गोव्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आहे. या व्हिडीओमध्ये ७५ वर्षांचे बाप्पा नावाचे ज्येष्ठ नागरिक अत्यंत सहजतेने झाडावर चढताना आणि पारंपरिक पद्धतीने ताडी काढण्याचे काम करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, या वयातही ते कोणताही आधार न घेता, आत्मविश्वासाने सायकलवरून फिरताना दिसतात. बाप्पा हे गोव्यातील शिवोली येथे राहतात, अशी माहिती या व्हिडीओसोबत देण्यात आली आहे.
ताडी काढणे आणि ती पुरवणे हे बाप्पांचे रोजचे काम आहे. हे काम केवळ कष्टाचेच नाही, तर त्यासाठी अनुभव, शारीरिक तंदुरुस्ती आणि निसर्गाशी घट्ट नातं असणं गरजेचं असतं. आजच्या आधुनिक युगात अशी पारंपरिक कामे करणारी माणसे दुर्मीळ होत चालली आहेत. त्यामुळेच बाप्पांसारखे लोक पाहून अनेक गोमंतकीय भावूक झाले आहेत.
व्हिडीओमध्ये बाप्पांची साधी राहणी, शांत स्वभाव आणि कामावरील निष्ठा स्पष्टपणे जाणवते. विशेष बाब म्हणजे, बाप्पा मोबाईल फोन वापरत नाहीत, असेही या व्हिडीओत नमूद करण्यात आले आहे. डिजिटल युगापासून दूर राहूनही ते समाधानी आणि स्वावलंबी जीवन जगत आहेत, हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सोशल मीडियावर या व्हिडीओखाली असंख्य प्रतिक्रिया उमटत असून, “हेच खरे गोवावासीय”, “निसर्गाशी नातं जपणारी शेवटची पिढी”, “असा साधेपणा आता क्वचितच दिसतो” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांनी बाप्पांच्या आरोग्याची, मेहनतीची आणि जगण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली आहे.
निसर्गाला इतक्या जवळून ओळखणारी, त्याच्यावर अवलंबून राहूनही समाधानी जीवन जगणारी माणसे आता फारच थोडी उरली आहेत. बाप्पांचा हा व्हिडीओ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, आपल्याला आपल्या मुळांकडे आणि परंपरांकडे पुन्हा एकदा पाहण्यास भाग पाडतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.