Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचा करिश्मा?

Khari Kujbuj Political Satire: दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यात स्थायिक होऊ नका, असा सल्ला परराज्यातील लोकांना दिला आहे. विरियातो फर्नांडिस यांना भविष्यातील पाण्याच्या टंचाईचे संकट दिसल्याने त्यांनी तो इशारा दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांचा, ‘करिश्मा?’

काही व्यक्तींचा करीश्माच असा असतो की ते हात लावीन तिथे सोने होते. सध्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबाबतही असेच म्हणावे लागेल. परवा त्यांनी साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले होते. आणि ही बातमी प्रसिद्ध होताच राज्यभरातून पुस्तकाच्या मागणीचा ओघच सुरू झाला आणि अजूनही सुरूच आहे. आपण एवढी पुस्तके लिहिली पण एवढी मागणी कोणत्याही पुस्तकाला आली नव्हती, असे लेखक सांगतात. आता बोला. आणि याच गोष्टीची चर्चा सध्या फोंड्याच्या साहित्यक वर्तुळात सुरू आहे. याला म्हणतात लोकप्रियता. उगाच नाही मुख्यमंत्र्यांचा देशातील शंभर लोकप्रिय व्यक्तीत ६३ वा क्रमांक लागला तो.

पाण्याचे संकट अन् विरियातोंचा सल्ला

दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यात स्थायिक होऊ नका, असा सल्ला परराज्यातील लोकांना दिला आहे. विरियातो फर्नांडिस यांना भविष्यातील पाण्याच्या टंचाईचे संकट दिसल्याने त्यांनी तो इशारा दिला आहे. गोव्यात पाण्याची टंचाई भासू शकते त्यामुळे स्थायिक होणे टाळावे असे त्यांना सांगायचे आहे. विरियातो यांचा सल्ला मानला आणि अचानक जमीन विक्री व्यवहार थांबले तर काय होऊ शकते, याची नुसती कल्पना केली तरी ती भयानक आहे. त्याशिवाय विक्री व्यवहारातून महसूल प्राप्ती होत असल्याने सरकारी तिजोरीत अनासाये दिवसांगनिक मोठी रक्कम जमा होते. त्यामुळे विरियातो यांचा सल्ला माणून कोणी दिल्लीकर किंवा इतर राज्यातील इच्छुक फ्लॅट, व्हीला किंवा जागा खरेदी करायचे टाळणार असेल तर अनेकजण त्याला वेड्यात काढतील नाही का? विरियातोंनी जी भीती व्यक्त केली आहे, ती खरोखर जलस्रोत मंत्र्यांनी किती गंभीरतेने घेतली आहे, हे त्यांनाच माहीत. कारण त्यांच्या मते राज्यात आवश्यक तेवढ्या लघु बंधाऱ्यांची उभारणी झाल्यास पाणी टंचाई होणार नाही. एक मात्र की पाण्याचे साठे मुबलक असताना अजूनही तांत्रिक टंचाई निर्माण होते की घडवून आणली जाते, याचा सोक्षमोक्ष कोण लावणार?

गोमंतकीय मत्स्य विक्रेते घटताहेत!

फोंड्यातील मासळी मार्केटचे अखेर स्थलांतर झाले. पालिकेकडे म्हणे १२० मासळी विक्रेत्यांची नोंद आहे, त्यातील कितीजण मत्स्य विक्रीचा व्यवसाय करतात, ही बात वेगळी. तरी मूळ गोमंतकीय मासे विक्रेत्यांची संख्या मात्र रोडावत आहे. वास्तविक मासे विक्रीचा धंदा एकदम ‘फर्स्टक्लास’. दुपारपर्यंत मासळी विकली की संध्याकाळी मस्त डुलकी घ्यायची. पण सध्या गोमंतकीय युवकांना हा झटपट रोखीचा धंदा नको आहे, त्यामुळेच तर हा व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती जात आहे

आजवर खोदलेल्या रस्त्यांचे काय?

साबांखाने कालपासून रस्ते खोदण्यावर बंदी घातलेली असून ती म्हणे पावसाळ्यांत अशा खोदकामामुळे लोकांना त्रास होऊं नये या उद्देशाने आहे. मात्र या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. त्यामागील कारणही तसेच आहे. कारण प्रत्यक्षांत साबांखा रस्ते खोदते की रस्ते खोदण्यासाठी परवानगी देते याबाबत सध्या तरी संदेहच आहे. बरे अशा परवानग्या देताना ते ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी प्रचंड रक्कमही अगोदर वसूल करते पण रस्ते दुरुस्त मात्र करत नाही वा वेळेवर ते करत नाही मग घेतलेले पैसे कोणाच्या खिशांत जातात, असा मुद्दा उपस्थित होतो. गेल्या पावसाळ्यानंतर असे असंख्य रस्ते खणलेले आहेत व त्यांची दुरुस्ती झालेली नाही की पावसाळ्यापूर्वी ती होण्याची चिन्हे नाहीत मग नव्याने रस्ते खोदाईवर बंदी घालून काय साध्य होणार रे भाऊ, अशी विचारणा आता होऊ लागली आहे.

पणजीतील ‘त्या’ सातजणी

पणजी महानगरपालिकेच्या सात नगरसेविकांनी नुकताच केरळ दौरा पूर्ण केला. महत्त्वाची बाब म्हणजे कोची महानगरपालिकेला त्यांनी भेट दिली. कोची महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी काढलेल्या छायाचित्रावरून तरी ते दिसते. त्यामुळे त्यांनी तेथील कोची महानगरपालिकेच्या कामाचा खरोखरच आढावा घेतला काय? हा प्रश्न. त्याशिवाय तेथील नगरसेवकांचे बैठकीतील कामकाजाविषयी त्यांनी काही जाणून घेतले काय? हा दुसरा प्रश्न. कारण महानगरपालिकेच्या खर्चातून केरळ अभ्यास दौरा असेल तर वरील प्रश्नांची उत्तरे त्यांनाच माहीत असणार आहेत. कारण पणजी महानगरपालिका सोडली तर राज्यातील नगरपालिकेत नगरसेवक कशापद्धतीने बाजू मांडतात, हे सर्वश्रूत आहे. कोचीतील नगरसेवकांकडून जर त्यांनी काही शिकण्यासारख्या बाबी जाणून घेतल्या असतील, तर त्या येणाऱ्या बैठकीत बोलण्याचा प्रयत्न तरी करतील एवढी अपेक्षा नागरिकांना धरायला काहीच हरकत नाही.

अहवालात दडलंय तरी काय?

शिरगाव येथील चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तथ्य शोधन समितीच्या अहवालात काय दडले आहे, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आपल्याला अहवालाची प्रत मिळेल, असे शिरगावच्या श्री देवी लईराई देवस्थान समितीला वाटते. त्यांनी सरकारने जाहीर केलेला अहवालाचा सारांश भाग याआधीच नाकारला आहे. अहवाल मिळाल्यावर वाद होणार हे ठरून गेलेले असल्याने कारवाई सरकारी अधिकाऱ्यांपुरतीच मर्यादित राहिल, अशी चर्चा सुरू झालीय.

‘युगोडेपा’चे दुकान पुन्हा उघडणार!

