मडगाव: मडगावात रविवार, ६ रोजी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी एकत्र व्यासपीठावर येऊन ‘‘आमचे सरकार आणा; आम्ही तुम्हाला न्याय देऊ’’, असे आश्वासन दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत रंगत वाढण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मडगावच्या गोमंत विद्या निकेतनमध्ये रविवारी पाटकर यांनी ‘टीचर्स टाऊन हॉल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राज्यातील शिक्षक, बिगर शिक्षक कर्मचारी वर्ग यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार विजय सरदेसाई व आमदार व्हेन्झी व्हिएगस हे उपस्थित राहिले. मात्र, अमित पाटकर हे कॉंग्रेसचे असूनही त्यांच्या पक्षातील एकही आमदार उपस्थित नसल्याने पाटकर हे विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल तर थाटणार नाहीत ना, हा संशय बळावला आहे.
दरम्यान, पाटकर यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटविल्यानंतर ते नाराज आहेत. त्यातच आता गोवा कॉँग्रेस हा नवीन पक्ष स्थापन करण्याच्या हालचालीही सुरू आहेत. पाटकर हे त्या पक्षात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे विजय सरदेसाई यांनीही तूर्त तरी काँग्रेस पक्षाकडे फारकत घेतली आहे.
आम आदमी पार्टी ही सध्या युतीची भाषा बोलत नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना, वरील तिघेही नेते एकत्र येऊन व्यासपीठावर हाताचा अंगठा दाखवून आम्ही एकसंध असल्याचे दाखवून दिल्याने लवकरच राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.
पाटकरांनी बोलणे टाळले!
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई व व्हिएगस यांनी आम्हाला अमित पाटकर यांनी निमंत्रित केले होते, त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला हजर राहिलो, असे उत्तर दिले. तर अमित पाटकर यांना कॉँग्रेस पक्षाचा एकही आमदार या कार्यक्रमात का सहभागी झाला नाही, असे विचारले असता, त्यांनी स्मित हास्य करून, त्यावर बोलणे टाळले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.