Goa University Dainik Gomantak
गोवा

Paper Leak Issue: विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकांची चोरी उघड; चौकशी समितीचा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर ठपका

Goa University: गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात झालेली ‘चोरी’, प्रश्‍नपत्रिका आपल्या विद्यार्थी-मैत्रिणीला देण्याचा प्रकार व तिला चांगले गुण मिळवून देणे आदींवर आता गोवा सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात झालेली ‘चोरी’, प्रश्‍नपत्रिका आपल्या विद्यार्थी-मैत्रिणीला देण्याचा प्रकार व तिला चांगले गुण मिळवून देणे आदींवर आता गोवा सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. साहाय्‍यक प्राध्‍यापक प्रणव नाईक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर या प्रकरणी ठपका ठेवण्‍यात आला आहे.

गोमन्तक’च्या वृत्तानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती व त्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांच्या नेतृत्वाखाली चारजणांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. त्या समितीत निवृत्त पोलिस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज, माजी प्रा. किरण बुडकुले आणि व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाचे डॉ. एम. आर. के. प्रसाद सदस्य सचिव होते.

चौकशी समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भौतिकशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांनी बनावट चाव्या वापरून आपल्या सहकारी प्राध्यापकांच्या केबिनमध्ये प्रवेश करून प्रश्‍नपत्रिका ‘चोरून’ त्या आपल्या मैत्रीण - विद्यार्थिनीला दिल्या होत्या काय, शिवाय विद्यापीठातील अतिसंवेदनशील सामग्री किती सुरक्षित असते, यावर चौकशी करायची होती.

समितीने तीन महिन्यांत याबाबतीत संपूर्ण संशोधन करून आज सायंकाळी आपला अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. समितीने आपल्या अहवालात विद्यापीठाचा एकूणच गैरकारभार, प्राध्यापकांचा हलगर्जीपणा, कुलगुरू हरिलाल मेनन यांची वागणूक, बेजबाबदार वर्तन यांवर कडक ताशेरे ओढले आहेत.

पेपर फोडण्याचे कृत्य

‘‘प्रा. प्रणव नाईक यांनी निश्‍चितपणे पेपर फोडण्याचे कृत्य केले व ते एक विद्यार्थिनी स्नेहल हसोलकर हिला लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने होते, हे या तपासात आढळले तर आहेच, शिवाय ते यापुढेही तिच्यासाठी पेपर फोडण्याची शक्यता होती’’, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले. आहे.

प्रणव नाईक हे आपल्या सहकारी प्राध्यापक डॉ. रेश्‍मा राऊत देसाई यांच्या केबिनमध्ये ३१ जुलै २०२४ आणि प्रा. कौस्तुभ प्रियोळकर यांच्या केबिनमध्ये ८ ऑगस्ट २०२४ रोजी बेकायदेशीर व अनधिकृतपणे शिरले होते.

 ‘प्रा. प्रणव नाईक यांनी बनावट चाव्या वापरून प्राध्यापकांच्या कार्यालयात घुसण्याचे कृत्य करूनही त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्यात अक्षम्य हयगय, प्रशासन बेजबाबदार’

नाईकने केवळ प्रश्‍नपत्रिकाच नव्हे, तर विद्यार्थिनीच्या शेजारी बसून उत्तरपत्रिका सोडविण्यास केली मदत.

मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात नोंदविलेली निरीक्षणे

भौतिकशास्त्र विभागातील तीन प्राध्यापकांच्या केबिनमध्ये शिक्षक प्रणव नाईक यांनी बेकायदा प्रवेश केला, त्यासाठी डुप्लिकेट चाव्या वापरल्या, कार्यालयीन वेळेच्या पश्‍चात त्यांनी हे कृत्य केले, त्यासाठी आपल्या कृत्याचे योग्य समर्थन ते करू शकले नाहीत. प्राध्यापक व डीन यांनी प्रणव नाईक यांचे हे कृत्य बेकायदा व समर्थनीय नसल्याची जबानी दिली.

प्राध्यापकांनी आपल्या प्रश्‍नपत्रिका केबिनमध्ये ठेवल्या होत्या व काहींच्या लॅपटॉपमध्ये होत्या. त्या चोरण्याच्या हेतूनेच प्रणव नाईक यांनी केबिनमध्ये प्रवेश केला होता, असे अनुमान चौकशी समितीने काढले आहे.

प्रणव नाईक यांनी कार्यालयातून कोणाचीही मान्यता न घेता या डुप्लिकेट चाव्या चोरल्या व त्यापूर्वी कोणाचीही मान्यता घेतली नाही. चार वर्षे ते चाव्या बाळगत होते. त्यांनी त्या स्वत: बनवून घेतल्या होत्या. ते या केबिनमध्ये का गेले, हे सांगताना खोटे बोलले.

नाईक यांनी प्रश्‍नपत्रिका चोरल्या व विद्यार्थिनीला खुलेआम मदत केली, अशी जोरदार चर्चा विद्यापीठ आवारात सुरू असूनही विद्यापीठ प्रशासनाला त्याची दखल घेऊन चौकशी करावीशी वाटली नाही. विद्यापीठाची ही हलगर्जी विद्यार्थ्यांच्या नीतीधैर्यावर परिणाम करणारी असून अत्यंत बेजबाबदारपणाची असल्याचे चौकशी समितीने नोंदविले आहे. त्याबाबत विद्यापीठ अत्यंत बेफिकीर व बेमुर्वतखोरीने वागले.

प्रणव नाईकची विद्यार्थिनीला अशिष्ट मदत

चौकशी समितीसमोर प्रा. प्रणव नाईक याचे त्या विद्यार्थिनीबरोबरचे अशिष्ट नातेसंबंध उघडकीस आले. पार्सेकर कॉलेजमध्ये शिकवत असता नाईक याची त्या विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्यानंतर विद्यापीठात प्रश्‍नपत्रिका सोडवितानाही तो तिला मदत करू लागला. ती प्रश्‍नपत्रिका लिहित असता मोबाईल पाहात असे. यावरून तिला प्रणव उत्तरे पाठवत असावा. शिवाय ती विद्यार्थिनी त्याच्या केबिनमध्ये सतत जात असे व अनेकवेळा केबिन आतून बंद केल्याचे विद्यार्थ्यांना आढळून आले.

रात्री आठ वाजल्यानंतरही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला आहे. घरी जातानाही प्रणव नाईकच्या मोटारीतून ती प्रवास करे. तो करासवाड्याला तिला घरी सोडून आपल्या काणका- म्हापसा येथील घरी परतत असे. त्यातून प्रणव याचे संबंध व तिला करीत असलेली मदत शाबित होत असल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे. प्रणव नाईक याच्यासह विद्यार्थिनी स्नेहल हसोलकर हिच्या विरोधातही कारवाई आवश्‍यक असल्याचे समितीने सुचविले आहे. हा प्रकार घडून वर्ष उलटून गेले तरी विद्यापीठाने कोणावर कारवाई केली नाही, याबाबतही समितीने रोष व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Annabhau Sathe: अण्णांचा रशिया दौरा कसा होता? तेथील धर्म, वर्ण, स्त्री समानता याबाबत त्यांनी काय निरीक्षण नोंदवले?

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

SCROLL FOR NEXT