Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मंत्री-आमदार आपल्या खिशात!

Khari Kujbuj Political Satire: सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास सरकारचाच आदेश पायदळी तुडवून थाटात बंदर कप्तान खात्यातील वरिष्ठ कारकून वाढदिवस साजरा करतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

मंत्री-आमदार आपल्या खिशात!

सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास सरकारचाच आदेश पायदळी तुडवून थाटात बंदर कप्तान खात्यातील वरिष्ठ कारकून वाढदिवस साजरा करतो. त्या वाढदिवसाची ‘खरी कुजबुज'' गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध होते. अशा कार्यक्रम आयोजकांवर आणि वाढदिवस साजरा करणाऱ्यांविरोधात सरकार काय कारवाई करणार? असा सवाल विचारला होता. परंतु अद्यापि याविषयी सरकारच्या प्रशासकीय खात्याने कोणतीच नोटीस संबंधित अधिकाऱ्याला अथवा कार्यालय प्रमुखांना पाठविली नाही, ना! अजूनही बंदर कप्तान खात्याच्या कॅप्टननेही त्यास त्याबाबत कारणे दाखवा नोटीस काढलेली नाही. त्यामुळे हा वरिष्ठ कारकून सध्या म्हणे आपणाला कोण काय हात लावेल आणि आपल्यावर कोण कारवाई करेल, अशा तोऱ्यात वावरत आहे म्हणे. शिवाय खात्याचे मंत्री व इतर वरिष्ठ अधिकारी आपल्याच खिशात असल्याचा आव हा कारकून आणत आहे. आता प्रशासकीय खाते आदेश डावलणाऱ्यांवर काय कारवाई करतेय, हे पहावे लागणार आहे. ∙∙∙

एका दगडात तीन पक्षी!

पणजी बसस्थानकावरील काही दुकानदार आपले विक्रीचे साहित्य दुकानाबाहेर ठेवत असल्याने काही प्रमाणात अडथळे निर्माण होतात, त्यावर कदंबाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. कारवाईमुळे व्यापारी चिटले ! एकत्रितपणे त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. परंतु या व्यापाऱ्यांना कायद्यावर बोट ठेवत, योग्यरीत्या समजावत त्यांना शांत केलेच त्यासोबतच त्यांना दंडही ठोठावला. हे कसब भल्याभल्यांकडे नसते! योग्य शिस्तीचा धडा घालताना काहीवेळी कठोर भूमिका शांतपणे घ्यावा लागतात, अशीच भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतल्याने त्यांचे कौतुक होत असून अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज असल्याची चर्चा कदंब स्थानकात उपस्थित नागरिकांमध्ये रंगली होती. शिस्तही लावली, समजूतही काढली आणि दंडही ठोठावला एका दगडात तीन पक्षी मारणे कदाचित यालाच म्हटले जात असावे.

गीतेशकडे पैसे नव्हते, की वेळ?

फोंड्यात निवडणुकीचा रंग चढलाय, पण काहींच्या ‘हिशोबाची वही’ मात्र अजूनही उघडायची बाकीच दिसतेय! ‘आप’चे उमेदवार गितेश नाईक यांच्याभोवती सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे. म्हणे, कोट्यवधींची ताकद असलेला माणूस, पण काही लाखांची रक्कम भरायला २०२३ पासून वेळच मिळाला नाही! आणि अचानक अजामीनपात्र वॉरंट आलं, की लगेच धाव घेतली न्यायालयात! आता प्रश्न उभा राहिलाय हे पैसे नव्हते, की वेळ नव्हता? लोक मिस्कीलपणे म्हणता, बहुतेक ‘रिमाइंडर’ म्हणून वॉरंट लागले, तेव्हा आठवले असेल! कोट्यवधींच्या व्यवहारात व्यस्त होते बहुतेक, त्यामुळे लाखांचे बिल ‘लो प्रायोरिटी’मध्ये टाकलं असावं! आता मतदार मात्र विचारात पडलेत, ज्याला स्वतःचे काही लाख वेळेवर भरता आले नाहीत, तो जनतेचे कोट्यवधींचे प्रश्न वेळेवर सोडवेल का? चर्चा अशी की, ही फक्त पैशांची गोष्ट नाही, तर ‘प्राधान्यक्रम’ काय आहे, याचीच खरी परीक्षा आहे!

मायकलची यादी गेली कुठे?

किनाऱ्यावर लाटा येतात, जातात. पण काही ‘याद्या’ मात्र किनाऱ्यावर येतच नाहीत म्हणे! आमदार मायकल लोबो यांनी मोठ्या थाटात सांगितलं होतं ‘ड्रग्स व्यवसाय करणाऱ्यांची यादी माझ्याकडे आहे’. आता ही यादी नेमकी कुठे आहे? हा प्रश्न मात्र समुद्रातल्या मोत्यासारखा गूढच राहिलाय. कारण लोक म्हणतात, जर यादी खरोखरच होती, तर ती पोलिसांच्या टेबलावर का दिसली नाही? दरम्यान, ड्रग्स ओव्हरडोसने युवकाचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा मायकल साहेबांनी आवाज उठवला ‘किनारी भागात असे प्रकार चालतात, यावर अंकुश हवा.’ आता गावात चर्चा अशी की जर सगळं माहित होतं, तर आधीच कारवाई का झाली नाही? कदाचित यादी अजूनही ‘सीक्रेट फाईल’मध्ये लॉक असेल, पासवर्ड मात्र विसरले असावेत! अशा थट्टेने लोक बोलत आहे. आता खरी चर्चा अशी की, माहिती आहे… पण वापरायची वेळ कधी येणार? आणि तोपर्यंत किनाऱ्यावरच्या लाटा आणि चर्चांचा आवाज दोन्ही जोरात सुरूच राहणार!

चर्चिल कुंकळ्ळीतून लढणार?

चर्चिल आलेमाव हे तसे वेगळेच रसायन. ते कधी काय निर्णय घेणार याचा नेम नसतो. मात्र जनतेशी नाळ जोडलेले राजकारणी म्हणून चर्चिल यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. चर्चिल आलेमाव कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी घोषणा चर्चिल यांनी केली आणि वेगळीच चर्चा सुरू झाली. खरेच चर्चिल आपल्या घोषणे बाबत गंभीर आहेत का? चर्चिल यांनी ही घोषणा करण्या मागचे काही वेगळेच कारण आहे का? युरी आलेमाव यांचे जवळचे आसीस नोरोन्हा यांची वर्णी काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी निवड होण्यात व चर्चिल यांच्या घोषणेत संबंध असावा, असे जाणकार मानतात. चर्चिल आलेमाव यांचा नावेली व बाणवली मतदारसंघावर डोळा आहे. कुंकळ्ळीवर दावा सांगितल्यास बाणवली किंवा नावेली वालांकाला मिळविण्यासाठी वाटाघाटी करणे संभव असल्यामुळेच ही घोषणा केल्याची चर्चा आहे.

जीतला ‘तिकीट’ कोणाचे?

धारगळमध्‍ये तीन दिवसांपूर्वी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मंत्री मविन गुदिन्‍हो यांनी मगोचे आमदार जीत आरोलकर यांना भाजपात येऊन आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्‍या उमेदवारीवर लढवण्‍याचे आवाहन केले. शिवाय मगोत आरोलकर यांच्‍यावर अन्‍याय होत असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला. भाजप–मगो युती असतानाही मंत्री गुदिन्‍हो यांनी केलेल्‍या या वक्तव्‍यांमुळे मगोच्‍या गोटात कमालीची अस्‍वस्‍थता पसरली असून, मगोचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी गुदिन्‍होंना समज द्या, अशी मागणी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍याकडे केली आहे. तसेच आरोलकरांनी नकार दिल्‍यास आगामी विधानसभा निवडणुकीत मांद्रेत मगोकडे पर्यायी उमेदवार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. गुदिन्‍होंची वक्तव्‍ये आणि दीपक ढवळीकर यांचे प्रत्‍युत्तर यावरून जीत आगामी निवडणुकीत नेमके कुणाचे ‘तिकीट’ स्‍वीकारणार? याकडे मांद्रेतील मतदारांचे लक्ष लागून आहे.

फोंड्यात आरोप प्रत्यारोपांचा ऊत

सध्या फोंडा पोटनिवडणूक आरोप प्रत्यारोपांनी गाजत आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व आप या तीन पक्षांतील उमेदवारांमध्ये लढत असली तरी भाजप व काँग्रेसमध्ये जास्त चढाओढ चालू आहे. मात्र या दोन्ही पक्षातील नेते भूतकाळातील घटनांचा आधार घेऊन एकमेकावर टिका करताना दिसतात. मुख्यमंत्री सांगतात त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष म्हणजे घोटाळे, लुटारु व खोटारड्यांचा. मुख्यमंत्री काँग्रेसच्या राष्ट्रीय की गोव्यातील नेत्यांबद्दल बोलतात हे स्पष्ट होत नाही. गोव्यातील बहुतेक काँग्रेस नेते आता भाजपात आहेत, असे केतनबाब प्रत्यारोप करताना म्हणतात. अशा परिस्थितीत आता फोंडाचे मतदार नेमके कोणाला निवडतात, हे कळणारच आहे, घोडा मैदान दूर नाही.

आता शहा यांना साकडे!

गावडा, कुणबी व वेळीप या राज्यातील आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे असा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांच्या दिल्लीवारीनंतर हा विषय मार्गी लागण्याचे चित्र निर्माण झाले आहे. फोंडा पोटनिवडणुकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा विचार तवडकर यांनी चालवला आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत शिष्टमंडळ नेऊन शहा यांची भेट घालून दिल्यानंतर हा विषय मार्गी लागत केंद्र सरकारने संसदेत विधेयक सादर करणे, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजूर करणे, राष्ट्रपतींनी त्याला मान्यता देणे आदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

भाजपची शक्ती एकवटली

फोंडा पोटनिवडणुकीतील प्रचारात भाजपने राज्यभरातील नेते उतरवले आहेत. भाजपचे बहुतांश आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह देशभरातील विधानसभा निवडणुका, पोट निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. तरी उपलब्ध मंत्री आमदारांनी फोंड्यातील प्रचारात सहभागी व्हावे, असे नियोजन भाजपने केले आहे. पेडण्याच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनीही फोंड्यात भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांचा प्रचार केला आहे. राज्यभरातील नेत्या कार्यकर्त्यांनी आपले फोंड्यातील संपर्क नाईक यांना विजयी करण्यासाठी वापरावेत यासाठीची रणनीती आखून भाजपने प्रत्यक्षात काम सुरू केले आहे.

धास्‍ती नेमकी कशाची?

फोंडा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार रितेश नाईक यांचा भाजपने सूत्रद्धरित्‍या प्रचार सुरू केलेला आहे. त्‍यासाठी भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी मंत्र्यांसह भाजप आमदारांनाही कामाला लावले आहे. त्‍यामुळे अनेक आमदार फोंड्यात जाऊन रितेश यांचा प्रचार करीत आहेत. माजी मुख्‍यमंत्री, गृहमंत्री राहिलेल्‍या रवी नाईक यांच्‍या सुपूत्राला जिंकून देण्‍यासाठी भाजपने जी कंबर कसलेली आहे, ती पाहून भाजपला किल्ला अबाधित ठेवायचा आहे? की मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांची धास्‍ती घेतली आहे? या प्रश्‍‍नाचे उत्तर फोंड्यातील मतदार शोधत आहेत.

अंतर्यामी'' रिपोर्ट!

वागातोरच्या ‘त्या’ दुर्दैवी २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शोधायला पोलिसांना वेळ लागतोय आणि डॉक्टरांना तर पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. पण आपले अष्टपैलू नेते मायकल लोबो यांनी मात्र विज्ञानालाही मागे टाकणारी झेप घेतली आहे. सकाळी लोबो साहेब रंगात होते; संशयाची सुई अमली पदार्थांच्या दिशेने फिरवत त्यांनी ‘कडक कारवाई’चे इशारे दिले. पण रात्र वैऱ्याची असते, असे म्हणतात, ती लोबो साहेबांच्या बाबतीत ‘विचारांची दिशा बदलणारी’ ठरली असावी. ज्या प्रकरणावर पोलिस बोलायला तयार नाहीत आणि ज्याचा वैद्यकीय अहवाल अजून लॅबमध्येच आहे, त्यावर साहेबांनी स्वतःच शिक्कामोर्तब करून टाकले, मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला! आता प्रश्न पडतो, की लोबो साहेबांकडे अशी कोणती ‘दिव्यदृष्टी’ आहे, जी रिपोर्ट येण्याआधीच मृत्यूचे कारण सांगू शकते? की त्यांनी राजकारणासोबतच आता गुपचूप डॉक्टरी पेशाही पत्करला आहे? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT