Aadhar Card Technical Problem आधार कार्ड आज महत्त्वाचे ओळखपत्र आहे. केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात येणाऱ्या या कार्डवर बारा आकडी क्रमांक दिलेला असतो. प्रत्येकाला स्वातंत्र क्रमांक मिळत असल्याने हे कार्ड युनिक मानले जाते.
परंतु सत्तरीतील दोघा महिलांना आधार कार्डवरचे क्रमांक समान मिळाल्यामुळे या दोघाही महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सोनाळ, सत्तरी येथील मालिनी विष्णू गावकर आणि दाबोस येथील लक्ष्मी नारायण धुरी या दोन्ही महिलांच्या आधार कार्डवर समान क्रमांक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मालिनी गावकर यांनी 12 वर्षापूर्वी आधार कार्डसाठी नोंदणी केली, परंतु कित्येक महिने वाट पाहिल्यानंतर त्यांना कार्ड मिळाले नाही, त्यामुळे या कार्डसाठी त्यांनी नव्याने नोंदणी केली व कार्ड मिळवले.
या कार्डावर नाव, गाव, फोटो सर्व होते. मालिनी या गरीब महिला असून घरातील जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्या पंचायत क्षेत्रात रोजंदारीवर काम करून आपले व मुलांचे पोट भरतात. सोनाळ हे गाव सावर्डे पंचायत क्षेत्रात मोडते.
या पंचायतीच्या पंतप्रधान रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या कामाला जात. परंतु या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे बचत खात्यात जमा होतात. मात्र मालिनी यांना बरेच दिवस खात्यात पैसे जमा होत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी याबाबत पंचायतीला कळवले.
पंचायतीने चौकशी केली असता मालिनी यांच्या नावावरील पैसे अन्य एका महिलेच्या खात्यात जमा होत असल्याचे आढळून आले. ही महिला दाबोस येथील लक्ष्मी धुरी असून मालिनी व लक्ष्मी यांचा आधार कार्ड क्रमांक एकच असल्याचे चौकशीत समोर आले.
याबाबत लक्ष्मी धुरी यांच्याशी संपर्क साधला असला,त्यांनीही 12 वर्षांपूर्वी आधार कार्डसाठी नोंदणी केली होती. त्यावेळी त्यांना जे कार्ड मिळाले त्यावर नाव, गाव, जन्म तारीख वगेरे व्यवस्थित होते. मात्र कार्डवरील फोटो अन्य महिलेचा होता.
त्यानंतर लक्ष्मी यांनी आधार कार्डसाठी दुरुस्ती अनेकदा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. दरम्यान, मालिनी यांच्या कष्टाचे पैसे लक्ष्मी यांच्या खात्यात जमा झाल्याने हा घोळ समोर आला आहे.
हा प्रकार समोर आल्यापासून या दोघाही महिल्यांनी आधार क्रमांक दुरुस्तीसाठी राज्यातील वेगवेगळ्या कार्यालयांत अनेकदा खेपा घातल्या, परंतु सर्वत्र निराशाच त्यांच्या पदरी आली आहे.
मुंबईला जाण्याचा सल्ला
आधार क्रमांकाचा गोंधळ लक्षात आल्यानंतर मालिनी यांनी दुरुस्ती करून घेण्यासाठी बरीच धावपळ केली. सुरवातीला वाळपई आरोग्य केंद्रातील आधार केंद्रात जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर पर्वरी येथील मुख्य केंद्रातही हेलपाटे मारले. टोल फ्री क्रमांकांवर तक्रार नोंदवा किंवा येथून प्रतिसाद मिळत नसल्यास मुंबईत जाऊन दुरुस्ती करण्याचा सल्ला या केंद्रातून दिला.
गावकर कुटुंब निराश...
याबाबत मालिनी यांचा मुलगा विशाल गावकर यांनी सांगितले की, आधार क्रमांक समान असल्याचे लक्षात आल्यापासून दुरुस्तीसाठी अनेक प्रयत्न केले, परंतु अजून यश मिळालेले नाही. आता मुंबईत जाण्याचा सल्ला दिला जात आहे, परंतु मुंबईत गेल्यावर काम होईल याची खात्री कोणालाच नाही. आम्ही गरीब आहोत, रोजंदारीवर काम करतो. या प्रकारामुळे आई व आम्ही फार निराश आहोत.
मालिनीचे पैसे लक्ष्मीच्या खात्यात...
समान आधार क्रमांकामुळे मालिनी गावकर यांना विविध योजनांखाली मिळणारे पैसे लक्ष्मी धुरी यांच्या बॅक खात्यात जमा होत आहेत. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत मालिनी यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
दयानंद निराधार योजनेचा लाभधारक असलेल्या मालिनी यांचे पैसे असेच लक्ष्मी यांच्या खात्यात जमा होत आहे. लक्ष्मी या सामंजस्याने मालिनी यांची रक्कम मालिनी यांना सुपूर्द करीत आहे. परंतु रोज रोज दुसऱ्या महिलेकडे पैशांची मागणी करणे या प्रकाराला दोन्ही महिला वैतागल्या आहेत.
सबसिडी बंद, रेशनकार्ड रद्द : आधार क्रमांकावर या गोंधळामुळे मालिनी गावकर यांची गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद झाली असून रेशनकार्डही रद्द झाल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.