Goa Tourist Car Stunts Dainik Gomantak
गोवा

Goa Tourists: गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली चाललंय काय? रस्त्यांवर मृत्यूशी खेळणाऱ्या स्टंटबाजांचा धुमाकूळ; पोलिस, कायद्याचा धाक उरला नाही

Goa Tourist Car Stunts: ‘शांत आणि सुंदर’ अशी ओळख असलेल्या गोव्याच्या रस्त्यांवर आता पर्यटकांच्या बेधुंद आणि जीवघेण्या हुल्लडबाजीने उच्छाद मांडला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: ‘शांत आणि सुंदर’ अशी ओळख असलेल्या गोव्याच्या रस्त्यांवर आता पर्यटकांच्या बेधुंद आणि जीवघेण्या हुल्लडबाजीने उच्छाद मांडला आहे. कायदा आणि पोलिसांचा कसलाही धाक न उरलेल्या काही पर्यटक तरुणांच्या विकृत स्टंटबाजीचे अलीकडेच दोन थरारक व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाले असून, यामुळे राज्यातील रस्ता सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा झाल्याचे समोर आले.

पहिल्या घटनेत, गिरी आणि म्हापसा दरम्यानच्या गजबजलेल्या ‘एनएच ६६’ महामार्गावर पर्यटकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. भरधाव कारच्या खिडक्यांमधून बाहेर लटकत हे तरुण बेजबाबदारपणे हात उंचावून स्टंट करत होते. इतकेच नव्हे तर, एका व्हिडिओमध्ये एक हुल्लडबाज तरुण थेट खिडकीबाहेर शरीर काढून स्वतःचा टी-शर्ट हवेत फिरवताना दिसतोय.

स्वतःचा आणि इतर निष्पाप वाहनधारकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या कृत्यामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरी तितकीच धक्कादायक घटना बागा येथे रविवारी उघडकीस आली आहे. वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत तब्बल १० तरुण एकाच कारमध्ये खच्चून भरले होते, ज्यातील दोन तरुण कारची मागची डिकी पूर्णपणे उघडी ठेवून, बाहेर पाय सोडून अत्यंत धोकादायकरीतीने बसले होते.

या बेजबाबदार वर्तनावर तीव्र संताप व्यक्त करताना ‘कळंगुट कॉन्स्टिट्यूअन्सी फोरम’चे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर म्हणाले, हा काही करमणुकीचा खेळ नाही. चालत्या गाडीचा अचानक ब्रेक दाबला किंवा रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडी घसरली, तर जागीच मोठा अनर्थ घडू शकतो. गोव्यात पर्यटकांमध्ये रुजलेली ‘काहीही चालतं’ ही बेफिकीर मानसिकता आता मुळापासून उपटून टाकण्याची वेळ आली आहे.

पर्यटकांच्या या मस्तीला प्रशासकीय सुस्तीची कशी फूस आहे, याचे ज्वलंत उदाहरण अवघ्या एक दिवसापूर्वी हणजूण-शिवोली पट्ट्यात पाहायला मिळाले. एका सुसाट ‘थार’ गाडीने दिलेल्या भीषण धडकेत स्थानिक ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा पुतण्या गंभीर जखमी झाला. मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणे, ओव्हरटेकिंग करणे आणि थेट समुद्रकिनाऱ्यांवर गाड्या घुसवणे हे प्रकार आता रोजचेच झाले आहेत. पोलिस केवळ एखादा अपघात झाल्यावर किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरच जुजबी कारवाईचे नाटक करतात. मात्र, रस्त्यावर पोलिसांची कोणतीही शाश्वत आणि कडक गस्त दिसत नाही, असा थेट आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

गोवा पर्यटकांसाठी खेळण्याचे मैदान नाही!

या वाढत्या बेशिस्तीवर बोट ठेवत ‘गोवा कॅन’चे समन्वयक आणि रस्ते सुरक्षा कार्यकर्ते रोलंड मार्टिन्स यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, गोव्यातील प्रत्येक प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून डिजिटल पाळत ठेवली पाहिजे, जेणेकरून अशा हुल्लडबाजांना जागेवरच बेड्या ठोकता येतील. गोव्याचे रस्ते म्हणजे पर्यटकांचे खेळण्याचे मैदान नाही, हा कडक आणि सडेतोड संदेश आता शासनाने कृतीतून देण्याची गरज आहे; कारण पर्यटनाच्या नावाखाली स्थानिक गोमंतकीयांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आता खपवून घेतला जाणार नाही.

मद्यधुंद चालकाचा आणखीन एक कारनामा!

पर्यटकांनी सदैव गजबजलेल्या कळंगुटमधील प्रसिद्ध ‘टिटोज लेन’ परिसरामध्ये एक धक्कादायक अपघात समोर आला. एका मद्यधुंद कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार थेट एका कॅफेमध्ये घुसली. या विचित्र स्वयंअपघातात कॅफेचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना टिटोज लेन येथील ‘कॅफे एल मार’मध्ये घडली. या जोरदार धडकेमुळे कॅफेच्या मुख्य दरवाजाची काच फुटली असून, तिथे असलेल्या देवाच्या मूर्तीचीदेखील मोडतोड झाली. अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता, असा संशय प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT