Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Khari Kujbuj Political Satire: आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच हळदोणे मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच हळदोणे मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतल्याने, हा गड परत मिळविणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. मात्र, तिकीट वाटपावरून पक्षातच दोन दावेदारांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. एकीकडे दोन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार ग्लेन टिकलो आपल्या जुन्या जनसंपर्काच्या जोरावर पुन्हा रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर भक्कम पकड असलेले विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. चर्चेनुसार, बार्देश तालुक्यातील एका वजनदार भाजप मंत्र्यांचा वरदहस्त आणि पाठिंबा थेट साळगावकरांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे टिकलो यांची कोंडी होणार का? आणि पक्षश्रेष्ठी जुन्या अनुभवी चेहऱ्याला पसंती देणार की बार्देशच्या मंत्र्यांच्या मर्जीतील साळगावकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार, याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ऑक्टोबरमध्येच मे महिन्याचा तडाखा!

ऑक्टोबरमध्येच मे महिन्याचा तडाखा जाणवू लागल्याने यंदाचा उन्हाळा कसा जाणार, याची चिंता आतापासूनच सतावू लागली आहे. पाऊस कमी झाल्याने जानेवारीनंतर पाणीटंचाईचे आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात जलस्रोत खात्याचे पंचवीसहून अधिक बंधारे आहेत. या जलसाठ्याचे योग्य नियोजन केल्यास संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. जलस्रोत आणि पाणीपुरवठा खात्याने एकत्र येऊन जलसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या कामाला गती दिल्यास पाणीबाणीचे संकट टाळण्यासाठी निश्चितच मदत होईल. शेवटी, पाणी वाचवणे म्हणजेच भविष्य सुरक्षित करणे, अशी चर्चा सुरू आहे.

चूक सुधारली; पण...

नवरात्रोत्‍सवानिमित्त पेडणे येथे उभारण्‍यात आलेल्‍या फलकावर पेडणेचे भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच राज्‍यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांचे फोटो झळकवले; पण प्रदेशाध्‍यक्ष असलेल्‍या दामू नाईक यांचा फोटो मात्र त्‍यांनी टाळला. नंतर ती चूक सुधारली. मात्र, यावरून पेडण्‍यातील भंडारी समाजाचे नेते तसेच भाजप कार्यकर्त्यांमध्‍येही चीड निर्माण झालेली आहे. त्‍यातच विधानसभा निवडणूक अवघ्‍या महिन्‍यांवर आलेली असून, भाजपने उमेदवारांची निवड करण्‍याची प्रक्रियाही सुरू केलेली आहे. या प्रक्रियेत प्रदेशाध्‍यक्षांची भूमिका अतिशय महत्त्‍वाची असते. दुसरीकडे, प्रवीण आर्लेकर यांच्‍या कामावर भाजप आधीपासूनच नाराज आहे. त्‍यातच आता आर्लेकर यांनी फलकावर पहिल्यांदा दामू नाईक यांचा फोटो न लावल्‍याने आर्लेकर यांची भाजप उमेदवारी धोक्यात असल्‍याची चर्चा पेडण्‍यात सुरू झाली आहे.

प्रदूषणात कुंकळ्ळी पुढे!

ज्या ऐतिहासिक शूर भूमी कुंकळ्ळीने गोवा मुक्तिलढ्यात मोलाचे योगदान दिले ती कुंकळ्ळी आज प्रदूषणात तिसऱ्या क्रमांकावर आहे, ही या शूरवीरांच्या भूमीची शोकांतिका नव्हे काय? एके काळी गोवा म्हणजे नंदनवन समजले जायचे. आज उष्णतेत देशात गोवा अव्वल स्थानी आहे. त्यात गोव्यातील सगळ्यांत जास्त प्रदूषित अशा तीन नगरांत कुंकळ्ळीचा नंबर लागतो. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू गुणवत्ता निर्देशांक जाहीर केले आहेत. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये सगळ्यांत वरचा क्रमांक लागतो रायबंदर गावचा. त्यापाठोपाठ फोंडा व कुंकळ्ळी शहराचा नंबर लागतो. याचा अर्थ सगळ्यात अतिप्रदूषित स्थळ म्हणून रायबंदर, फोंडा व कुंकळ्ळी या शहरांनी नंबर पटकावला आहे. या शहरात राहणारे लोक सगळ्यात जास्त दूषित हवा घेतात. याचाच अर्थ गोवा राखलेल्या कुंकळ्ळीची फुफ्फुसे प्रदूषित झाली आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव कुंकळ्ळीचे आमदार असूनही कुंकळ्ळीकरांच्या पदरी एवढे प्रदूषण का?

घोषणा दिल्या कोणी?

आझाद मैदानावर आंदोलन झाले, तत्पूर्वी काढलेल्या फेरीतील कोणीतरी हिंदुत्ववादी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर आता ‘सीजेपी’ने त्यापासून स्वतःला दूर केले आहे. त्या फेरीतील आपल्या कार्यकर्त्यांनी त्या घोषणा दिल्या नाहीत. आम्ही सर्वधर्मसमभाव पाळतो, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने तशा घोषणा देण्यासाठी त्या फेरीत माणसे कोणी घुसवली होती, याची चौकशी करा, असे म्‍हणत त्यापासून स्वतःला दूर केले आहे. त्यामुळे घोषणा दिल्या तरी कोणी? हा प्रश्न अधिक गहन झाला आहे.

कॉपीचा असाही परिणाम

आयआयटीच्या परीक्षेत ब्लूटूथचा वापर झाला. त्यामुळे परीक्षा रद्द केली तरी महाविद्यालयांच्या इतर परीक्षांवर त्याचा परिणाम झाला. स्मार्ट किंवा डिजिटल घड्याळे परिधान करून परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी येऊ नयेत, असे फतवे जारी झाले. आजच्या काळात ॲनालॉग घड्याळे युवावर्ग फारसा वापरत नाही. त्यामुळे ऑनलाईन खरेदी केलेली घड्याळे परीक्षेपूर्वी मिळण्यासाठी धडपड सुरू झाली. काहींनी बाजाराची वाट केवळ घड्याळ खरेदीसाठी धरली. एक कॉपी इतरांवर काय परिणाम करू शकते, याचे हे चपखल उदाहरण ठरावे.

‘कदंब’चे अधिकारी झोपा काढतात काय?

परराज्यातील बसफेऱ्यांमुळे कदंब परिवहन महामंडळाला काही कोटींचा फायदा झाला होता, म्हणून खास चेअरमन उल्हास तुयेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. महामंडळासाठी ही नक्कीच सुखद गोष्ट; परंतु महामंडळातील अधिकारी खरोखरच ज्या पदावर काम करतात, त्या पदाला किती महत्त्व देतात, हे काही समजत नाही. गलेलठ्ठ पगार घेऊन खुर्ची उबवण्याचे काम करणारे महाभाग सरकारी खात्यात काही कमी नाहीत, त्याला महामंडळही अपवाद कसे? सांताक्रूझ येथील बायपास मार्गावर गेल्या दहा दिवसांपासून कदंब महामंडळाची बस बंद पडली आहे. रस्त्याच्या बाजूला चालकाने ती उभी केली आहे. त्या चालकाने संबंधित अधिकाऱ्यांना किंवा विभागप्रमुखाला याची माहितीही दिली असेल; पण बस काही तिथून नेण्याचे काम तडीस नेण्यात कोणीही कसा पुढाकार घेतला नाही, असा प्रश्न पडतो. त्यामुळे तुयेकर यांनी महामंडळाचे काम एका सुरात आणण्यासाठी काही कडक पावले उचलावीत, अन्यथा आयाराम-गयाराम सारखी स्थिती होईल.

‘आरजी’, गोवा फॉरवर्डला तळमळत राहावे लागेल?

येत्‍या विधानसभा निवडणुकीत रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षासोबत (आरजी) आघाडी करण्‍याचे काँग्रेसने निश्‍चित केले आहे. काँग्रेस नेत्‍यांची ‘आरजी’सोबत आघाडीबाबतची चर्चा सफल झाली असली, तरी जागावाटपासंदर्भातील चर्चा मात्र पुढे ढकलत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस-‘आरजी’च्‍या आघाडीसोबत जाण्‍याचे ठरवून आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड-‘आप’मधील युती काहीच दिवसांत तोडल्‍याचेही लपून राहिलेले नाही. अशा स्‍थितीत ‘आप’च्‍या आधीच्‍या दाव्‍यांनुसार, काँग्रेस जागा वाटपाबाबत ‘आरजी’ आणि गोवा फॉरवर्डला अखेरच्‍या क्षणापर्यंत तळमळत ठेवणार तर नाही ना? असा प्रश्‍‍न या दोन्‍ही पक्षांच्‍या कार्यकर्त्यांना पडला आहे.

जॉनकडून अमितची पाठराखण

व्हाया गोवा फॉरवर्ड काँग्रेस पक्षात सामील झालेले सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ हे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत की नाहीत, हे माहित नाही; पण काल त्यांनी आपल्या फेसबुकवरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची पाठराखण केली आहे. काँग्रेसला अमितची जेव्हा गरज होती, त्यावेळी त्यांना वापरून घेतले आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिले, असे म्हटले आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहिल्यास जॉन यांनी जे काय म्हटले आहे त्याला कुणी हरकत घेणार नाही. कदाचित गोय राखण यात्रा झाल्यानंतर आणखी कितीजणांच्या विकेट काँग्रेसमध्ये पडणार देवास ठाऊक? नाहीतरी ‘यूज अँड थ्रो’ ही सध्याच्या काँग्रेसची रीतच बनली आहे ना!

सायबर गुन्हेगारांचेही गोवा ‘डेस्टिनेशन’?

गोव्याची ओळख जगभरात ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; पण आता सायबर गुन्हेगारांनाही गोव्याची भुरळ पडली की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. कांदोळीत मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. पर्यटनासाठी प्रसिद्ध गोवा गुन्हेगारांचेही आश्रयस्थान बनत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. सरकार पर्यटनाची जाहिरात करेल; पण गुन्हेगारांच्या ‘डेस्टिनेशन’वर लक्ष कोण ठेवणार? हा खरा सवाल आहे.

रितेशची उमेदवारी पक्की?

दिवंगत रवी नाईक यांच्या पुतळ्याचे काल अनावरण व नंतरच्या झालेल्या त्यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला कामाचा दिवस असूनही झालेली गर्दी पाहून रवी पुत्र रितेश व रॉयबरोबरच तिथे उपस्थित असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही बरेच खुश दिसत होते. ते पाहून रितेशना फोंड्याची भाजपची उमेदवारी पक्की झाली असल्याची चर्चा मंडपात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये सुरू होती; पण राजकारण ही दरदिवशी बदलणारी प्रक्रिया असते, त्यामुळे निवडणूक जाहीर होईपर्यंत काहीही होऊ शकते, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. पण, कालचा दिवस तरी रितेश यांचा होता, एवढे मात्र नक्की.

काँग्रेसची आठवण!

‘वारे येता तशे सूप धरप’ ही कोकणी म्हण राजकारण्यांना तंतोतंत लागू पडते. निवडणुका जवळ येताच काँग्रेस सोडलेल्या नेत्यांना पक्षाची महती पुन्हा आठवू लागली आहे. नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान आणि कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांना आता काँग्रेस हृदयात असल्याची जाणीव झाली आहे; पण मायकल लोबोंच्या उमेदवारीवरून पक्ष सोडताना आग्नेलची ही जाणीव कुठे होती? गद्दारांना प्रवेश नाही, असे म्हणणाऱ्या काँग्रेसने प्रतिमा कुतिन्हो आणि आग्नेल फर्नांडिस यांच्यासाठी दारे उघडलीच. मग बाबाशान आणि इतरांसाठी ती बंद राहतील, अशी अपेक्षा तरी कशाला? निवडणुकीचे वारे वाहू लागले की तत्त्वनिष्ठेची दिशा बदलते, हेच खरे!

नरकासुराला विरोध, कृष्णपूजेचे काय?