गोव्यात असेही काही राजकीय पक्ष आहेत, की जे निवडणुकीची घोषणा झाली की जागे होतात व पराभवाची खात्री असूनही उमेदवार उभे करतात. त्यांतून साध्य काय होते ते त्यांचे त्यांनाच माहीत. ‘युगोडेपा’ हा पक्षही या वर्गांत मोडतो. सध्या या पक्षाचे पदाधिकारी कोण त्या बाबत प्रश्नचिन्ह आहे . पण तरीही म्हणे त्या पक्षाला सक्रिय करण्याची तयारी काहींनी सुरू केली आहे. हा पक्ष असूं द्या वा कॉंग्रेस वा ‘आप’ या सर्वांचा मतदार एकच आहे व म्हणूनच असेल कदाचित कॉंग्रेसने उमेदवार उभे न केल्यास तेथे ‘युगोडेपा’ उमेदवार उभे करेल, असे संकेत दिले जाताहेत. याचाच अर्थ गोव्यात आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीचा बोऱ्या वाजेल, असेच राजकीय निरीक्षक मानू लागलेत. गोव्यात एकेकाळी ‘युगोडेपा’चा दबदबा होता. पण नंतर त्याचे आमदार काँग्रेसच्याच वळचणीला गेल्याचा इतिहास असल्याने त्यांच्या नव्या दुकानाला गिऱ्हाईक किती मिळणार, असा प्रश्‍न केला जाऊ लागलाय.

जनहित याचिकादारांची उलटतपासणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर करणाऱ्यांची संख्या गेल्या महिनाभरात कमी झाली आहे. ज्या जनहित याचिका खंडपीठासमोर आहेत त्या याचिकादारांचे धाबे दणाणले आहेत. जनहित विषय घेऊन न्यायालयात येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे मात्र काही एनजीओ व समाजकार्यकर्त्यांनी मोठ्या कंपन्यांच्या बांधकामाविरोधात कोणताही अभ्यास व ठोस माहिती न घेता जनहित याचिका सादर करत आहेत त्यांना चांगलीच चपराक बसत आहे. हल्लीच एक जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. काही नागरिकांचे विषय हे सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालयात घेऊन जात आहेत. त्यामुळे जनहित याचिकेवेळी उच्च न्यायालयाने या याचिकादारांची उलटतपासणी सुरू केली आहे. एखाद्या बांधकामामुळे याचिकादाराचे कसे नुकसान होते, असे प्रश्‍न उच्च न्यायालयाकडून विचारले गेल्यावर त्यांची बोबडी वळताना दिसते. जनहित याचिका फक्त सादर करून उच्च न्यायालयाने आदेश घ्यायचे इतके नसून याचिकादारानेही त्यावर तोडगा काढण्यासाठी पर्याय व उपाय सुचवण्यास सांगितल्यावर याचिकादारांकडे काहीच विषय नसताना दिसते. उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे जनहित याचिकादार म्हणवणाऱ्यांच्या ह्रदयात धडकी भरली आहे. ∙∙∙

कोकणी अकादमी नव्या गियरात!

कोकणीत म्हणी आणि लोकगीते उदंड व विपूल. ‘आयज येतोलो, फाल्यां येतोलो पूण पावोन पावोना....’ असं एक अर्थपूर्ण कोकणी गीत आहे. त्याचा अर्थ लागत नव्हता. तो काल आकळला, असे अनेक कोकणी अभ्यासक बोलत होते. शेवटी कोकणी अकादमीला नवीन अध्यक्ष मिळाला. अकादमीचा इतिहास गाजलेला व गांजलेला आहेच. नवीन अध्यक्ष आता नवचैतन्य आणतील, असा भरवसा सगळ्यांना आहे ही समाधानाची बाब. अनेक लोक बाशिंग बांधून होते. पण सोयरीक एकट्याचीच जुळते ना, तसे. पण एकपत्नीव्रत असतं तसं एकपदव्रत असावं, असेही काही जण म्हणतात. अध्यापनाचा व्यवसाय, संस्थांचे पदाधिकारी व अकादमीचा तिसरा व्याप-ताप हाताळणं हे आव्हान म्हणजे ‘कन्फ्लीक्ट ऑफ इन्टरेस्ट’ असे कोकणी आदोगाद बोलतात. वसंत सावंत मात्र प्रभारी अध्यक्ष म्हणून आपलं नांव यशस्वीपणे कोरून सावर्डेला गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT