विकास नेमका कोणासाठी?
पर्वरी उड्डाणपुलासाठी ६०० कोटींहून अधिक खर्च झाला; पण वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’च असल्याची चर्चा आता वाहनचालकांमध्ये रंगू लागली आहे. पूल उभारला तो वाहतूक सुरळीत करण्यासाठी की कोंडीचा मार्ग बदलण्यासाठी, असा मिश्कील सवालही आता विचारला जातोय. विकासकामामुळे वाहनांना वेळ वाचला, प्रवास सुकर झाला आणि कोंडी कमी झाली तरच त्या विकासाला अर्थ; अन्यथा कोट्यवधींचा खर्च करूनही जर वाहनचालकांचा वेळ कोंडीतच जात असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी? असा प्रश्नही वाहनचालकांमधून विचारला जात आहे.
चिराग यांचे पोस्टर हटविले
सध्या चतुर्थीचा सण असल्याने कित्येक स्थानिक राजकारण्यांनी लोकांना शुभेच्छा देणारे आपले पोस्टर लावले आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त नेत्यांनी पालिकेची किंवा संबंधित खात्याची परवानगी न घेता हे पोस्टर लावलेले आहेत; पण सणासुदीचा काळ असल्याने संबंधित खाती त्याकडे दुर्लक्ष करतात. मडगाव येथील युवा नेते चिराग नायक यांनी लावलेले शुभेच्छा फलक संबंधित खात्याची परवानगी न घेतल्याचे कारण दाखवून काढून टाकले. आता यामागचा बोलविता धनी कोण असेल, हे मडगावातील सर्वांनाच ठाऊक आहे. अनेकांच्या या चुकीकडे दुर्लक्ष करणारी पालिका चिरागबाबत एवढी सतर्क होण्यामागेही तेच कारण आहे. पोस्टर काढले म्हणून त्याचा काही फायदा होईल का? याचे उत्तर काही राजकीय नेते काय बरे देतील?
मुख्यमंत्र्यांच्या घरी गर्दी
गणेश चतुर्थीच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाणे येणे हे असतेच. गणेशाचे आशीर्वाद घ्यायला किंवा शुभेच्छा द्यायला कोणी कोणाकडे जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न; पण मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन आणि तेसुद्धा या निवडणुकीच्या वर्षात गणेशाचे दर्शन घेणे याला काही आगळेवेगळे असे कारण असू शकते. मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रवीण आर्लेकर, संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई हेही जाऊन आले. रेजिनाल्ड व चर्चिलही मुख्यमंत्र्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन आले. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की निवडणुकीत भाजपची उमेदवारी देणारा आपण कोणीही नाही. सर्व काही पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. मात्र, चतुर्थीचे निमित्त काही का असेना, ही गर्दी पाहून शेवटी मुख्यमंत्रीच उमेदवारी तर ठरवणार नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
चर्चिलचे काँग्रेसप्रेम
चर्चिल आलेमाव म्हणजे रोखठोक बोलणारे नेते. चतुर्थीच्या दिवशी त्यांनी राजकीय फटाकेच उडविले. राज्यात विविध पक्षांचे मनोमीलन सुरू झाले असताना चर्चिलबाबांनी मात्र काँग्रेस ‘महासागर’ असल्याचे सांगत पक्षाचे जोरदार कौतुक केले. विजयबाब ‘आप’सोबत गेले म्हणून काँग्रेसला काही फरक पडणार नाही, असे सांगताना चर्चिल यांनी छोटे पक्ष आणि राजकारणी म्हणजे महासागरातील मासे असल्याचेही सांगून टाकले. एवढेच नव्हे, तर आगामी निवडणुकीत काँग्रेसच पुढे असेल, असा विश्वासही व्यक्त केला. आता काँग्रेसच्या या ‘महासागरा’ला पाहून चर्चिलबाबांच्या मनात भरतीची लाट इतकी जोरात कशी आली, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काब्रालांचे आव्हान!
कुडचडे मतदारसंघाचे भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांचा सहनशीलतेचा बांध तुटला असणार म्हणूनच भाजपची उमेदवारी स्वीकारावी की नाही याचा विचार करावा लागणार, असे सांगून काब्राल यांनी भाजपच्या तिकिटाचा दर्जाच कमी करून भाजपला आव्हान देण्याचे धाडस केले. भाजप आता जुना निष्ठावानांचा पक्ष राहिला नसून तो आता इतर पक्षांतून आलेल्यांचे ‘खतखते’ झाल्याचा काब्रालचा आरोप असून भाजपचे बरेच निष्ठावान कार्यकर्तेही ते मान्य करतात. काब्राल यांनी भाजपला आव्हान देण्याचे धाडस केले आहे, याचा अर्थ काब्राल आता कुडचडेच्या मैदानावर भाजपशी दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत, असे म्हणायचे का?
बॅनर ‘वॉर’
सण, वाढदिवस किंवा इतर काही उत्सवाच्या वेळी राजकारणी शहरात जागोजागी आपल्या फोटोसह शुभेच्छा देणारे फलक (बॅनर) लावतात, ही नित्याचीच बाब आहे. मोठ-मोठे फलक व बॅनर लावले म्हणून मते मिळतात, असेही नाही; पण लोकांना आकर्षित करण्यासाठी व आपले अस्तित्व दाखवण्यासाठी अशाप्रकारचे बॅनर व फलक लावले जातात. मात्र, चतुर्थीच्या या ऐन सणाच्या वेळी मडगावात मात्र बॅनर वॉर सुरू झाले आहे. नगरपालिका व सरकारी खात्यांना हाताशी धरून दुसऱ्यांचे फलक काढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कदाचित नगरपालिकेकडून परवानगी घेतली नसावी म्हणून हे फालक काढले हे चांगले कारण असू शकते; पण ज्यांचे फलक काढले नाहीत, त्यांनी तरी नगरपालिकेची परवानगी घेतली असेल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. जर ज्यांचे फलक काढले आहेत, त्यांनी नगरपालिकेकडे परवानगी मागितली असती तर तो अर्ज निर्णयाविना अजूनही तसाच पडून राहिला असता. यापूर्वी विरोधकांना परवानगी नाकारण्याचे प्रकार मडगावात घडले आहेत. यावेळी फलक काढले त्यात नावीन्य काही नाही. मात्र, ज्यांच्यासाठी हे फलक काढले गेले त्यांच्याबद्दल मात्र लोकांमध्ये चीड निश्चितच निर्माण झाली असावी, असे बोलणे सुरू झाले आहे.
गणपतीनंतरची गणिते
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांच्या गणेशाचे दर्शन घेताना दिसत आहेत. कोणीच त्याला अपवाद नाहीत. कोलवा, बाणावली, नावेली, कुडतरी, राय आणि शिरसई येथील जिल्हा पंचायत सदस्यांनी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या कुडचडे येथील निवासस्थानी भेट देत शुभेच्छा दिल्या. त्यातच आता काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाशी संबंधित निवडून आलेले प्रतिनिधी एकाच छताखाली आल्याने राजकीय चर्चेला गती मिळाली आहे. ही केवळ गणेशोत्सवाची सदिच्छा भेट की, २०२७च्या राजकीय समीकरणांची नांदी, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. गणपतीच्या आरतीनंतर राजकीय समीकरणांची घंटा वाजेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एल्विस ‘गोवा फर्स्ट’ युतीचे उमेदवार?
राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो आणि कोणीही कायमचा शत्रू नसतो. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात मोठी ‘राजकीय उथलपुथल’ होण्याची शक्यता आहे. काही राजकीय नेत्यांची सध्या असलेल्या राजकीय पक्षात घुस्मट होत असल्यामुळे काही नेते मोठा राजकीय पक्ष सोडून नव्या राजकीय पक्षांत प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. ‘गोवा फर्स्ट’ युतीत नवीन राजकीय समीकरण समाविष्ट होणार, अशी चर्चा आहे. काँग्रेस पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी तर आपण जनतेचा उमेदवार म्हणून कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, कुंकळ्ळीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव कॉंग्रेसचा चेहरा असल्यामुळे एल्विस ‘गोवा फर्स्ट’ युतीचे उमेदवार असतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सॅटर्डे क्लब सदस्यांची अशीही गोची
मडगाव येथे ‘सॅटर्डे क्लब’ नावाचा एक गट आहे. ज्यातील काही सदस्य गोवा फॉरवर्ड या पक्षाचे पदाधिकारी आहेत. मात्र, असे म्हणतात की, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा काही काँग्रेस नेत्यांना ते अधिक जवळचे आहेत; पण ते कधी तसे असल्याचे भासवत नाहीत. विजय सरदेसाई यांनी काँग्रेस पक्षाला अंगठा दाखवून ‘आप’शी सोयरिक साधल्यावर या दोन्ही होड्यांवर पाय ठेवून राहणाऱ्या या सदस्यांची गोची झाली. त्यातील काहीजण असे आहेत, ज्यांना काँग्रेस नेत्यांशी फारकत घ्यायची नाही आणि गोवा फॉरवर्ड पक्षही सोडायचा नाही. त्यांची गत इकडे आड आणि तिकडे विहीर अशातलीच झाली आहे. यातील कितीजण गोवा फॉरवर्ड सोडायची धमक दाखवतात हेच पाहावे लागेल.
‘लुथरा’ घोटाळ्यातच कसे?
‘बर्च बाय लेन’ प्रकरणात सौरव व गौरव लुथरा हे बंधू चांगलेच अडकले आहेत. बेकायदेशीर गोष्टी करून संपत्ती निर्माण करण्याचा हव्यास त्यांना भोवला; पण आता आणखी एक लुथरा सध्या राष्ट्रीय स्तरावर गाजू लागला आहे. उपकार लुथरा याने सोनिपतमध्ये खोटे नाणी तयार करणारे टंकसाळच खोलले होते. दोन रुपयांची सुमारे ७० कोटींची खोटी नाणी या महाशयाने तयार केली. विशेष बाब म्हणजे यातील यापूर्वी काही नाणी अनेक राज्यात पोहोचली आणि ती व्यवहारातही आली-गेली. त्यामुळे ‘लुथरा’ आडनाव असलेल्या इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात खरात प्रकरणामुळे या आडनावाच्या लोकांना बदनामीला सामोरे जावे लागले होते, हे त्याचे ताजे उदाहरणच आहे. आणखी किती ‘लुथरा’ आडनावातील व्यक्ती कोणत्या बेकायदेशीर कृत्यात समोर येतात, याकडे अनेकांचे लक्ष असणार हे निश्चित.
त्यांनी संधी गमावली?
गणपती उत्सव कुटुंबांना व मनांना जवळ आणणारा उत्सव. या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या मतदारांना भेटण्याची एक नामी संधी कुंकळ्ळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनी गमावली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्वत:ला जनतेचा उमेदवार म्हणविणारे एल्विस गावात दिसले नाहीत, असे आम्ही नव्हे मतदार म्हणतात. विद्यमान आमदार युरी आलेमाव यांना आपल्या मतदारांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यास वेळ मिळाला नाही. भाजपचे सुदेश भिसे, विशाल देसाई कोणीच गावात फिरले नाहीत. जनतेशी कनेक्ट न होणाऱ्यांना जनता जवळ करीत नाही, हे या नेत्यांना कोण सांगणार?
मोरया रे...
सार्वजनिक गणपतीचे कार्यक्रम सुरू होणार. गोवा ही कलाकारांची खाण आहे; पण त्यात कल्पकतेने अनेक कार्यक्रम करायला भरपूर वाव आहे. नाट्यछटा किंवा मोनोलॉग स्पर्धा करता येते, ज्यात विषयाची सांगड गणपती बोलतोय, संवाद साधतोय असे दाखवू शकतो. संहिता लेखनही होऊन जाईल. सादरीकरण, अभिनय करायला एक मंच मिळेल. मुलांना गणपतीविषयी जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल यावर भर असायला हवा. संस्कार महत्त्वाचे. तो फोकस हलता कामा नये.
चोपडे सर्कलवर शुभेच्छांची रेलचेल
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मांद्रे मतदारसंघातील चोपडे सर्कलचा चेहरामोहरा सध्या चांगलाच बदलून गेलाय. चौकाच्या चारही बाजूंनी विविध नेत्यांचे मोठे आणि रंगीबेरंगी शुभेच्छा फलक लागले असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष नकळत तिकडे वेधले जातेय. श्रींच्या आगमनाच्या आनंदासोबतच आपल्या लाडक्या नेत्याचे छायाचित्र अधिक उठावदार कसे दिसेल, याची एक चढाओढ कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतेय. कोणाचा फलक किती आकर्षक आणि कोणाचा संदेश अधिक प्रभावी, यावर चौकात थांबणाऱ्या लोकांमध्ये हलकीफुलकी चर्चा रंगते आहे. सणाच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधण्याची ही एक अनोखी वाट असली, तरी सर्कलवर झालेली ही भाऊगर्दी पाहून सध्या गणपतीच्या आशीर्वादासोबतच प्रसिद्धीचीही उत्तम तयारी झालीय, अशी चर्चा नागरिक हसतमुखाने करताना दिसत आहेत.
पंचमीला पंचाईत
पंचमीला नव्याची पूजा करण्यासाठी भाताचे कणीस हवे; पण यंदा पावसाने मध्येच दडी मारल्याने शेतात कणीस दिसेना आणि घराघरांत कणसांचा शोध सुरू झाला. ज्यांच्या शेतात भाताची लोंबी डोलायला हवी, त्यांनाच बाजारात कणीस शोधण्याची वेळ आली. त्यांनी म्हणून हात टेकले नाहीत; बाजारातून कणीस आणले आणि नव्याची पूजा केली. शेवटी पावसाने शेतीला दगा दिला; पण पंचमीच्या श्रद्धेने बाजाराला मात्र चांगलीच संधी दिली.
महाप्रसाद पावतीचे जनक!
काही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा विचार करतात आणि त्यांचा वेगळेपणा नंतर इतरांसाठी एक मार्ग ठरतो. गोव्यात अनेक सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. ही सर्व सार्वजनिक मंडळे वर्गणी गोळा न करता गणेश उत्सवाला महाप्रसादाच्या पावत्या म्हणजे देणगी कूपन्स काढतात व मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या किमतीची देणगी कूपन्स भक्तांना विकली असून लक्झरी गाडीपासून फ्लॅट व बस गाडीपर्यंत बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. यात अग्रस्थानी आहे केपे गणेशोत्सव मंडळ. गोव्यात आज करोडो रुपयांची उलाढाल होते त्याचे जनक होते केपेचे प्रमोद फळदेसाई. एक कायनेटिक स्कूटर बक्षीस ठेवून दिवंगत प्रमोद फळदेसाई यांनी लावलेल्या महाप्रसादाच्या रोपट्याचा आज मोठा वृक्ष बनला आहे. दिवंगत प्रमोद यांनी लावलेल्या झाडाची फळे आज सार्वजनिक मंडळांना मिळत आहेत.
पर्वरी उड्डाणपूल व अटल सेतू
पर्वरीचा उड्डाणपूल सध्या मोठ्या चर्चेत आहे. पूल सुरू झाला आणि आता अपघातांच्या घटना समोर येत असल्याने सरकारने समस्येचा अभ्यास करण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती केली आहे. संस्था अभ्यास करणार, उपाय सुचवणार, अहवाल सरकारकडे देणार आणि मग सरकार निर्णय घेणार, हे सगळे होईपर्यंत उड्डाणपूल बंद होणार नाही ना, अशी धाकधूक वाहनचालकांच्या मनात निर्माण झाली आहे. कारण अटल सेतूचा अनुभव ताजा आहे. पूल बांधला, सुरू केला आणि नंतर कामासाठी बंद केला. आता पर्वरी उड्डाणपुलाचीही तीच गत होऊ नये, अशीच प्रार्थना वाहनचालक गणपती बाप्पाकडे करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.