे अभिनंदन
जिल्हा पंचायतीच्या तिन्ही जागा जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत गोवा भाजप आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. गोव्यात मिळालेले यश हे विकासकामांची पावती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रचंड मताधिक्य
दवर्लीतून परेश नाईक यांनी 4080 मते मिळवून आम आदमी पक्षाच्या सिद्धेश भगत (3374) यांचा ७०६ मतांनी पराभव केला.
रेईश मागूशमध्ये संदीप बांदोडकर यांनी 5345 मते मिळवत अपक्ष साईनाथ कोरगावकर (1101) यांचा 4 हजार 185 मतांनी पराभव केला.
कुठ्ठाळीत अपक्ष उमेदवार मर्सियाना वाझ यांनी 4453 मते मिळवून अपक्ष उमेदवार लेस्ली गामा (1511) यांचा 2 हजार 942 मतांनी पराभव केला. मर्सियाना वाझ यांना भाजपने पाठिंबा दिला होता.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री-
राज्यातील जनतेचे आभार मानले पाहिजेत. कारण गोव्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या विकासाच्या राजकारणाचे जनतेने समर्थन केले आहे. त्या आधारेच आमचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. भाजप पुढील काळातही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असेल.
सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप-
तिन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये भाजप आणि भाजपपुरस्कृत उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत. हा ट्रेंड राज्य आणि केंद्र सरकारच्या कामांवर जनता खूश असल्याचा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही दोन्ही जागा भाजप अशाच मोठ्या फरकाने जिंकेल, यात शंकाच नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.