पणजी: राज्यात सध्या गाजत असलेल्या नोकऱ्या विक्री घोटाळ्याच्या चौकशीसाठी न्यायालयीन चौकशीची मागणी सर्व विरोधी घटक करीत आहेत, तरीही त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. या चौकशीसाठी सोमवारपर्यंत न्यायालयीन आयोग न नेमल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरले, असा इशारा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गुरुवारी दिला.
काँग्रेस भवनात सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि मान्यवर उपस्थित होते. पाटकर म्हणाले की, या नोकऱ्या विक्री घोटाळ्यात उच्चभ्रू राजकारण्यांचा सहभाग आहे. नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लूट झालेल्यांना राज्य सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली आहे.
पाटकर म्हणाले की, मडगावातील एका शाळेत झालेली नोकर भरती झाली, त्यातही बनावट कागदपत्रे जोडल्याचे दिसून आले आणि त्याचा संबंध भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षांकडे जातो. यावरून गेली बारा वर्षे युवकांच्या जीवनाशी खेळ सुरू असून पैसे घेऊन नोकऱ्या विकल्या जात आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, राज्य सरकारची मोठी सर्कस सुरू आहे आणि येथे सगळे जोकर खेळत आहेत. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजत आहे. भाजप आपला पक्ष वेगळा असल्याचे सांगत आहे ते खरेच आहे. भाजप राज्यात कोणती संस्कृती आणू इच्छितो, तेच कळत नाही. अमली पदार्थ विक्रीला प्रोत्साहन दिले जात आहे.
प्रत्येक दिवशी एक एक नोकरी घोटाळ्याचे प्रकरण पुढे येत आहे. या प्रकरणांची मुळे विस्तारलेली आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांचा या घोटाळ्याशी संबंध आहे, हे उघड झाले आहे. कर्मचारी निवड आयोगातर्फे कधी भरती होणार आहे? पैसा हाच निकष भाजप लावणार आहे काय? असा सवाल युरी यांनी केला.
पोलिस महासंचालकांकडे आम्ही लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणात मंत्री-आमदार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचा सहभाग असल्याने त्यांची चौकशी विशेष पथकाद्वारे (एसआयटी) करावी, अशी मागणी केली होती, त्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. त्याशिवाय उच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांमार्फत एक सदस्यीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणीही केली होती, असे पाटकर म्हणाले.
युरी आलेमाव म्हणाले की, या घोटाळाप्रकरणी न्यायालयीन चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे; कारण पोलिस राजकीय किंवा इतर घटकांच्या दबावाखाली येऊ शकतात. या प्रकरणात अडकलेल्यांचा भाजपशी संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कारवाई करण्यात प्रशासन पूर्णत: अपयशी ठरू शकते. निःपक्षपाती तपासामुळे ''एजंटांची टोळी'' उघडकीस येण्यास मदत होईल; भाजप सरकारवर जनता विश्वास ठेवू शकत नसल्याचेही आलेमाव म्हणाले.
सनबर्न गोव्यात आणून भाजप सरकार राज्याची ओळख पुसण्याचे काम करीत आहे. धारगळमध्ये सनबर्न होणार असून, त्याची तिकीट विक्री सुरू आहे. त्याकडे भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. नोकर भरती घोटाळ्यात ज्यांचे पैसे गेले आहेत, त्यात संशयितांची मालमत्ता विकून पीडितांचे पैसे दिले जातील, असे भाजप सरकारने कोणत्या कायद्याखाली जाहीर केले, हेही सांगावे.
सध्या गोव्यात सगळीकडेच ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळे उघड होत असताना मडगावातही आणखी एक असेच प्रकरण उघडकीस आले आहे. सी बर्ड-कारवार येथे नौदलात नोकरी देण्याच्या बहाण्याने मडगाव येथील एका युवकाला १६ लाखांना लुटल्याच्या आरोपाखाली मडगाव पोलिसांनी आज दोन महिलांना अटक केली. अशी असून संदीप बोरकर याला नोकरी देण्याच्या बहाण्याने २०२० साली या दोन महिलांनी त्याचा भाऊ सुनील बोरकर याच्याकडून १६.१२ लाख रुपये घेतले होते, असे या तक्रारीत म्हटले आहे.
या दोन महिला सरकारी नोकरीसाठी इच्छुक तरुणांना हेरून आपला सी-बर्ड येथे एक अधिकारी ओळखीचा असून त्याच्यामार्फत नोकरी मिळवून देऊ, असे सांगून पैसे घेत होत्या. या घोटाळ्यात आणखी काहीजण गुंतले असल्याचेही सांगण्यात येते.
पूजा नाईक हिच्याविरुद्ध नोकरी देण्याचे आमिष दाखवून सहा लाखांना गंडा घातल्याची तक्रार पणजी पोलिसांत नोंद झाली आहे. कालापूर येथील सुषमा सदाशिव नाईक यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पूजा फोंडा पोलिसांच्या कोठडीत आहे. येथील तपासकामानंतर तिला पणजी पोलिस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.