
आजकाल गोव्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्त विचारसरणी यांच्यावर बंधने आणली जात आहेत. गेल्या काही काळापासून गोव्यात (Goa) ही स्थिती आहे. गोव्यातील नामवंत बुद्धिवादी आणि मुक्त विचारवंतावर खटले भरण्याचे सत्रही सुरू झाले आहे. दत्ता दामोदर नाईक या महान विचारवंतांविरोधात एफआयआर नोंदवली गेली आहे. खटल्याच्या गुणदोषांबद्दल बाजूला ठेवून, आपल्या समाजातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मुक्त विचारसरणीची जी आजची स्थिती आहे, त्याचा इथे विचार करावासा वाटतो.
फ्रेडरिक नीत्शे म्हणाले होते की, भविष्यातील तत्त्वज्ञ मुक्त असतील. तत्कालीन स्थितीबद्दल नीत्शे बोलत होता व त्याला जाण्वलेली घुसमट त्याने वर्णन केली. पण, कदाचित नीत्शेचे विचार अजूनही प्रासंगिक असतील आणि ते गोव्यातील तसेच आपल्या देशातील आमच्या काळाचे अचूक वर्णन करत असावेत.
आपण आपल्या अभिरुचीचे आणि विचारसरणीचे गुलाम झालो आहोत. लोकशाहीच्या (Democracy) तर्कसंगत विचारमांडणीनेही आपण सहजपणे नाराज होतो. नीत्शे ज्याला झुंड म्हणतो तेच आपण बनलो आहोत. आमच्या काळातील कळपाची नावे वेगवेगळी आहेत. ज्याला झुंड, कळप म्हणतो, त्याचे मूळ गोव्यात तसेच आपल्या देशातील धर्म आणि संस्कृतीत आहे.
एखाद्या व्यक्तीला समूहात एकत्रित केले जाते आणि तो समूह बनतो. त्याची स्वत:ची स्वतंत्र ओळख राहत नाही. ज्याला नित्शेने कळप म्हटले आहे, अशा एका मोठ्या ओळखीमध्ये तो विलीन होतो. आज त्या कळपाचे नाव ‘राष्ट्र’, ‘जात’, ‘धर्म’, ‘प्रदेश’ इत्यादी असू शकते. आपल्याला दात आणि पोट, जे खातो त्याचे पचन व्हावे यासाठी आहेत. तसेच आपल्याला प्रत्येक गोष्टीला आत्मसात आणि पचण्याजोगे बनवण्याची गरज आहे. कुणालाही जास्त इच्छाशक्ती असू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या/तिच्या अतिरिक्त किंवा अतिरिक्त स्वातंत्र्याचा वापर केला, तर तो अतिरेक आणि अतिक्रमण म्हणून लगेच पाहिला जातो. अगदी गुन्हा म्हणूनदेखील नोंदवतो.
आम्ही सहन करणे सोडून दिले आहे. त्यामुळे जे उघडपणे सांगता येत नाही, ते आम्हांला उघडपणे ऐकूनही घ्यायचे नसते. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’! मग आपण असा समाज बनतो ज्याला फक्त स्वतःच बोललेले ऐकायला आवडते. आम्हाला फक्त आमचे प्रतिध्वनी आवडतात, दुसऱ्या आवाजाला जागा नाही. मतभेदाला जागा नाही. मतभेद मग गुन्हा ठरतो. वेगळ्या आवाजाची आपल्याला भीती वाटू लागली आहे. आपले स्वातंत्र्यच हवे आहे, इतरांचेही स्वातंत्र्य आहे, असते हे आपण विसरून जातो.
आपण ज्याला स्वत:चे ‘स्वातंत्र्य’ समजतो तो खरे तर अहंकार असतो. हा अहंकारीपणा एक आत्ममग्न, बंदिस्त व्यक्ती निर्माण करतो ज्यात दुसऱ्यासाठी आणि त्याच्या/तिच्या स्वातंत्र्याला अजिबात स्थान नसते. हेच आज आपल्याबाबतीत घडत आहे. आपण बंदिस्त झालो आहोत. ज्याची नित्शेने खूप पूर्वी निंदा केली होती, तोच कळप आपण झालो आहोत. आम्ही विकृत बनलो आहोत. ‘मी एक समूह आहे, म्हणून मी आहे’ ही आपली जीवनपद्धती बनलेली दिसते. म्हणून, जे आपल्या कळपाचे नाहीत ते देशद्रोही, धर्मद्रोही, स्व-विरोधक इत्यादी समजले जातात. मग हा कळप झुंडशाही करत त्यांच्यावर तुटून पडतो.
मानवतेच्या पालख्या अनुकरण व अनुसरण यांवर आधारित असतात. आपण आपल्या पालकांचे व सभोवतालच्या लोकांचे अनुकरण करत मोठे होतो. झुंडीतला प्रत्येकजण असेच करत झुंडशाहीचा भाग बनतो. आपलाच वेगळा विचार अन्य झुंडीत असतो. आपण त्याचा विरोध करतो. वास्तविक आपले सामूहिक अनुकरण स्वत:च्या स्वभावापेक्षा विपरीत असते. आपण आपल्यापासून वेगळे झाल्याशिवाय समूह होताच येत नाही. समूहाचे होण्यासाठी स्वत:पासून दूर जावे लागते. आम्ही स्वत:चे मूळ स्वरूप विसरून झुंड बनत चाललो आहोत. असे स्वत:चे अस्तित्व, ओळख, स्वरूप न विसरलेल्या लोकांना आपण दुष्ट, वाईट ठरवून मोकळे होतो.
इमॅन्युएल कान्टच्या मते निवडीची क्षमता हा एक मौल्यवान सार्वत्रिक मानवी गुणधर्म आहे. त्याचा असा विश्वास होता की ही क्षमता परिपूर्ण आहे. म्हणूनच, ‘निवड करण्याची क्षमता’ या कान्टच्या कल्पनेपासून दूर राहून स्वातंत्र्याचा विचार करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. स्वातंत्र्याचा हा विचार तर्कसंगत विचार आहे, असा कान्टचा दावा असला तरी, स्वातंत्र्याची अशी ‘निवडीची क्षमता’ आपल्याला एक अस्तित्ववादी तत्त्वज्ञ जीन पॉल सत्रे यांच्या स्थितीकडे घेऊन जाते जे इतरांना स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी नरक मानतात (‘हेल इज अदर पीपल’ - नाटक ‘नो एक्झिट’). त्यामुळे स्वातंत्र्याचा पुनर्विचार करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आपल्याला स्वातंत्र्याच्या मानवकेंद्री संकल्पनांपासून दूर राहून स्वातंत्र्याचा विचार करावा लागेल. इतर प्राण्यांपासून माणूस म्हणून आपण वेगळे आहोत, या दृष्टिकोनातून विचार करण्याचा आणि स्वातंत्र्य, भाषा, तर्क व कला यांना स्वतंत्रपणे मानव म्हणून पाहण्याचा विचार करावा लागेल.
सामूहिक होणे हे व्यक्तिस्वातंत्र्यावरचे अतिक्रमण आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला समूहाच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. झुंडशाहीविरुद्ध लढावे लागेल. स्वत:च्या बंदिस्त कोषातून बाहेर पडावे लागेल. आपल्याला पटत नसलेले विचार किमान शांतपणे ऐकून घेण्याची तयारी ठेवावी लागेल. विचारांना विचारांनी प्रतिवाद करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपण ज्या समूहाचा भाग आहोत, त्यापासून स्वतंत्र विचार करावा लागेल व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपावे लागेल. गिल्स डेल्यूझ आणि फेलिक्स गुट्टारी यांनी ‘शिझो’ किंवा स्किझोअनालिसिस हा सामाजिक आणि राजकीय विश्लेषणाचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत आणि तंत्रांचा एक संच आहे जो त्यांनी मानवी इच्छांचे मूल्यांकन करण्यासाठी विकसित केला. आम्हांला डेल्यूझ आणि गुट्टारी यांचे ‘शिझो’ बनावे लागेल.
पण, एखाद्या व्यक्तीने असलेल्या समूहाच्या विरुद्ध जाणे, झुंडशाहीला विरोध करणे किंवा ‘शिझो’ बनणे कुठल्याच समूहाला व झुंडीला मान्य नसते. तरीही लोकांनी स्वतंत्र होणे, स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे. समूहाने दिलेल्या मर्यादित व्यक्तिस्वातंत्र्यापासून स्वत:च्या अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्याकडे आपण पावले टाकली पाहिजेत. सामूहिक स्वातंत्र्य आपल्या समूहाविरुद्ध जाण्यापासून रोखते व इतर कुणी तसे बोलत असेल तर त्याविरुद्ध कृती करण्यास, ते विचार रोखण्यास लावते.
व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्या खुलेपणाने विचार करण्यास प्रवृत्त करते. इतरांच्या विचारांचा - भले ते आपल्याला पटत नसतील तरीही - आदर राखण्याची मुभा देते. आपण जे ऐकू इच्छित नाही, ते ऐकण्याचे स्वातंत्र्यही आपल्याला लाभते. आपण जे बोलू शकत नाही त्याचा विचार करण्याचे स्वातंत्र्यही आपणास प्राप्त होते. म्हणूनच, व्यक्तिस्वातंत्र्य केवळ बोललेलेच ऐकू देते असे नव्हे तर मौनही ऐकणे सुलभ बनवते. व्यक्तीचे स्वातंत्र्य हे एका व्यापक जगासाठी खुले आहे. आपण समूहापलीकडे असलेल्या, भिन्न किंवा विरुद्ध विचारांच्या समूहातील व्यक्तीसही जवळ करू शकतो. स्वातंत्र्य अनुभवण्याची ही पद्धत आपल्याला दुसऱ्याच्या स्वातंत्र्याकडे घेऊन जाते. मग, आपण इतरांचा साद ऐकू शकतो, अनुभवू शकतो आणि जबाबदारीने प्रतिसादही देऊ शकतो. म्हणून, इतरांचे स्वातंत्र्य आपल्यासाठी अडथळा न बनता तो एक अत्यावश्यक निकष बनतो. अशा प्रकारचे स्वातंत्र्य समूहाला कमीपणा देत नाही. सामूहिक विचारांचे आदानप्रदान शक्य होते. आपले विचार जपून इतर विचारांचा आदर करू लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.