वास्को: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी गॅमन इंडिया कंपनीला ड्रेनेजची कामे हाती घेण्याचा आणि फोर लेन पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा सर्व्हिस रोड 20 मे पूर्वी म्हणजे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच गॅमन इंडियाला अपूर्ण कच्च्या रस्त्यावरील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी दोनदा पाणी स्प्रिंकलर वापरण्याचे निर्देश दिले.
आमोणकर यांनी गॅॅमन इंडियातर्फे बायणा येथे रवींद्र भवनच्या पाठीमागे उड्डाण पुलाखाली कासवगतीने चाललेल्या कामाची पाहणी करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे येथील मातीचा भराव टाकून बंद केलेले गटार तसेच कच्च्या रस्त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी 20 मे अगोदर म्हणजे पावसाळ्यापूर्वी पक्का रस्ता पूर्ण करून देण्याची सूचना आमोणकर यांनी केली आहे.
या भागातील लोकांच्या गॅमन इंडिया कंपनीविरुद्ध वाढत्या तक्रारींमुळे आमदार आमोणकर यांनी मुरगावचे मुख्याधिकारी जयंत तारी, मामलेदार रघुनाथ देसाई, नगरसेवक श्रद्धा आमोणकर तसेच पालिका अधिकारी यांच्यासोबत बायणा येथे रवींद्र भवनच्या मागे या रस्त्याची व गटारांची पाहणी केली. आता लवकरच पावसाळा सुरू होणार असून परिस्थितीचा अंदाज घेऊन आमोणकर यांनी गॅमन इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
मुख्याधिकारी जयंत तारी यांनीही कंपनी अधिकाऱ्यांना समज दिली. मान्सून सुरू होण्याआधी ड्रेनेजची कामे हाती घ्या आणि फोर लेन पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा सर्व्हिस रोड 20 मे पूर्वी पूर्ण करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच अपूर्ण कच्च्या रस्त्यावरील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी दोनदा पाणी स्प्रिंकलर वापरण्याचे निर्देश दिले. गॅमन इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन आमदारांना दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.