Cash For Job Scam Accused Shruti Prabhugaonkar Arrested
मडगाव: मंत्री आणि राजकारण्यांशी ओळख असेल आणि अशा राजकारण्यांसोबत कुणाचेही फोटो झळकले तर लोकांना ती व्यक्ती प्रभावी व्यक्तिमत्त्व वाटते. सध्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यात फोंडा पोलिस कोठडीची हवा खाणाऱ्या ठकसेन श्रुती प्रभुगावकर हिच्याबाबतीतही हेच घडले. तिची अनेक राजकारण्यांसोबत असलेली ऊठ-बस आणि मंत्र्यांच्या कार्यालयात बेधडक जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याची कार्यशैली यांमुळेच लोक तिला भुलले आणि आपली कष्टाची कमाई तिच्या घशात ओतली.
भाजप सरकारातील मंत्र्यांची खास मर्जीतील व्यक्ती, असे म्हणून ती सर्वांना आकर्षित करायची. याच तिच्या कार्यशैलीमुळे अनेकांनी तिच्यावर विश्वास ठेवला. आपल्याला नोकरी मिळवून देईल तर हीच, अशी खात्री त्यांना वाटत होती. त्यामुळेच हे एवढे मोठे कांड घडले.
श्रुतीच्या संदर्भातील नवनवीन किस्से आता उघड होऊ लागले असून तिच्याबरोबर या घोटाळ्यात अटक करण्यात आलेला योगेश कुंकळयेकर हा फोंड्यातील शिक्षकही याच कार्यशैलीला बळी पडून तिला वश झाला होता. योगेशने कित्येक युवकांकडून पैसे एकत्र करून ते श्रुतीला दिले होते. दरम्यान, फसले गेलेले व फसवणूक झालेले अनेक जण मानसिक दबावाखाली आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.
सध्या गोव्यात ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा सुरू आहे, त्याची व्याप्ती पाहिल्यास काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात जो व्यापम घोटाळा झाला होता, त्याची आठवण येते. गोव्यातील या घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच एका व्यक्तीने दबावाखाली येऊन आत्महत्या केली आहे. व्यापम घोटाळ्याचीही चौकशी सुरू असताना सुमारे शंभर जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील काहीजणांनी आत्महत्या केली होती. गोव्यात तसे होऊ नये, यासाठी पोलिसांनी संयम बाळगून हा तपास पुढे न्यावा, अशी मागणी माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांनी ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘साश्टीकार’ या कार्यक्रमात केली.
या प्रकरणांशी जे कोण निगडित आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी दबाव न आणता चौकशी केली पाहिजे. जेणेकरून हे लोक कुठलेही दडपण न बाळगता पोलिसांना खरीखुरी माहिती देऊ शकतील. या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत, त्यांना पोलिसांनी पूर्णत: संरक्षण देण्याची गरज आहे, असे मत एल्विस गोम्स यांनी व्यक्त केले.
सुरुवातीला त्या युवकांचे पालक योगेशवर विश्वास ठेवून पैसे देण्यास तयार नव्हते. या युवकांच्या पालकांचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी, श्रुतीने या सर्वांना उत्तर गोव्यातील एका ठिकाणी बोलावून एका महिलेशी गाठ घालून दिली. त्या महिलेने त्या पालकांची खात्री पटविल्यानंतरच त्यांनी पैसे योगेशला दिले. हे पैसे श्रुतीने स्वत: लाटले की, ते आणखी कुणापर्यंत पोहोचले, हे मात्र अद्याप उघड झालेले नाही. हे पैसे नेमके कुणाला दिले, याचा तपास करण्यासाठी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी वाढू लागली आहे.
श्रुतीने पोर्तुगीज पासपोर्टसाठीही अर्ज केला होता मात्र, फोंडा पोलिसांकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यासंदर्भात फोंड्याचे पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, तिच्याकडे कुठला पासपोर्ट आहे आणि तिच्याकडे किती संपत्ती आहे, याचा आम्ही शोध घेत आहोत. यासंबंधी संबंधित खात्याकडून माहिती मागितली आहे, असे कवळेकर यांनी सांगितले.
श्रुतीचा विवाह प्रभुगावकर याच्याशी झाल्यानंतर तिचा पती ‘यूके’मध्ये स्थायिक झाला असून ज्या दिवशी श्रुतीला पर्वरी येथे अटक झाली त्याच दिवशी तो गोव्यात आला होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे. दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी या माहितीला दुजोरा दिला. पोलिस श्रुतीच्या मागावर होते. मात्र, ती पर्वरी येथील घरी येत नव्हती. पती गोव्यात आल्यावर ती घरी आली आणि तिथेच पोलिसांनी तिला अटक केली, असे सावंत यांनी सांगितले.
एका घरगुती समारंभात श्रुतीची योगेश कुंकळ्येकर याच्याशी भेट झाली.
त्यावेळी तिने काही मंत्र्यांची नावे घेत, आपण त्यांना चांगल्याप्रकारे ओळखते, असे सांगितले.
लवकरच सरकारी नोकऱ्या जाहीर होणार आहेत. जर तुमचे कोणी नोकऱ्यांसाठी इच्छुक असल्यास माझ्याशी संपर्क साधा.
मंत्र्यांच्या वशिल्याने मी तुमचे काम करून देईन, असे सांगत तिने योगेशला जाळ्यात ओढले.
वास्तविक योगेशला फोंड्यात ‘सरळ स्वभावाचा शिक्षक’ म्हणून ओळखले जाते.
पण यात आपलाही फायदा होईल, असे वाटल्याने योगेशने फोंडा आणि जवळपासच्या भागातील लोकांशी संपर्क साधून
नोकऱ्यांसाठी प्रेरित करीत त्यांच्याकडून लाखो रुपये जमविले.
ही रक्कम सुमारे दीड कोटीच्या घरात असून ती त्याने श्रुतीकडे दिली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.