Goa Politics : खरी कुजबुज, गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण?

Khari Kujbuj Political Satire : माजी कृषीमंत्री रवी नाईक यांच्‍या निधनामुळे रिक्त झालेल्‍या फोंड्याच्‍या जागेसाठी सहा महिन्‍यांत पोटनिवडणूक होईल.
Khari Kujbuj Political Satire
CM Candidate GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण?

‘उदंड झाली समाज माध्यमे’ असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. समाज माध्यमावर अनेक ‘सेफॉलोजिस्ट’, विद्वान, भविष्यकार व ज्ञानी तयार होऊ लागले आहेत. निवडणुकीत कोण जिंकणार, याचा सर्व्हे अनेक ‘यू ट्यूबर’नी जाहीर केला आहे. आता काही राजकारणी अशा ‘यू ट्यूबर’ना व ‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर’ना हाताशी धरून स्वतःची जाहिरात करताना दिसतात. गोव्यातील एका ‘यू ट्यूबर’ने गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण ? यावर सर्व्हे सुरू केला आहे. ‘सोशल मीडिया’ वापरणाऱ्यांनी भावी मुख्यमंत्री कोण हे ठरवायचे असते. यात विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव व गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व्हेत सगळ्यांत जास्त मते विजय सरदेसाई यांना पडली आहेत. आतापर्यंत आपले मत नोंदविलेल्या पैकी ७५ टक्के लोकांनी सरदेसाई यांच्या नावापुढे फुली मारली आहे, तर १९ टक्के लोकांनी विरोधी पक्षनेते युरी भावी मुख्यमंत्री असा निर्णय दिला आहे तर केवळ तीन टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्र्याचे नाव घेतले आहे. याचा अर्थ असा बिलकुल नाही, की मुख्यमंत्र्यांचे वलय कमी होते. या दावेदारांचे समर्थक मतदान करा, म्हणून आवाहन करीत असल्यामुळे समाज माध्यमावर विरोधकांच्या पारड्यात जास्त मते मिळाली असावीत, असा अंदाज भाजपवाले लावताहेत.∙∙∙

शिरोडा, फोंडा अन् युतीचा धर्म

सध्‍या गोव्‍यात मगो पक्षाची भाजप पक्षाशी युती असल्‍याने फाेंडा मतदारसंघात मगो पक्ष भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार असे मगाेचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी जाहीर केल्‍यानंतर ‘मगाे’चे डॉ. केतन भाटीकर यांनी आपण फोंड्यातून पोटनिवडणूक लढविणार, असे जाहीर करून बंडाचे निशाण फडकावले. या घटनेनंतर सध्‍या फोंड्यात मगो पक्षाच्‍या दुटप्‍पी भूमिकेबद्दल चर्चा चालू आहे. यापूर्वी शिरोडा येथे जी पोट निवडणूक झाली त्‍यावेळी सरकारबरोबर युतीत असतानाही ‘मगो’ने भाजप उमेदवाराला पाठिंबा न देता स्‍वत: निवडणूक लढविण्‍याचा निर्णय घेतला होता. त्‍यामुळे ही युतीही तुटली होती. शिरोड्यात जर ‘मगो’ने युतीचा धर्म न पाळण्‍याचा निर्णय घेतला होता, तर तसाच निर्णय आता फोंड्याबाबत का नाही, असा प्रश्‍न सध्‍या विचारला जात आहे.

शेवटी त्‍याला सेवावाढ मिळालीच नाही!

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍या मी मर्जीतील. त्‍यामुळे मी पुन्‍हा एकदा सेवावाढ घेऊन येणार, असे सांगून आपल्‍या सहकाऱ्यांवर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या त्‍या सरकारी उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या उपप्राचार्याला शेवटी सेवावाढ मिळालीच नाही. आपल्‍या अंगावर काहीही आले तर विद्यालयाच्‍या पालक शिक्षक संघाची ढाल म्‍हणून वापर करणाऱ्या या उपप्राचार्याने आपल्‍याला सेवावाढ मिळावी यासाठी पालक शिक्षक संघाकडून एक शिफारस पत्रही शिक्षण खात्‍याला पाठविले, पण त्‍याचा काही फायदा झाला नाही. एकाबाजूने सेवावाढ मिळाली नाही आणि दुसऱ्याबाजूने एका शिक्षिकेने दाखल केलेल्‍या एका तक्रारीच्‍या कात्रीत सध्‍या हा बिचारा सापडला आहे. त्‍यातून बाहेर कसे पडावे, याच चिंतेत म्‍हणे सध्‍या आहे. ∙

विश्‍‍वास की दावा?

माजी कृषीमंत्री रवी नाईक यांच्‍या निधनामुळे रिक्त झालेल्‍या फोंड्याच्‍या जागेसाठी सहा महिन्‍यांत पोटनिवडणूक होईल. मगो आणि भंडारी समाजाच्‍या मागणीची दखल घेत भाजप पोटनिवडणुकीसाठी रवींचे ज्‍येष्‍ठ सुपूत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देईल, असे बहुतांश जणांना वाटत आहे. परंतु, भाजपच्‍या उमेदवारीसाठी इच्‍छुकांची संख्‍या वाढत चालली आहे. ‘मगो’चे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी भाजपकडूनही आपल्‍याला उमेदवारी मिळू शकते, असे वक्तव्‍य काही दिवसांपूर्वी केले होते. त्‍यानंतर पक्षाने उमेदवारी दिल्‍यास आपलीही लढण्‍याची तयारी असल्‍याचे रवींचे कनिष्‍ठ सुपूत्र रॉय नाईक यांनी सांगितले. तर, आता भाजपचे फोंड्यातील नेते विश्‍‍वनाथ दळवी यांनी, आपण पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्‍याने उमेदवारी देताना पक्ष आपल्‍या नावाचा विचार करेल. ही उमेदवारी मलाच मिळेल, असा ठाम विश्‍‍वास व्‍यक्त केला. परंतु, दळवी यांनी खरोखरच विश्‍‍वास व्‍यक्त केला की उमेदवारीवर दावा केला? असा प्रश्‍‍न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

काँग्रेसचा बहिष्कार!

‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ अशी गत राज्यातील विरोधी आमदारांची ‘माझे घर’ योजनेबाबत झाली आहे. ‘माझे घर’चे श्रेय भाजप घेत असून विरोधी आमदार योजनेला पाठिंबा देऊ शकत नाहीत, कारण फायदा भाजपला होणार आणि विरोध करू शकत नाही. कारण विरोध केला तर ‘माझे घर’चे लाभार्थी मतदार नाराज होणार. म्हणूनच काल कुंकळ्ळी व केपे मतदारसंघात आयोजित ‘माझे घर’ च्या अर्ज वितरण कार्यक्रमावर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी व त्यांच्या समर्थकांनी बहिष्कार टाकला असावा. युरी कुंकळ्ळीतील कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. युरी समर्थक नगराध्यक्ष व नऊ नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. केपेत आयोजित कार्यक्रमावर एल्टन यांनी पाठ फिरवली. आता पाहू बहिष्कार टाकणारे विरोधक ‘माझे घर’ चे फॉर्म भरतात की नाही ते!.

मुख्यमंत्री उवाच; ‘मदत विसरू नका’!

ज्यानी आपल्यावर उपकार केले, त्यांचे उपकार मानावेत, हा माणसाचा गुणधर्म. राज्य सरकारने गोव्यात ‘माझे घर’ही अभिनव योजना राबविण्यास सुरवात केली आहे. या योजनेचा सुमार लाखभर कुटुंबांना लाभ मिळेल, असा कयास आहे. ज्यांच्याकडे घराची मालकी नाही व मालकी हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्यांना ‘माझे घर’ लाभदायी ठरेल, असा दावा करण्यात येतो. मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रत्यक्ष या योजनेचे अर्ज वितरण करीत आहेत. हा सगळा प्रपंच सरकारी असला तरी मुख्यमंत्री बोलता बोलता या योजनेचा फायदा घेणाऱ्यांना सांगण्यास विसरत नाहीत, की आम्ही म्हणजे भाजप सरकारने तुमची मदत केली. आता निवडणुकीत भाजपला मते देऊन उपकाराची परत फेड करायला विसरू नका. जनता अर्ज घेताना मुख्यमंत्र्यांना उपकाराची परतफेड करण्याची हमी देत असली तरी निवडणुकीत ही आठवण ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी ठेवणार का ? हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

बदल, प्रदेशाध्यक्ष बदलाच्‍या चर्चांमुळे?

काही दिवसांपूर्वी राज्‍यात काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष बदलाबाबतच्‍या चर्चांनी जोर धरलेला होता. काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव अंजली निंबाळकर किंवा इतर कोणत्‍याही या विषयावर भाष्‍य केलेले नव्‍हते. परंतु, काँग्रेसमध्‍ये कधीही काहीही होऊ शकते हे माहीत असल्‍यामुळे कार्यकर्त्यांतही संभ्रम पसरलेला होता. विद्यमान प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर पदाला योग्‍य न्‍याय देत नसल्‍याने त्‍यांना हटवून गिरीश चोडणकर यांच्‍याकडे पुन्‍हा प्रदेशाध्‍यक्षपद देण्‍यात येईल, असेही काही पदाधिकारी खासगीत सांगत होते. परंतु, असे काहीच न झाल्‍याने चर्चा करणारे सगळेच गप्‍प झाले. आता हा एपिसोड संपल्‍यानंतर पाटकर भलतेच आक्रमक झाले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरून ते सरकारला धारेवर धरत आहेत. त्‍यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांतही उत्‍साह पसरला आहे. पण, पाटकरांमध्‍ये झालेला हा बदल प्रदेशाध्‍यक्ष बदलाच्‍या चर्चांमुळे तर नाही ना? असा सवाल काँग्रेस कार्यकर्ता स्‍वत:लाच विचारत आहे.

संजीवनीला ‘संजीवनी’ मिळेल?

धारबांदोडा येथे संजीवनी सहकारी साखर कारखाना होता. होता म्‍हणण्याचे कारण एवढेच की, आणखीन दोन चार वर्षांनी कारखाना इतिहासजमा झालेला असेल. कारखाना सुरू करू असे सरकार सांगत आले असले तरी प्रत्यक्षात तसे काही घडलेले नाही. उस उत्पादक शेतकऱ्यांचा आता धीर सुटत चालला आहे. हयातभर ऊस पिकाची शेती केल्यानंतर आता नव्या पिकाकडे वळण्याचे धाडस ते करू शकत नाहीत. सरकारने ऊस विकत घेण्याचे आश्वासन दिले असले तरी केवळ आश्वासनावर वर्षानुवर्षे ऊस लागवड करत राहण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे संजीवनी कारखान्याला सरकार खरोखर संजीवनी देणार का, अशी विचारणा ते करू लागले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

गोळीबारामागील कारण काय?

उगवे येथे बेकायदा रेती उपसा करणा-यांवर गोळीबार करणा-यांना अजून पकडणे पोलिसांना शक्य झालेले नाही. या प्रकरणाचा कसून तपास असल्याचे सांचतेबध्द उत्तर अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. काहींच्या मते संशयित लगतच्या महाराष्ट्रात पळून गेल्याचा संशय आहे. आता या घटनेला दिवस उलटून जात असून तपासात विशेष प्रगती दिसत नसल्याने भविष्यात पोलिसांकडून तसाच दावा नाकारता येत नाही, असे या प्रकरणावर बारीक नजर ठेवून असलेले म्हणू लागलेत. या भागात सर्रासपणे बेकायदा वाळूचा उपसा चालू असतो, असे असतानाही सरकारने नेमलेले अधिकारी व भरारी पथके कधी फिरकलेली दिसत नाहीत, पण तोही मुद्दा नाही. हा गोळीबार नेमका कोणी व कशासाठी केला, या व्यवसायातील स्पर्धेतून तर तो घडलेला नसावा ना, की या बेकायदा व्यवसायामुळे झळ बसलेल्यांकडून तो झालेला असेल, असे अनेक कयास सध्या उगवे व परिसरांत बांधले जात आहेत. ∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com