म्हादई नदीच्या काठावर निसर्गरम्य अशा नाणूस-वाळपई येथे वसलेले व अल्पावधीतच नावारुपास आलेले अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र सत्तरी तालुक्यातील बेवारस गुरांसाठी वरदानच ठरले आहे. तसेच या परिसराला आध्यात्मिकतेचा वास असल्याने येथे भेट देणारे प्रसन्न मनाने परततात. आज या केंद्रात सुमारे 410 गुरे आहेत. त्यांचे हे दुसरे घर बनले आहे.
नाणूस गोसंवर्धन केंद्राची स्थापन 2008 साली करण्यात आली. ही कहाणीही रंजक आहे. 2007 साली साखरी शेळके व मंगल देसाई या गरिब कुटुंबांच्या दोन गायी चोरीला गेल्या. त्यामुळे हे प्रकरण वाळपई पोलिसांकडे गेले. मंगल देसाई यांची गायीची सुटका करण्यास यश आले, पण साखरी शेळके यांच्या गायीची कत्तल करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. 2008 साली डिचोलीत बेकायदेशीर कत्तलखान्यावर गोप्रेमींनी अचानक धाड टाकून 14 जिवंत गुरांची पोलिसांच्या सहकार्याने सुटका केली. त्यावेळी कोंडवाड्याची सोय नव्हती, त्यामुळे ही गुरे सांतिनेज-पणजी येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली.
दुसऱ्या दिवशी गोप्रेमी रामचंद्र जोशी आणि हनुमंत परब यांनी पणजी येथे कोंडवाड्याला भेट दिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण गुरांसाठी तेथे कसलीच सुविधा नव्हती. त्यामुळे जोशी व परब यांनी गोव्यातील बेकायदा जनावरांचे कत्तलखाने बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर या 14 गुरांचा ताबा न्यायालयाने याचिकादारांकडे दिला. अशा प्रकारे 25 मे 2008 रोजी गोसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यासाठी जोशी परिवारातर्फे पाच एकर जमीन दान करण्यात आली.
गुरांचे पालनपोषण, रक्षण, निगा राखणे हे सर्व काम गोसंवर्धन केंद्रामार्फत केले जाते. केंद्रात एकूण 22 कामगार कार्यरत आहेत. एकूण 410 जनावरांपैकी फक्त 160 जणांच्या खर्चासाठी फंड मिळत आहे. उर्वरीत 250 जनावरांचा खर्च गोशाळेला स्वतःच्या तिजोरीतून किंवा दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून केला जातो. एका गायीसाठी पशूसंवर्धन खात्यातर्फे फक्त 75 रुपये खर्च मिळतो, लवकरच 150 रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र एका गायीमागे सुमारे अडीचशेच्या आसपास खर्च दिवसाला उचलावा लागत आहे. त्यांच्यासाठी बेळगाव येथून पशूखाद्य आणावे लागते.
केंद्राला सरकारमार्फत देण्यात येणारा खर्च हा फारच कमी असल्याने गोसंवर्धन केंद्रातील पदाधिकारी दुधाबरोबरच शेण, गोमूत्राद्वारे निधी जमा करतात. दिवसाकाठी सुमारे 90 लिटर दूध मिळते. हे दूध वाळपई, साखळी, डिचोली, माशेल येथे घरपोच पोचविले जाते. देशी गायींचे दूध असल्याने ते पौष्टिक आहेच, शिवाय त्यापासून ताक, तूप, दही, पेढे बनवितात. तर, गायीच्या शेणापासून बनविलेले खत सेंद्रीय शेतीसाठी उपयोगी ठरते. गोमुत्रापासून अर्क, जंतूनाशक औषध तयार केले जाते. या सर्व माध्यमांतून येणारे पैसे गोशाळेसाठी वापरले जातात.
या गोसंवर्धन केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले सप्तगोमाता मंदिर. हे मंदिर उभारण्याचे कारण म्हणजे ती पहिलीवहिली मंगल देसाई यांची गाय. जेव्हा त्या गायीला देवाज्ञा झाली, त्यावेळी तिची या जागेवर समाधी बांधण्यात आली. त्यावर हे सप्तगोमाता मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचे काम 2017 सुरू झाले. त्यानंतर 2019 साली तत्कालीन राज्यपाल स्व. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. गोव्यात अशा प्रकारचे हे सप्तगोमाता हे पहिलेच मंदिर आहे, जेथे श्रीकृष्ण व गोठ्यात सात गायींचे दर्शन होते. मंदिरावर 22 लाख खर्च झाले आहेत.
डॉ. रघुनाथ धुरे हे गेल्या दोन वर्षांपासून गोप्रेम म्हणून सेवा देत आहे. जनावरांची काळजी घेणे, जखमी अवस्थेत रोज येण्याऱ्या गुरांवर योग्य उपचार करणे, प्रसंगी शस्त्रक्रिया करणे आदी कामे ते करतात. गोसंवर्धन केंद्र हे संशोधन केंद्र आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज, कृषी विज्ञान केंद्र, गोवा दूध संघ, गोवा पशुसंवर्धन केंद्र तसेच निगडीत संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. येणाऱ्या काळात गोशाळेत विविध योजना आखल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे लवकरच सुसज्ज पशुवैद्यकिय इस्पितळ, अध्यात्मिक सेंटर उभारण्याचा मानस आहे. गोशाळेतर्फे रस्त्यावर अपघात सापडलेल्या गुरांना उचलण्यासाठी एका खास यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.