Map Dainik Gomantak
गोवा

देवळाय-खांडोळ्यातील बगलमार्ग रखडला

महाविद्यालय ते श्री शांतादुर्गा देवळाय निवासी वसाहतीपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू

Dainik Gomantak

Goa: कुंभारजुवे-गवंडाळी पूल एप्रिल 2016 मध्ये खुला झाल्यानंतर माशेल, साखळी-सत्तरी, बेळगावसाठी (Belgaum) किमान 5-7 किलोमीटरने अंतर कमी झाले, पण खांडोळा महाविद्यालय ते आमोणा पुलापर्यंतच्या बगलमार्गाचे काम रखडले. 2014 मध्ये बगलमार्गाचा आराखडा साधनसुविधा मंडळातर्फे निश्चित करण्यात आला होता. हा आराखडा अद्याप शीतपेटीत बंद आहे. त्यामुळे माशेलात सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. श्री शांतादुर्गा देवळाय वसाहतीत अरुंद रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र सुरू झाले असून, माशेल रस्त्यावरही प्रचंड ताण येत आहे.

धेऱ्हे कॉलनी व इतर परिसरातील रस्त्यावरही ताण येत असून, अपघातही होत आहेत. कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने संबंधितांशी चर्चा करून काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण केले. सध्या महाविद्यालय ते देवळाय कॉलनीपर्यंतच्या रस्ताचे रुंदीकरण सुरू आहे. या कामासंबंधात वादविवाद, चर्चा, विरोध झाला, पण वाहनचालकांच्या सोयीसाठी मंत्री गावडे यांनी काम सुरू केले. निवासी कॉलनीत काही ठिकाणी अद्याप अरुंद रस्ता आहे, वळणेही आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या रस्त्याने ज्येष्ठ नागरिकांनी, मुलांनी कसे मार्गक्रमण करावे, हा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे, असे मत या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

आराखडा मंजूर

काँग्रेसच्या काळात सुरू होऊन भाजपच्या काळात जुने गोवे ते खांडोळा महाविद्यालयापर्यंत रस्ता झाला. तत्कालीन साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी गतीने काम पूर्ण केले. या बगलमार्गाचा आराखडा 2014 मध्ये दिल्लीच्या कॉस्टा इंजिनिअरिंग प्रा. लि. तर्फे साधनसुविधा विकास महामंडळाने करून घेतला. त्याला मंजुरीही देण्यात आली, पण कामाला सुरुवात झाली नाही. शासनाच्या अनास्थेमुळेच हा बगलमार्ग रखडलेला आहे. या बगलमार्गावर काही ठिकाणी घरे आहेत, शेती आहे, असे सांगितले जाते. पण ज्यावेळेला आराखडा तयार केला, तेव्हा कोणाचीच तक्रार नव्हती. फक्त शेतातून फ्लायओव्हर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या प्रकाराकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा मार्ग रखडलेला आहे.

रस्‍त्‍यावर ताण कायम

वाहनचालकांना श्री शांतादुर्गा देवळाय वसाहतीतील छोट्या रस्त्यावरून आमोणा, साखळी, बेळगाव, वाळपईकडे जावे लागते. रात्री बारा, एक वाजताही प्रचंड गर्दी असते. कॅसिनोतून बाहेर पडणारे पर्यटक या रस्त्याने बेळगावमार्गे तेलंगणा, आंध्रप्रदेशकडे जातात. यावेळी वाहनचालकांना कसरत करावी लागते. माशेल बसस्थानकाजवळून जाणेही कठीण होते, कारण त्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. सकाळ-संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांना या रस्‍त्याने फिरणेही कठीण होत आहे.

पाच वर्षांपासून दुर्लक्ष

कुंभारजुवे ते गवंडाळी दरम्यान मांडवी नदीवर पूल बांधावा, अशी मागणी पाच पंचायतींकडून १९७२ साली करण्यात आली. पण विशेष निवेदन 1975 साली मगो पक्षाच्‍या सरकारला देण्यात आले. या जलमार्गावर पूल उभारावा, अशी मागणी कुंभारजुवे, तिवरे-वरगाव, बेतकी-खांडोळा, सांतइस्तेव्ह व सावईवेरे व परिसरातील जनतेने केली होती. ही मागणी पूर्ण होण्यास 1972 ते 2016 म्हणजे 44 वर्षे लागली. पण, बगलमार्ग नसल्यामुळे अडचण निर्माण झाली. विद्यमान सरकारकडून ग्रामस्थांच्या अपेक्षा होत्या, पण आश्वासन देऊनही बगलमार्गाच्या कामाकडे गेल्या पाच वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. खांडोळा ग्रामसभेतही या विषयावर चर्चा झालेली आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

बगलमार्ग हवाच

गवंडाळी पुलाचे नियोजन करताना आमोणा पुलापर्यंत बगल रस्ता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा साधनसुविधा मंडळाचे चेअरमन असताना प्रस्तावित केला होता. परंतु, हा प्रस्तावित रस्ता शीतपेटीत गेला आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महाविद्यालय ते शांतादुर्गा मंदिराकडे धेऱ्हे रहिवासी वसाहतीमधून जाणारा खांडोळा ग्रामसंस्थेचा रस्ता मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रयत्नातून होत आहे. पण, हा काही बगलमार्गाला पर्यायी रस्ता नव्हे, तो कॉलनीतील छोटा रस्ता आहे. प्रचंड रहदारीचा ताण या रस्त्यावर योग्य नाही. भविष्यातील धोके लक्षात घेऊन, वाढती रहदारी पाहता बगलमार्गाशिवाय पर्याय नाही. संबंधितांना अनेक वेळा निवेदने दिलेली आहेत. तेव्हा त्वरित ही समस्‍या सोडविण्यासाठी बगलमार्गाचे काम सुरू करावे, असे धेऱ्हेतील उमाकांत शेटये, कृष्णानंद गावकर, प्रकाश भगत व इतर ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

हा मुख्य रस्ता नव्हे!

खांडोळा महाविद्यालय ते श्री शांतादुर्गा निवासी कॉलनी, धेऱ्हे कॉलनीपर्यंतचा रस्ता म्हणजे मुख्य रस्ता नव्हे. शिवाय बगलमार्गाला तो पर्याय नाही. अरुंद व वळणाच्या रस्त्यामुळे सध्याच्या वाहतुकीत अडचणी येत होत्या. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या रस्त्यात सुधारणा व्हावी. काही प्रमाणात या रस्त्यावरील ताण कमी व्हावा यासाठीच महाविद्यालयापासून निवासी कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचे काम मार्गी लावले. तसेच शक्य असेल त्या ठिकाणी रुंदीकरण, गटारे दुरुस्त केली आहेत. भविष्यातसुद्धा ग्रामस्थांच्या सहकार्याने, त्यांना योग्य वाटेल, अशाच पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. बगलमार्गाचा विषय बंद झालेला नाही, त्यावर योग्य वेळी, योग्य पद्धतीने रस्त्यांचे काम निश्‍चितपणे होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी खास पदपथ निर्माण करण्याचाही माझा मानस आहे, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT