पणजी: विविध राज्यांत कोरोना संसर्ग वाढत असताना गोव्यालाही त्याची झळ बसू लागली आहे. काही दिवसांपासून संसर्गाचे प्रमाण वाढले होते. मात्र, आज त्यात कपात झाली असली तरी संसर्गाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकारने लोकांना सावधगिरीच्या सूचना केल्या आहेत. बाधितांची संख्या दोनशेवर गेल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती केली असली तरी गोव्याने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पण नियमांचे पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
(Goa ready for fourth wave of corona)
महाराष्ट्रातून गोव्यात मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरू असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोव्यातही मास्क सक्ती वा इतर निर्बंध कडक करणार का? असा प्रश्न एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारला असता, त्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. लोकांनी आरोग्य खात्याने केलेल्या आवाहनानुसार कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. येत्या आठवड्यात कोरोना संसर्गासंदर्भात तज्ज्ञ समिती तसेच कृती दल समितीची बैठक होऊन ठोस पावले उचलण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. कोरोना चाचणीचे प्रमाण राज्यात कमी होत असून कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण अजूनही चाचणीसाठी पुढे येत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 24 तासांत 36 नवे रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या 233 आहे.
भारतीय औषध नियंत्रक विभागाने (डीसीजीआय) कॉर्बेवॅक्स हा बुस्टर डोस 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांना देण्यास मान्यता दिली आहे. सहा महिन्यांपूर्वी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस घेता येईल, अशी माहिती बायॉलॉजिकल ई या हैदराबाद येथील कंपनीने ट्विटद्वारे दिली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आम्ही जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मास्कचा वापर कमी झाला आहे. मात्र, परिस्थिती पाहून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात येतील.
- रोहन खंवटे,
पर्यटनमंत्री निर्बंध कायम
महामारी सुरू झाल्यापासून दाबोळी विमानतळावर मास्क वापरणे सक्तीचे होते. आताही हे निर्बंध कायम आहेत, तसेच कोरोनाविषयक इतर निर्बंधही काटेकोरपणे पाळले जातात, अशी माहिती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलीक यांनी दिली.
सक्ती नाहीच; पण वापर हवा
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता मास्कचा वापर बंधनकारक असल्याचे आज जाहीर केले हाेते. मात्र, आरोग्य विभागाच्या या पत्रावरून गोंधळ निर्माण होताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क सक्ती नसून खबरदारी म्हणून घालण्याचे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.