नरकासुर दहनाच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत सुरू असणारा धिंगाणा आणि त्यातून घडणारे गैरप्रकार सर्वश्रुत आहेत. मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही नरकासुर परंपरेला विरोध केला आहे. त्यांची भूमिका अनेकांना पटलीही. मात्र, यानिमित्ताने काही वर्षांपूर्वी त्यांनीच केलेल्या एका विधानाची आठवण झाली. श्रीकृष्ण पूजेला प्रोत्साहन देणार, असे ते म्हणाले होते. प्रत्यक्षात या दिशेने फारसे काही घडल्याचे दिसत नाही. नरकासुर निर्मितीला कला मानण्यास नकार देणारे मंत्री यंदा तरी श्रीकृष्ण पूजेच्या प्रसारासाठी पुढाकार घेणार का, की त्यांचे ते आश्वासन हवेतच विरणार, अशी चर्चा आता सुरू आहे!

चित्रिकरणाचा त्रास

सध्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात मखरोत्सव सुरू असतात. देवळात गर्दी खूप असते. मखर उत्सव सुरू असताना अनेक युवक मोबाईलद्वारे चित्रिकरण करताना दिसतात. खाली बसू शकत नाही, अशा वृद्धांना, दिव्यांगांना बसायला मागे व्यवस्था असते. त्यांच्यापुढे उभे राहून हे चित्रिकरण सुरू असल्यावर दिसणार कसे? एका आजोबांनी युवा कॅमेरामनला विनंती केली. बाळा, मला दिसत नाही, मखर आणि देवीची मूर्ती, जे दर्शन घ्यायला मी दुरून रात्री इथे आलोय. पाच मिनिटे प्लीज म्हणत, तो व्हिडिओ शूट करत राहिला. स्पर्धा कसली चाललीय ही? सोशल मीडियावर सर्वात आधी पोहोचायची? देवळात मखरोत्सव सुरू असताना पुढे हे अगणित कॅमेरावीर हात उंचावून चित्रिकरण करत असतात. यावर बंदी घालावी, अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. यात शिस्त यायलाच हवी.

नवीन वैद्यकीय महाविद्यालय कुंकळ्ळीत?

कुंकळ्ळीचे नाव शैक्षणिक हब म्हणून देशाच्या नकाशावर झळकायला लागले आहे. केंद्र सरकारने गोव्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेस मंजुरी दिली असून या केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पन्नास जागा असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे वैद्यकीय महाविद्यालय कुंकळ्ळीत येत असल्याची खबर आहे. कुंकळ्ळीत यापूर्वीच ‘एनआयटी’ स्थापन करण्यात आली आहे. कुंकळ्ळीच्या उत्तर सीमेवर पारूल हे खासगी विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. कुंकळ्ळीच्या पूर्व सीमेवर गणपत विद्यापीठ स्थापन होणार असल्याची खबर आहे. आता कुंकळ्ळीत नवीन केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार. या सगळ्यांचा फायदा स्थानिकांना किती होणार? हा प्रश्न आहेच. एक मात्र खरे कुंकळ्ळीचे नाव आता शैक्षणिक नकाशावर शैक्षणिक हब म्हणून चमकणार, हे निश्चित.

कारवाई होणार का?

गोवा अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एएनसी) पोलिस ठाण्यात १४ पोलिसांची बदली करण्यात आली असून, त्यात चार उपनिरीक्षक आणि दहा कॉन्स्टेबलांचा समावेश आहे. या बदलीमुळे ‘एएनसी’ची ताकद वाढणार की केवळ मनुष्यबळाची आकडेवारी, हे पाहावे लागेल. अमलीपदार्थांचे जाळे विणणारे आपले काम चोख बजावत असताना, त्यांना रोखण्याची जबाबदारी असलेले पथक आता नव्या दमाने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मात्र, या चौदा जणांच्या आगमनाने अमलीपदार्थांच्या धंद्याला खरोखरच लगाम बसणार की बदलीचे आदेश काढूनच कर्तव्यपूर्तीचा आनंद साजरा होणार, हे येणारा काळच ठरवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

VIDEO: 'अमेरिका-पाक युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानसोबत!'; राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ, काँग्रेस-आप आक्रमक

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

SCROLL FOR NEXT