वाळपई : गोमंतकीयांच्या दररोजच्या आहारातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ म्हणजे मासळी. माशाशिवाय घशातून घासच उतरत नाही. सत्तरी तालुकाही याला अपवाद नाही. चोखंदळ ग्राहकांची ही गरज ओळखून वाळपई पालिकेने मासे विक्रेत्यांसाठी सुसज्ज असे मासळी विक्री केंद्र उभारले आहे. येथील विक्रेतेही दररोज स्वच्छ मासळी ग्राहकांना पुरवण्यावर भर देतात. त्यामुळे ग्राहकांना ताजी व स्वच्छ मासळी मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ग्राहकांना स्वच्छ, ताजे मासे मिळावेत, यासाठी वाळपई येथे पालिकेने प्रशस्त मासळी मार्केटची बांधणी केली आहे. या मार्केटमध्ये दहा ते बाराजण मासे विक्रीचा व्यवसाय करतात. हे मासळी केंद्र दररोज पाण्याने स्वच्छ धुवून साफ केले जाते.
गेल्या काही वर्षांपासून वाळपई आठवडा बाजारात काहीजण रस्त्यालगत मासे विकतात. त्यामुळे मार्केटमधील व्यावसायिकांना ग्राहक मिळत नाहीत. साहजिकच त्यांचे नुकसान होते. सरकारतर्फे वाळपईत पालिकेच्या सहकार्याने मासळी मार्केट बांधले आहे. येथे पालिकेने विक्रेत्यांना जागा दिली आहे. या मार्केटमध्ये मासे, बकेट धुण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे येथे चांगले मासे उपलब्ध असतात.
फिरते मासे विक्रेतेही सक्रिय
वाळपई शहराबरोबरच गावागावांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून मासे विक्री करणारे व्यावसायिकही आहेत. दररोज ग्रामीण भागात दुचाकीवर मागील बाजूस टोपली किंवा प्लास्टिक क्रेट ठेवून मासे विक्रीचा व्यवसाय केला जातो. परंतु याचा मार्केटमधील मासे विक्रीवर परिणाम होतो.
रस्त्यालगत विक्रेत्यांचा उपद्रव
मासे विक्रेत्या मंजुळा केरकर म्हणाल्या, आम्ही गेली अनेक वर्षे वाळपई पालिकेला सोपो कर देऊन हा व्यवसाय करतो. आम्हाला येथे पाण्याची चांगली सोय केली जाते. परंतु अन्य पंचायत क्षेत्रांत वाळपई-होंडा मार्गावर काहीजण रस्त्यालगत मासेविक्री करतात. त्याचा प्रतिकूल परिणाम आमच्या व्यवसायावर होतो. रोज सकाळी सहा वाजता मार्केट सुरू होते. दुपारी ग्राहकांची वर्दळ कमी असते. सायंकाळीही काही प्रमाणात ग्राहक असतात.
वाळपईत मिळते दर्जेदार मासळी!
वाळपईत बांगडे, तारली, इसवण, खुबे आदी मासे विकले जातात. त्यांना मोठी मागणी असते. पहाटेपासून मासे आणण्याचे काम केले जाते. रोज पहाटे मडगाव येथून मासे विक्रेते विविध प्रकारचे मासे आणतात. त्यामुळे सकाळी लोकांना ताजे मासे उपलब्ध होतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.