पणजी: जगभर झपाट्याने फैलावणाऱ्या ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या व्हेरियंटचे रुग्ण देशात मिळू लागले आहेत. त्यामुळे राज्यात (Goa) यासाठीचे सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून विमानतळ आणि रेल्वे प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) करण्यात येत असून त्यांना घरी अलगीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना दिली आहे.
या प्रवाशांमध्ये जर पर्यटक असतील, तर ते ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत त्याचा पूर्ण तपशील आणि आरोग्याची रोज संबंधित विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून माहिती घेण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या तपासासाठी राज्यातून पाठवलेल्या जिनोम सिक्वेलच्या नमुन्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मात्र, यासाठी सतर्कता बाळगण्यात येत असून आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. दुसरीकडे गेल्या सहा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून बरे होण्याचा दरही कमी होत आहे. त्यामुळे राज्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या हा नवा चिंतेचा विषय आहे. या करता नागरिकांनी सतर्कता पाळावी आणि कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन कृती दलाचे सदस्य डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी केले आहे.
आजची कोरोना स्थिती
राज्यात आतापर्यंत 1 लाख 79 हजार 88 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 लाख 75 हजार 232 रुग्ण बरे झाले आहेत. हे बरे होण्याचे प्रमाण 97.90 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 380 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनाचा बळी नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 385 कायम आहे. गेल्या चोवीस तासांत २ रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केले असून एकाला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. काल दिवसभर 2646 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 42 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना झालेल्यांना पुन्हा होण्याची शक्यता तीनपट
यापूर्वी कोरोना ची लागण झालेल्या आणि बरे झालेल्या रुग्णांना या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण होण्याची शक्यता तीनपट जास्त असल्याचे मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ज्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, अशांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केले आहे.
‘चाळिशीवरील लोकांना बूस्टर हवा’
कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरियएंटचा सामना करण्यासाठी बूस्टर डोस देण्याबाबत सरकारी पातळीवर गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे. देशातील चाळीस वर्षांवरील सगळ्या नागरिकांना तातडीने बूस्टर डोस देण्यात यावा. यामध्ये अधिक जोखीम असणाऱ्या लोकांना प्राधान्य देण्यात यावे अशी शिफारस ‘इंडियन सार्स- कोविड-२ जेनेटिक कन्सोर्शिअम’ने (आयएनएसएसीओजी) केंद्र सरकारला केली आहे. ही संस्था जनुकीय आराखड्याच्या (जिनोम सिक्वेन्सिंग) निर्मितीचे काम करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.