President Murmu Goa Visit | Goa's Common Civil Code
President Murmu Goa Visit | Goa's Common Civil Code Dainik Gomantak
गोवा

President Murmu On Goa Visit: गोव्‍यातील विविधतेतील एकता आदर्शवत; अनमोल निसर्गसंपदा जपण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

President Murmu On Goa Visit: गोव्यात सर्वधर्मसमभाव जोपासणारा समान नागरी कायदा अनेक वर्षांपासून आहे. हे भारतीय संविधानाला धरूनच असून संपूर्ण देशासाठी चांगले आणि आदर्श उदाहरण मानावे लागेल.

ही एक प्रकारे विविधतेतील एकता असून ती आदर्शवत आहे, गोव्यातील निसर्गसंपदा जपा, असे अावाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

दोनापावला येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आज राष्ट्रपती मुर्मू यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, माजी खासदार विनय तेंडुलकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर, दिगंबर कामत, जीत आरोलकर, डॉ. दिव्या राणे, एल्टन डिकॉस्टा, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रपती मुर्मू यांनी स्नेहपूर्ण स्वागताबद्दल गोव्याच्या जनतेचे आभार मानले. स्वयंपोषी विकास ध्येयांच्या मानकनांबाबत गोवा चांगली कामगिरी करत आहे, याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, की विकासाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये गोव्याचा समावेश आहे.

गोव्याच्या नागरिकांमध्ये दिसून येणाऱ्या औदार्य आणि आदरातिथ्य या गुणांची राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रशंसा केली.

त्या म्हणाल्या, की पश्चिम घाटाचे समुद्रकिनारे तसेच निसर्गसौंदर्य यांच्याप्रमाणेच गोव्याच्या जनतेमध्ये असलेली ही वैशिष्ट्ये पर्यटकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.

समृध्द वन आच्छादन ही गोव्याकडे असलेली अमूल्य नैसर्गिक संपदा असून तिचे संवर्धन केले पाहिजे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

पश्चिम घाट क्षेत्रातील घनदाट वने अनेक वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहेत आणि या नैसर्गिक वारशाचे जतन करण्यातून गोव्याच्या स्वयंपोषी विकासाला अधिक वेग येईल.

आदिवासी तसेच जंगलात निवास करणाऱ्या इतर लोकांना विकासाचे भागीदार करून घेणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या परंपरांचे संरक्षण करणेही महत्त्वाचे आहे यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी अधिक भर दिला.

राष्ट्रपतींनी यावेळी क्रीडा,  कला, लोकसेवा, आध्यात्मिकता आणि साहित्य यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये गोव्याच्या जनतेने दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.

आधुनिकता आणि परंपरा यांच्यामध्ये योग्य तोल साधून गोवा राज्य पुढील वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे आज विधानसभेत संबोधन

विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवारी २३ रोजी विधानसभेत भाषण होणार आहे. दुपारी ३.५० वाजता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे आगमन विधानसभा संकुलात होईल.

सभापती रमेश तवडकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर पाच मिनिटांनी राष्ट्रपतींचे आगमन होईल.

विधानसभेत पीठासीन अधिकाऱ्याच्या जागेवर राष्‍ट्रपतींह राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सभापतींची बैठक व्यवस्था असेल.

सुरवातीला सभापती, त्यानंतर मुख्यमंत्री व शेवटी राष्ट्रपतींचे संबोधन होईल. राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून आताच मिनिटागणिक कार्यक्रमाला मान्यता मिळाली आहे.

यामुळे यापूर्वी तयार केलेले कार्यक्रम हे मान्यतेच्या अधीन होते हे ठरून गेलेले होते. त्यामुळे त्या कार्यक्रमांच्या आखणीत तशी चूक नव्हती. दुपारी ३.५० वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम सायंकाळी ५.१० वाजता संपेल

‘वर्क फोर्स’मध्ये महिलांची भागीदारी वाढवा

गोव्यात कॉस्मोपॉलिटीन स्त्री-पुरुष समानता आढळते. इथल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिलांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे कौतुकास्पद असले तरी एकूण ‘वर्क फोर्स’मध्ये महिलांची भागीदारी वाढवणे गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

सहाजणांना वनहक्क सनदांचे वाटप

या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते सरकारकडून सहा वनहक्क प्राप्त लाभार्थींना सनदा प्रदान करण्यात आल्या.

यात भैरव काळे, रामा गावकर, आनंद हरवळकर, अशोक खांडेपारकर, सुकडो बाळू गावकर, तोलू गोविंद पाडकर यांचा समावेश होता.

राष्ट्रपती मुर्मू यांचा नागरी सत्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच गोव्यात येत आहेत. यानिमित्ताने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना गोव्याची विशेष कुणबी साडी आणि कुणबी शॉल देत लामण दिवा प्रधान केला, तर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांचे नव्याने प्रकाशित करण्यात आलेले ‘हेरिटेज ट्री ऑफ गोवा’ हे कॉपीटेबल बुक प्रधान केले.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT