काल या जगाच्या रंगमंचावरून एक्झीट घेतलेले प्रसिद्ध तियात्रिस्त मायक मेहता यांनी गोव्यात होणारी स्थलांतरितांची वाढ यावर आधारित लिहिलेला ‘गोंय विकले घाटार’ हा तियात्र अत्यंत गाजला होता. त्यामुळे मायक मेहता यांना सर्व तियात्र रसिकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. सध्या जी गोव्यात परिस्थिती आहे त्याचे भाकीत या भविष्याची पावले जाणणाऱ्या या तियात्रिस्ताने कित्येक वर्षापूर्वी करून ठेवले होते. ‘गोंय आनी गोंयकारपण’ या दोन्ही बाबतीत अगदी सच्चा दिलाचा कलाकार म्हणून मायकची ओळख होती, पण दुर्दैव असे की, त्यांच्या एकही तियात्राच्या दिग्दर्शनासाठी त्यांना कुणीही बक्षीस दिले नाही. त्यामुळेच या पक्षपाती धोरणाला कंटाळून मायक यांनी आपल्या शेवटच्या काळात इंग्रजी नाटकांची कास धरली. अशा या तियात्रकलाकाराला आता मरणोत्तर तरी उचित न्याय मिळून गौरव होणार का? ∙∙∙
हल्लीच दवर्ली-दिकरपाल ही पंचायत जी भाजपच्या हातात होती ती का निसटली? यावर सध्या उलटसुलट चर्चा चालू आहे. याच चर्चेच्या मंथनातून एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे, एक भाजप समर्थक सदस्याचे ‘कन्याप्रेम आड’ आल्याने ही पंचायत भाजपला हातची गेली. या सदस्याच्या मुलीला म्हणे, विरोधी गटातील सदस्याच्या साहाय्याने एका शाळेत शिक्षिकेची नोकरी प्राप्त झाली आणि त्याचीच परतफेड त्या सदस्याला पाठिंबा देऊन भाजप समर्थक सदस्याने केली. दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार मडगाव पालिकेच्या बाबतीतही झाला होता. एका नगरसेवकाच्या मुलीला मडगाव पालिकेत नोकरी देतो असे सांगून फोडले होते व त्याला भाजपकडे ओढण्यात आले होते. मात्र, या नगरसेवकाच्या मुलीला अजूनही नोकरी मिळालेली नाही. म्हणतात ना, असते एकेकाचे नशिब. ∙∙∙
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गोव्यात सध्या आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न करू लागला आहे. शरद पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे होती, तेव्हा गोव्यात युतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकांमध्ये काही जागांवर उमेदवार उभा करीत होते. पक्षाला यश आले नाही तरी उमेदवार देण्याचे काम पक्षाकडून इमानेइतबारे केले जात होते. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविलेले आणि काँग्रेस सरकारात मंत्री राहिलेले जुजे फिलीप डिसोझा हे त्यावेळीपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिले. पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जुजे यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष शोधावा लागत आहेत. पक्षाने मागील काही दिवसांत विविध स्पर्धा घेत आपले बस्तान बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्ष अजूनही प्रदेशाध्यक्ष शोधात आहे. जोपर्यंत पक्षाचे सर्वेसर्वा म्हणजेच अजित पवार स्वतः गोव्यात येत नाहीत, तोपर्यंत त्याविषयी पक्षाकडे कोणी जाणार नाही, हेही खरे आहे. परंतु पणजीतील माजी महापौरांनी प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यास स्वीकारण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
उगवे येथे गोळीबार होऊन रेती काढणारे कामगार जखमी झाले. या प्रकरणी अवाक्षर काढण्यास कोणी तयार नाही. तेथे रेती पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय काढलीच जाऊ शकत नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यांची खास पोलिसी पद्धतीने चौकशी केली. ती चौकशी काय होती याबाबत ते कोणाशीही बोलण्यास तयार नाही. बोललो तर यापुढे रेती काढता येणार नाही अशी भीती काही जणांना सतावत आहे अशी स्थानिकांत चर्चा आहे. यातून गोळीबाराचे खापर आता कोणावर फोडले जाते याकडे अनेकांचे लक्ष त्याचमुळे लागले आहे. ∙∙∙
आय लीग स्पर्धा विजेतेपदाच्या करंडकाबाबत आम्ही नाही देत जा... अशी चर्चिल ब्रदर्सने घेतलेली भूमिका क्रीडा वर्तुळात खळबळ उडवणारी ठरली आहे. यामुळे आयोजकांना दुसरा करंडक तयार करून विजेते ठरलेल्या इंटरकाशी संघाला देण्याची वेळ आली आहे. या स्पर्धेत आधी चर्चिल ब्रदर्सना विजयी ठरवण्यात आले होते. एप्रिलमध्ये त्यांना विजेतेपदाचा करंडकही देण्यात आला होता. या निकालाविरोधात स्वीत्झर्लंडमधील क्रीडा लवादाकडे दाद मागण्यात आल्यानंतर इंटरकाशी संघाला विजेते घोषित करण्यात आले तर चर्चिल ब्रदर्स उपविजेता ठरला. यामुळे भारतीय फुटबॉल महासंघाने चर्चिल ब्रदर्सकडे करंडक परत मागितला. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करत चर्चिल ब्रदर्सने करंडक देण्यास नकार दिला आणि तो चर्चेचा विषय ठरला आहे. ∙∙∙
पर्वरी येथे एका टेम्पो चालकाला लुटल्याचे प्रकरण पोलिसांनी सोडवले तरी त्यातून राज्यातील कायद्याचा नसलेला धाक समोर आला आहे. संशयितांनी पोलिसांचा गणवेश परीधान केला. टेम्पो चालकाची तपासणी करण्याच्या बहाण्याने तब्बल ८ लाख रुपये लांबवले असे हे प्रकरण आहे. पुण्यातून यासाठी संशयित गोव्यात येतात. पोलिसांचे पाणी जोखत गुन्हा घडवतात आणि पसार होतात. यातून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्यांचा धाक आता कमी झाल्याचे दिसते. गुन्हेगार निर्ढावले की पोलिसांची धास्ती कमी झाली हा चर्चेचा विषय बनला आहे. पण गुन्हे करण्यासाठी बांगलादेशातूनही लोक येतात यावरून बरेच काही समजता येते म्हणा ना. ∙∙∙
मंत्रिपदाची प्रचंड इच्छा असलेले मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्याकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चार दिवसांपूर्वी मलनिस्सारण महामंडळ सोपवले. परंतु, आमोणकर यांनी अद्याप या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा ताबा स्वीकारलेला नाही. रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त मंत्रिपदी आपली वर्णी लागेल असा विश्वास त्यांना होता. पण, महामंडळ पदरात पडल्यामुळे मंत्रिपद मिळेल की नाही, याची शाश्वती त्यांना नसल्याने त्यांनी या पदाचा ताबा न घेतल्याचे त्यांचे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत. याआधी संकल्पनी बाल भवनचे अध्यक्षपद नाकारले होते. त्यामुळे मलनिस्सारण महामंडळाचे अध्यक्षपद ते घेणार की अजून मंत्रिपदाची प्रतीक्षा करणार? याकडे मुरगाववासीयांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙
पणजीतील जुना पाटो पूल माहित नाही, अशी व्यक्ती नसेल. अत्यंत प्राचीन असलेल्या या पुलाच्या क्षमतेची चाचणी सध्या घेण्यात येत आहे. ही चाचणी सरकार नव्हे, पण सरकारी आशिर्वादाने घेतली जात आहे. या पुलाच्या आसपास अनेक रेस्टॉरंट, क्लब, पब आहेत. नाईट लाईफ एन्जॉय करणाऱ्यांची तेथे कमी नसते. शुक्रवारी, शनिवारी ही संख्या वाढते. त्यांच्या गाड्या जुन्या पाटो पुलावर पार्क केल्या जातात. एरव्ही वाहतूक पोलिस नियमभंग करणाऱ्यांना पावत्या देण्यात कसूर करत नाहीत. या जुन्या पाटो पुलावर बेकायदेशीरपणे पार्क केल्या जाणाऱ्या गाड्या वाहतूक पोलिसांना कशा दिसत नसाव्यात? याची अर्थपूर्ण चर्चा मात्र ऐकू येत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.