वास्को: पैसे घेऊन नोकरी देण्याचे प्रकार अजून काही संपण्याचं नाव घेत नाहीये. गोवा पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी होत असून दर दिवशी पैसे घेऊन लोकांना लुबाडण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. वास्कोमधून सरकारी नोकरी विक्रीचे आणखीन एक प्रकरण समोर आले असून यामध्ये आई आणि मुलाचा समावेश आहे.
बायणा वास्को येथील झुआरी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या उमा पाटील (वय. 45) व तिचा मुलगा शिवम (वय. 27) यांच्या विरोधात 6 लाख रुपये लुबाडल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
फिर्यादी रश्मी चोपडेकर यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार आई व मुलाने त्यांच्या मुलाला पोलीस खात्यात भरती करून देण्याचे आश्वासन देत एकूण 6 लाख रुपये घेतले होते आणि मागितलेली रक्कम देऊन सुद्धा नोकरी न मिळाल्यामुळे रश्मी यांनी बुधवारी (दि.13 नोव्हेंबर) रोजी उमा पाटील व तिचा मुलाच्या विरोधात वास्को पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
रश्मी चोपडकर या चिंबल येथील रहिवासी आहेत आणि त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे बायणा येथील संशयितांना आयपीसी कलम 420 आणि 34 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. वास्को पोलिसांनी याआधी देखील उमा पाटीलच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात वास्कोमधून झालेली ही दुसरी अटक आहे, यापूर्वी पोलिसांनी गोविंद मांजरेकर आणि सुरज नाईक या दोघांना साक्षी केरकर नावाच्या एका महिलेकडून शिक्षण खात्यात नोकरीचे आश्वासन देऊन 4.3 लाख रुपये लुबाडल्या प्रकरणी अटक केली होती.
गोव्यात पैशांच्या बदल्यात नोकऱ्यांच्या घोटाळ्याची गाज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पोचली. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आलोक शर्मा यांनी या प्रकरणात श्वेतपत्रिकेची मागणी केली. यावेळी तेथे उपस्थित काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नोकरी विक्री घोटाळ्याशी भाजपचा संबंध जोडून कडाडून टीका केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.