पणजी: ‘‘वेडिंग डेस्टिनेशन’ म्हणून गोवा जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे गोव्यात येऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या विवाहाची नोंदणी राज्यात करून त्यांना विवाह प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिवाय यापुढे विवाह प्रमाणपत्रांवर पती-पत्नीचे कलर फोटोही छापण्यात येतील’’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राज्य नोंदणी खात्यातर्फे नोंदणी दिनानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी खात्याचे सचिव संजीव गडकर, निबंधक आयशा वायंगणकर आणि मान्यवर उपस्थित होते. ‘‘वेडिंग डेस्टिनेशन असल्याने जगभरातील अनेकजण गोव्यात (Goa) येऊन विवाह करतात. त्यांना त्यांच्या राज्यात किंवा विदेशी जोडप्यांना त्यांच्या देशांमध्ये विवाह प्रमाणपत्रे मिळवताना अडचणी येत असतात.
त्यामुळे राज्यात येऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या विवाहांची नोंदणी खात्याअंतर्गत येणाऱ्या केंद्रांत करून घेऊन त्यांना विवाह प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोबतच नोंदणी खात्याकडून दिल्या जाणाऱ्या विवाह प्रमाणपत्रांवर याआधी पती-पत्नीचे फोटो छापले जात नव्हते. यापुढे प्रमाणपत्रांवर त्यांचे फोटोही असतील’’, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
‘‘बदलत्या काळात तंत्रज्ञानातही बदल होत आहेत. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना कमी वेळेत आणि पारदर्शकपणे सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच सरकारी खात्यांनी काम करणे आवश्यक आहे’’, असे त्यांनी सांगितले. ‘‘नोंदणी खात्याच्या बार्देश, पेडणे, डिचोली, वाळपई, केपे या ठिकाणच्या कार्यालयांचे लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे’’, असेही त्यांनी नमूद केले.
‘‘राज्यात घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना नोंदणी खात्याच्या केंद्रांमध्येच विवाहपूर्व समुपदेशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात सध्या प्रेमविवाह करणाऱ्यांच्या घटस्फोटांची संख्या वाढत असून, त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे’’, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.