युरोपियन देशात जगभरातील वकिलांसाठी फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाते. मागील वर्षापासून भारतीय वकिलांचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. या संघात गोव्यातील खेळाडूंचाही समावेश असतो जे पेशाने वकील आहेत.
हल्लीच स्पेन येथील लॅायर्स वर्ल्ड कप मध्ये विजेत्या ठरलेल्या भारतीय वकिलांच्या संघामध्ये देखील गोव्यातील खेळाडूंचा समावेश होता. स्पेन मधील कॅशेवर्ल्ड असोसिएशन ने फक्त वकिलांसाठी आयोजित केलेल्या एलिट वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेमध्ये हा संघ विजेता ठरला.
ही स्पर्धा मास्टर्स आणि क्लासिक अशा २ गटांमद्धे घेण्यात आली. ४० वर्षांवरील वकिलांच्या संघासाठी मास्टर्स गट तर क्लासिक गटासाठी वयोमार्याद ठेवण्यात आली नव्हती. यामधील क्लासिक गटाचे विजेतेपद भारतीय संघाने पटकाविले ज्याचे नेतृत्व गोव्यातील हर्षद नाईक याने केले.
दोन्ही गटातील भारतीय संघात मिळून २० गोमंतकीयांचा सहभाग होता पैकी ४ गोमंतकीय क्लासिक संघात आणि उर्वरित १६ गोमंतकीय मास्टर्स गटाच्या संघातर्फे खेळले. या एलिट वर्ल्ड कप ची ही सातवी आवृत्ती होती असे क्लासिक संघाचा कप्तान हर्षद नाईक याने सांगितले.
एलिट वर्ल्ड कप मध्ये सहभागी होण्याची भारतीय संघाची ही दुसरी वेळ. गेल्यावर्षी भारतीय संघ मोरोक्को येथे पार पडलेल्या वर्ल्ड कप चा उपविजेता होता. त्यावर्षी चा विजेता ठरलेल्या बेल्जियम संघाकडून भारतीय वकिलांना हार पत्करावी लागली होती.
परंतु यावर्षी आपल्या खेळाची चुणूक दाखवीत भारतीय संघाने विजेतेपद पटकाविले. या संपुर्ण स्पर्धेदरम्यान नेदरलँड संघाबरोबर खेळताना आमचा कस लागला कारण त्यांचा खेळण्याचा वेग आमच्यापेक्षा खूप जास्ती होता असे हर्षद ने सांगितले.
युरोपियन फुटबॉल हा प्रतिभावान आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन आम्हाला त्याचा अनुभव घेता आला. आमच्याबरोबर बेंगलोर आणि बेळगाव येथील खेळाडू क्लासिक संघात होते. दर आठवड्याला आम्ही पणजीच्या डॉन बोस्को फूटसाल मैदानात सराव करायचो. बेंगलोर आणि बेळगावचे खेळाडू त्यासाठी गोव्यात येत असत अशी माहिती हर्षद ने ‘गोमंतक’शी बोलताना दिली.
डेनी रोजारीओ आणि मौरो मिनेजिस यांनी १५ वर्षांपूर्वी राज्यपातळीवर वकिलांच्या फुटबॉल स्पर्धा भरवायला सुरवात केली होती. वकिलीची तणावपूर्ण नोकरी करताना स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी कुठल्यातरी क्रीडाप्रकाराची गरज असते.
गोवेकर असल्याने आम्ही फुटबॉल हा खेळ निवडला आणि या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंच केली यांचा आम्हाला अभिमान. राज्यपातळीनंतर आपण राष्ट्रीय पातळीवर ८ संघामध्ये फुटबॉल स्पर्धा आयजित केली असे डेनी यांनी सांगितले.
गेल्यावर्षी मोरोक्को येथे स्पर्धेत भाग घेण्याआधी त्या आयोजकांशी माझे सतत बोलणे व्हायचे पण तुम्हा भारतीयांना फुटबॉल मधलं काय कळतं तुम्ही क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे असे सांगून टाळण्यात आले. पण आम्ही भारतीय वकील फुटबॉलसाठी ओळखले जाऊ असा आपण त्यांना दिलेला विश्वास सिद्ध करता आला यात मला समाधान आहे असे डेनी म्हणतात.
भारतीय वकिलांनी स्पेनमध्ये वर्ल्डकप वर देशाचे नाव कोरले ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. युरोपियन फुटबॉल एवढा प्रतिभावान असताना त्यांचा देशात त्यांना हरवून विजेतेपद पटकावणे हे सर्व स्वप्नवत वाटते. फक्त काम एके काम न करता आम्ही वकील खेळातदेखील नाव कामवू शकतो हे आम्ही सिद्ध केले आहे आणि हा खेळ आम्ही अजून उंचीवर नेऊन ठेऊ.डेनी रोजारीओ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.