Farm To School Activities In Goa शाळेतील चार भिंतीच्या कक्षेबाहेर जात, पिळगाव येथील आयडीयल हायस्कूलचे विद्यार्थी चक्क शेतीत उतरले. विद्यार्थ्यांनी चक्क चिखलात उतरून शेती लागवडीची माहितीही मिळवली. विद्यार्थ्यांनी चिखलात उतरून तरव्याची लावणीही केली.
विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाची माहिती व्हावी आणि शेतीबद्दल प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयडीयल हायस्कूलच्या ‘एनसीसी’ विभागातर्फे बुधवारी (ता.२) हा उपक्रम राबविण्यात आला होता.
‘एनसीसी’चे साहाय्यक अधिकारी शिक्षक लक्ष्मण लांबोर यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्यासह ‘एनसीसी’ विभागाच्या मुली मिळून ५० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
आजपर्यंत आम्ही शेतीबद्दल ऐकून होतो. मात्र, शेतकरी मशागत करून शेती लागवड कशी करतात. किती मेहनत घेतात. त्याबद्दल आम्हाला प्रत्यक्ष काहीच माहीत नव्हते. मात्र, शाळेने ही संधी मिळवून दिली.
शेतातील चिखलात राहून तरवा काढून त्याची लावणी करताना मजा तर आली, असे गौतमी चोडणकर आणि अन्य विद्यार्थ्यांनी सांगून शाळेला धन्यवाद दिले.
विद्यार्थी शेतीकामात रंगले
शेतीत साधारण गुडघाभर चिखल होता. तरीही त्याची पर्वा न करता विद्यार्थी मोठ्या उमेदीने शेतीत उतरले. विद्यार्थ्यांनी सुमारे दोन तास चिखलात राहून तरवा काढतानाच तरव्याची लागवडही केली. पिळगावमधील महाबळेश्वर परब गावकर यांच्यासह शेतीत काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शेतीविषयी माहिती मिळावी. विद्यार्थ्यांना शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे. यासाठी शाळेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासह शेती व्यवसायाकडेही लक्ष केंद्रित करावे. - लक्ष्मण लांबोर, शिक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.