June 18th Goa Revolution Day
गोव्याच्या इतिहासातलं सर्वात महत्वाचं पान म्हणजे पोर्तुगीज राजवट आणि हीच जुलुमी राजवट हटवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न. १७८७ साली झालेलं 'पिंटो बंड' हे गोव्यात पोर्तुगीज राजवटीविरुद्ध पुकारलेलं एक महत्त्वाचं आणि संघटित बंड मानलं जातं.
'पिंटो कट' किंवा 'पिंटो बंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघर्षानं गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाची एक महत्त्वाची गाथा लिहिली. पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीला आणि त्यांच्या वर्णद्वेषी धोरणांना कंटाळून स्थानिक गोमंतकीय जनतेनं दिलेला हा पहिला मोठा लढा होता.
या बंडाचे मुख्य सूत्रधार बार्देश तालुक्यातील कांदोळी गावातील तीन प्रमुख पुजारी होते. ते सर्व 'पिंटो' कुळातील असल्याने या बंडाला 'पिंटो बंड' असं नाव पडलं. पिंटो हे गोव्यातील एक प्रतिष्ठित आणि १७७० पर्यंत सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे सरदार घराणं होतं, जे नंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे मांडलिक बनले.
पोर्तुगीजांच्या गोव्यात आगमनानंतर अवघ्या अर्धशतकातच स्थानिकांनी त्यांच्या परकीय आणि क्रूर राजवटीविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली होती.
१५५५ मध्ये कुंक्कळी येथील रहिवाशांनी लादलेल्या जमीन महसुलाला विरोध केला, तर १५८३ मध्ये कुंक्कळी, वेळ्ळी आणि आसोळणा येथील रहिवाशांनी ख्रिश्चन धर्मांतराला जोरदार विरोध केला. दिवाडी येथील गोमंतकीय रोमन कॅथोलिक धर्मगुरू मॅथ्यू कॅस्ट्रो यांनी १६५४ मध्ये स्थानिक ख्रिश्चनांच्या हक्कांसाठी बंडाचे निशाण फडकवलं होतं.
१७८७ साली हेच बंड संघटित म्हणून पिंटो बंड समोर आलं. फादर पिंटो यांच्या घरातच या बंडाचं नियोजन झालं, म्हणूनच या बंडाला त्यांचं नाव मिळालं. फादर कायतानो फ्रान्सिस्को कौटो आणि फादर जोसे अँटोनियो गोन्साल्वेस या काही प्रमुख स्थानिक पुजाऱ्यांनी या बंडाचं नेतृत्व केलं. गोमंतकीय ख्रिश्चनांवरील वर्णद्वेष आणि चर्चमधील पोर्तुगीजांचे वर्चस्व यामुळे ते व्यथित झाले होते. पोर्तुगीज राजवट उलथून टाकून एक नवीन प्रजासत्ताक स्थापन करणं हा या बंडाचा मुख्य उद्देश होता. कांदोळीमध्ये आजही पेलेस ऑफ कॉन्स्पिरसी म्हणून ओळखले जाणारे फादर पिंटो यांचं घर अस्तित्वात आहे.
दुर्देवाने, या बंडाचीची माहिती अंतर्गत माणसानेच एका पोर्तुगीज अधिकाऱ्यांना दिली, ज्यामुळे पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोव्याची मुक्ती रखडली. कटाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तात्काळ कठोर पावलं उचलली. बंडात सामील असलेल्या सत्तेचाळीस जणांना पकडण्यात आलं आणि त्यांना अत्यंत क्रूर शिक्षा देण्यात आली. यातील नेत्यांना घोड्याला बांधून रस्त्यावरून ओढलं गेलं. त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली आणि त्यांचे हात तोडण्यात आले.
इतकंच नाही, तर इतरांना धडा शिकवण्यासाठी त्यांचे शिर खांबावर लावून सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलं. या बंडाचे दमन झालं तरीही, पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोमंतकीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहिली, जी पुढच्या काळात झालेल्या अनेक संघर्षांना प्रेरणा देत राहिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.