Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: काँग्रेसचा सावळा गोंधळ

Khari Kujbuj Political Satire: गोव्यात कॉंग्रेस पक्षाने चार जिल्हे जाहीर केले आणि नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली. या नेमणुकांत म्हणे प्रदेशाध्यक्षांचे पारडे जड झाले, असे कॉंग्रेसवालेच म्हणतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

काँग्रेसचा सावळा गोंधळ

गोव्यात कॉंग्रेस पक्षाने चार जिल्हे जाहीर केले आणि नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली. या नेमणुकांत म्हणे प्रदेशाध्यक्षांचे पारडे जड झाले, असे कॉंग्रेसवालेच म्हणतात. साखळीचे माजी गटाध्यक्ष मंगलदास नाईक, उत्तर गोव्याचे शशांक नार्वेकर व कुशावतीचे राजेश वेरेंकर हे अमित पाटकरांच्या शिफारसीने जिल्हाध्यक्ष झाले, असे कळते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे आसिस नोरोन्हा हे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष बनले. आता चौघांची निवड करताना त्यांचे मागील कार्य कुणी तपासले, का हा प्रश्न राहतोच. त्यातच सोमवारी आसिस नोरोन्हांनी आपल्या पदाचा ताबा घेतल्याने काही दिवसांमागे फोंड्यात चार जिल्हाध्यक्षांचा सत्कार कसा झाला व तोही प्रभारी माणिकराव ठाकरेंच्या उपस्थितीत, अशी कॉंग्रेसवाल्यांमध्येच चर्चा आहे. एकंदर कॉंग्रेसचा पारंपरिक सावळा गोंधळ चालूच आहे म्हणायचा!

भाटीकरांचा मतदार कनेक्‍ट चालूच!

फोंडा पोट निवडणूक तांत्रिक कारणामुळे रद्द केल्‍यामुळे काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर हे काहीसे नाउमेद झाले हाेते, ही गोष्‍ट काहीशी खरी असली तरी त्‍यामुळे ते पुरते नाउमेद झालेले नाहीत, हे त्‍यांच्‍या सध्‍याच्‍या कार्यशैलीतून दिसून येत आहे. निवडणुकीपासून भाटीकर जरा दूर रहावे लागले तरी त्‍यांनी आपला मतदारांशी असलेला कनेक्‍ट कमी केलेला नाही. त्‍यांनी आता फोंड्यातील काँग्रेस कार्यालयातून फोंडा मतदारसंघातील लोकांसाठी डीडीएसएसआय या योजनेचे नूतनीकरण करण्‍यासाठी सहाय्‍य केंद्र सुरू केले आहे. निवडणुकीपासून दूर राहिलो तरी मतदारांपासून दूर होणार नाही, हा फाॅर्म्‍युला सध्‍या भाटीकर यांनी जोपासला आहे, असे म्‍हटल्‍यास त्‍यात वावगे ते काय?

महादेव नाईक रिंगणात

माजी मंत्री महादेव नाईक यांनी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते भाजप सरकारमध्ये मंत्री होते. सध्या ते कोणत्याच पक्षात नसल्याने ते भाजपमध्ये परततील का, याविषयी उत्सुकता आहे. शिरोडा मतदारसंघातून ते भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढतील. येत्या काही दिवसांत ते आपली राजकीय भूमिका जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहेत. शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर हे सध्या भाजप सरकारमध्ये मंत्री असल्याने सध्या भाजप नाईक यांच्याबाबत काहीच निर्णय घेणार नाही हे उघड आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे अपक्ष वाटचालीशिवाय पर्याय नाही, हेही स्पष्ट आहे.

मासे मेले कुणामुळे?

पणजीतील मळा तलावात मासे मृतावस्थेत असल्याची घटना उघडकीस आली आणि शहरात चर्चेला अक्षरशः पंख फुटले. आता हे मासे नेमके कशामुळे मेले, पाण्यात काही ‘विशेष’ मिसळलं का, की कुणाच्या रसायनांनी आपली वाट चुकून तलाव गाठला, याचा शोध घेणं महत्त्वाचं ठरतंय. म्हणजे बघा ना, मासे काही उगाचच ‘गटागटा’ पाणी पिऊन मरत नाहीत! पाण्यात काहीतरी गडबड असणारच... पण ही गडबड नेमकी कुणाची? शेजारची एखादी कंपनी की कुणाचं दुर्लक्ष? की मग ‘काहीच झालं नाही’ असं सांगण्याची तयारी आधीपासूनच सुरू आहे? आता गंमत म्हणजे, ही जागा पणजी महापालिकेच्या अखत्यारीत येते. त्यामुळे प्रश्न सरळ आहे ‘मासा मेलाय, पण जबाबदारी कोणाची?’ महानगरपालिका म्हणेल, आम्ही चौकशी करतोय...लोक म्हणतात, चौकशी करायची असेल तर खरे कारण बाहेर येईल... पण जर नकोच असेल तर कारण सापडणारच नाही! म्हणजे सध्या तलावातले मासे गप्प झाले, पण शहरातल्या चर्चा मात्र जोरात पोहतायत. आता बघायचं इतकंच? महापालिका खरंच ‘जाळं टाकून’ सत्य बाहेर काढते, की सगळं प्रकरण पाण्यातच विरघळून जातं!

सावियोची चाल कोणती?

काँग्रेसचे माजी दक्षिण गोवा जिल्‍हा अध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा यांच्‍या जागी युरी आलेमाव यांचे समर्थक असलेले आशिष नोरोन्‍हा यांना जिल्‍हाध्‍यक्षपदी निवडून आणल्‍यामुळे नाही म्‍हटले तरी, काँग्रेसमध्‍ये काही प्रमाणात धुसफूस चालू आहेच. काल सावियो यांनी जिल्‍हाध्‍यक्षपदाचा ताबा नोरोन्‍हा यांच्‍याकडे सोपविला. असे म्‍हणतात, काँग्रेसला वेळ्‍ळी मतदारसंघात सध्‍या ‘आप’चे आमदार असलेले क्रूझ सिल्‍वा यांना उमेदवारी द्यायची आहे. मात्र मागच्‍या विधानसभा निवडणुकीत सावियो यांना क्रूझकडून पराभव स्‍वीकारावा लागला होता. त्‍यामुळे सावियो या प्रवेशाला विरोध करू शकतात. त्‍यामुळेच त्‍यांना जिल्‍हाध्‍यक्षपदावरून हटविण्‍यात आले. त्‍यामुळे आता सावियो यांची पुढील चाल काय असेल, ते पहावे लागणार आहे.

आर्लेकरांना आतापासूनच पराभवाची चाहूल!

भाजपच्‍या गत सरकारात उपमुख्‍यमंत्रिपदी असलेल्‍या बाबू आजगावकर यांना २०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपने पेडण्‍यातून उमेदवारी नाकारली आणि ती प्रवीण आर्लेकरांना दिली. बाबूंना मडगावातून उभे करण्‍यात आले. पण, दिग्गज दिगंबर कामत यांच्‍याकडून त्‍यांना अपेक्षेनुसार पराभवच पत्‍करावा लागला. तेव्‍हापासून बाबू भाजपवर कमालीचे नाराज आहेत. परंतु, त्‍यांनी भाजपबाबत बोलणे पूर्णपणे टाळले आहे. गत विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल अजूनही न विसरलेल्‍या बाबूंनी आता येती विधानसभा निवडणूक पेडण्‍यातूनच लढवण्‍याचा ठाम निर्णय घेतला असून, त्‍यांनी तेथे पुन्‍हा कामासही सुरुवात केलेली आहे. यावरूनच बाबू आणि आमदार प्रवीण आर्लेकरांत गेल्‍या काही दिवसांपासून जुंपत आहे. बाबूंनी काहीही केले तरी आपल्‍याला फरक पडत नाही, असे आर्लेकर सांगत आहेत. पण, गेल्‍या पाच वर्षांत त्‍यांची कामगिरी पेडण्‍यातील जनतेने पाहिली असून, अनेकजण ‘बाबूच बरे होते’ असे म्‍हणत आहेत. त्‍यामुळे पराभवाची आतापासूनच चाहूल लागल्‍याने प्रवीण आर्लेकर बाबूंना वारंवार प्रत्‍युत्तर देत असल्‍याच्‍या चर्चा मतदारांत सुरू आहेत.

सुटलो ...असे वाटले असेल!

फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्याने काँग्रेसतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज आव्हान याचिका दाखल झाली. उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात पक्षाकडून आव्हान दिले जाणार असल्याचे जाहीररित्या गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका कधी दाखल होणार याची उत्सुकता माध्यमांसह फोंड्यातील कार्यकर्त्यांनाही होती. अखेर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याची माहिती चोडणकरांनी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवली. तत्पूर्वी चोडणकरांनाही प्रसारमाध्यमांकडून याचिका कधी दाखल होणार, अशी विचारणा होतच होती. आता याचिका दाखल झाल्याने त्याविषयी विचारणा होणार नाही. अखेर सुटलो, असे त्यांना याचिका दाखल झाल्याची माहिती हाती आल्यानंतर निश्चित वाटले असणार हे नक्की.

रितेश-राजेश यांच्यात ‘गुफ्तगू’?

दिवंगत मंत्री रवी नाईक यांचे पुत्र तथा नुकत्याच रद्द झालेल्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार रितेश. अन् राजेश वेरेकर हे काँग्रेसचे नेते. रद्द झालेल्या पोटनिवडणुकीत हे दोघे आमने-सामने होते. पण आज झरेश्वर देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महानैवेद्याला हे दोघे एकत्र बसून जेवताना दिसले. विशेष म्हणजे यावेळी दोघांमध्ये काहीतरी ‘गुफ्तगू’ सुरू असल्याचेही बघायला मिळाले. नाही तरी राजेशनी आगामी निवडणुकीकरता काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा ठोकून रद्द झालेल्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना आव्हान दिलेले आहेच. याबद्दल तर ‘गुफ्तगू’ नसावी ना? याचीच चर्चा मंडपात नंतर सुरू होती. आता ही चर्चा नेमकी कशाबाबत होती, हे कळले नसले तरी राजकारणात काहीही होऊ शकते, याची आठवण ही ‘गुफ्तगू’ लोकांना देऊन गेली.

पेडण्यातील शाब्दिक युद्ध

माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडण्यात संपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर तेथे शाब्दिक युद्धाने जागा घेतली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केलेल्या वक्तव्याला बाबू यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. त्यात पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी भाजपमधील तेव्हाच्या उपमुख्यमंत्री बाबू यांनी गैरव्यवहार केल्याचे जाहीरपणे सांगितले. या प्रकरणाकडे राजन कोरगावकर दूरून पाहत आहेत. त्यांची पुढील चाल काय असेल आणि राजकारणाचा कोन ते कसे बदलतील, याची पेडणेवासीयांना उत्सुकता आहे.

कुंकळ्ळीत काँग्रेसचे उमेदवार ठरले?

‘वेल बिगीन हाफ डन’ असे इंग्रजीत एक बोध वाक्य आहे. ‘सुरवात योग्य झाली तर अर्धे काम फते’ असा त्याचा अर्थ.. महिनाभरात पालिका निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळताहेत. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात काँग्रेस टीम ने चौदा ही प्रभागात आपले उमेदवार ‘शॉर्ट लिस्ट’ केल्याची चर्चा आहे. एक सेवानिवृत्त पोलिस हवालदार, एका माजी नगराध्यक्षाचा बंधू, एक दुकानदार, युरीच्या कार्यालयात काम करणारी एक महिला, युरी समर्थक आणखी एक युवा महिला, एक फुटबॉल प्रशिक्षक, एक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, एक सेवानिवृत्त खलाशी, एक सेवानिवृत्त अभियंता, सेवानिवृत्त शिक्षक, एक माजी महिला नगराध्यक्षा, अशी काही इच्छुकांची नावे ‘शॉर्ट लिस्ट’ झाली असून प्रभाग राखीवता जाहीर झाल्यावर काँग्रेस लगेच उमेदवार जाहीर करण्याच्या विचारात आहे. तर दुसऱ्या बाजूने ‘भाजपची टीम’ क्रिकेट खेळण्यात व्यग्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Official Language: कोकणीबरोबरच मराठीला राजभाषा करा! 'राजभाषा निर्धार'ची मागणी; मंत्री रमेश तवडकर यांना निवेदन

Monsoon Update: वरुणराजा यंदा रुसणार; पावसाचा टक्का घटणार, 'एल-निनो'चा प्रभाव; 5 टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता

लोकायुक्त अजूनही विदेशात, आणखी आठवडाभर प्रतीक्षा; सुनावण्या लांबणीवर

प्राणवायूचे प्रमाण एकदम घटल्‍याने हजारो मासे मृत, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीचा निष्‍कर्ष

गोळी झाडली ती बंदूक बेकायदेशीर, श्‍‍वेत गावडेला खुनाच्‍या आरोपाखाली अटक; 4 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT