राजकीय इच्छा विरुद्ध जनहिताची खरी कसोटी!
राज्य दिव्यांग आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर यांनी म्हापसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, केवळ निवडणूक लढवायची आहे अथवा कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा आग्रह आहे म्हणून थेट मैदानात उतरणे पुरेसे नसते. ही उमेदवारीची इच्छा नक्की का निर्माण झाली, शहरात अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही की विद्यमान आमदारांच्या कार्यक्षमतेवर विश्वास उरलेला नाही, हे इच्छुकांनी मतदारांपुढे स्पष्टपणे मांडायला हवे. केवळ पक्षादेशाच्या आडोशाला न थांबता म्हापशाला भेडसावणारे मूलभूत प्रश्न, समस्या आणि मतदारसंघाच्या गरजांवर धडाडीने बोलण्याची हिंमत दाखवणे गरजेचे असते. संकटांना थेट अंगावर घेऊन शहराच्या विकासाची स्पष्ट भूमिका मांडणाराच खरा जननेता ठरतो; केवळ स्वतःची राजकीय इच्छा व्यक्त करून लोकप्रतिनिधी होता येत नाही, याचे भान असणेही तितकेच गरजेचे आहे.
मतदारांसाठी देवदर्शन!
विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे पुढील दीड दोन महिन्यांत कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून सध्या मतदारांना खूष करण्यासाठी देवदर्शनाच्या सहलींचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होईपर्यंत मतदारांच्या पाहिजे त्या ठिकाणी देवदर्शनाच्या सहली निघतील हे मात्र निश्चित. सध्या काही इच्छुकांनी शिर्डीपासून अयोध्यांपर्यंत सहली काढलेल्या आहेत. त्यांनी पाठविलेल्या वाहनांसोबत सहलीला निघालेल्या लोकांसमवेतची छायाचित्रे आणि व्हिडिओ समाज माध्यमांत झळकत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत अशा सहलींची वाढ होणार हेच यावरून दिसते.
इफ्फीला यंदा नवा साज
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुक्रवारपासून सुरवात होत असून, यंदाच्या ‘इफ्फी’ची रंगत काहीशी वेगळी असणार आहे. कोकणी आणि मराठी चित्रपटांची मांदियाळी महोत्सवाची लज्जत वाढवणार आहे. स्थानिक भाषांतील चित्रपटांना मिळणारे व्यासपीठ ही गोमंतकीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची बाब ठरणार आहे. त्यातच, चित्रपट निर्मात्यांना सरकारकडून देय असलेले अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक चित्रपट निर्मितीला नवे बळ मिळू शकते. तसेच यंदा बक्षीस रकमेतही भरीव वाढ आहे. त्यामुळे यंदा ‘इफ्फी’च्या झगमगाटात केवळ रुपेरी पडद्यावरील चित्रपटच नव्हे, तर गोव्याच्या चित्रपटविश्वाला मिळणारी नवी दिशा हाही चर्चेचा विषय ठरणार आहे.
बदली झाली खरी, मात्र...
अनेक पोलिस बदलीचा आदेश येऊनही पूर्वीच्याच जागेवर चिकटून आहेत. पोलिस मुख्यालयातून बदली झालेल्यांना त्वरित रिलीव्ह करण्याचे आदेशही आले. मात्र, अनेकजण नव्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीत. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी आहे त्या जागेवर मिळणार हफ्ता हेही एक प्रमुख कारण आहे. आपल्या राजकीय गॉडफादरकडे जाऊन काही करा. मात्र, आम्हाला रिलीव्ह करू नका अशी मिनतवारी करून काही महाभाग अजूनही पूर्वीच्या जागी आहेत, तर दुसरीकडे ज्यांचा राजकीय वशिला नव्हता ते बदली झालेल्या नव्या ठिकाणी रुजू झाले आहेत.
आग कशी विझवावी?
बर्च बाय रोमिओ लेन येथील भीषण आगीत अनेकांना जीव गमवावा लागल्यानंतरही संबंधित यंत्रणांनी काही धडा घेतल्याचे दिसत नाही. कळंगुट येथे गुरुवारी दिवसाढवळ्या लागलेल्या आगीत चार शॅक जळून खाक झाले. घटनास्थळी आग विझवण्यासाठी बादल्यांनी पाणी आणणे आणि घमेल्यांतून रेती भरून टाकण्याचे प्रयत्न सुरू होते. आधुनिक पर्यटनाचे ढोल वाजवणाऱ्या गोव्यात आग विझवण्याची व्यवस्था मात्र अजूनही बादल्या आणि घमेल्यांवरच अवलंबून आहे, हे दृश्य बोलके होते. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि आश्वासनांचा धूर निघण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना होणार तरी कधी?
डॉक्टरांचा सल्ला
प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद देसाई यांचा बुधवारी शानदार वाढदिवस समारंभ झाला. यावेळी राजकारण्यांसह अनेक स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यात भाजपचे युवा नेते संकेत आर्सेकर हेही उपस्थित. यावेळी संकेत आर्सेकर यांनी डॉक्टर मिलिंद हे माझ्या मोठ्या भावासारखे असून कित्येकवेळा मी त्यांचा सल्ला घेतो आणि यापुढेही काही करण्यापूर्वी त्यांचाच सल्ला घेईन, असे म्हटले. डॉक्टर देसाई यांनीही संकेत यांच्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात उल्लेख करत वडिलकीच्या नात्याने आपण योग्यतोच सल्ला त्यांना देऊ, असे सांगितले. सावर्डे मतदारसंघातून संकेत आणि डॉ. मिलिंद या दोघांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा यापूर्वी व्यक्त केली होती. अशा स्थितीत डॉक्टर त्यांना काय सल्ला देतील आणि संकेत कोणता त्यांचा सल्ला ऐकतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मुख्यमंत्र्यांकडून सढळहस्ते मदत
बुधवारी मंत्रालयाबाहेर एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मित्रासोबत अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करत मदतीची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भावनांचा आदर करत तात्काळ मदतीचे आश्वासन दिले आणि गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेले वचन पाळत त्या व्यक्तीला सढळहस्ते मदत केली. गोरगरीब जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे, सढळहस्ते मदत करणे हे राज्याचे कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांचे कर्तव्यच आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यात ते कधीही कमी पडलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे हे पद अबाधित आहे. त्यांच्या साखळीतील निवासस्थानी जे लोक आपल्या मागण्या घेऊन जातात, त्यातील बहुतेकांना कधीही खाली हाताने परतावे लागत नाही अशा भावना आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. या देवदर्शनाचे नक्कीच पुण्यफळ त्यांना येत्या निवडणुकीत लाभेल अशा भावनाही त्यांच्या हितचिंतकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
इफ्फी आणि रंगलेली चर्चा
राजधानी पणजी ५७ व्या इफ्फीच्या रंगीबेरंगी रोषणाईत न्हाऊन निघाली आहे. देश-विदेशातील सिनेचाहते, कलाकार आणि समीक्षकांच्या मांदियाळीने वातावरण भारून गेले असून जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, आपले प्रतिनिधी कार्ड घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या चाहत्यांमध्ये सध्या एकाच विषयाची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ‘आयोजनाची’. मागील काही वर्षांतील ढिसाळ नियोजन, तांत्रिक अडचणी आणि तिकिटांचा गोंधळ याचा फटका रसिकांना बसला होता. यंदा तरी हा भूतकाळ पुसला जावा आणि कोणताही व्यत्यय न येता निखळ सिनेमे पाहता यावेत, अशीच अपेक्षा प्रत्येक रसिक व्यक्त करत आहे.
‘सीजेपी’ची गोव्यातून सुरुवात?
नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन छेडत सोशल मीडियावर स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले. त्यामुळे ‘सीजेपी’ देशभरात नावारूपास आली. अजूनही राजकीय पक्षात रूपांतरित न झालेल्या ‘सीजेपी’ने अनेक राज्यांतील सरकारांना घाम फोडला आहे. त्याच ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रंका हे तीन नेते येत्या रविवारी गोव्यात येत आहेत. गोव्यातील तरुणाईशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न हे तीन नेते करणार आहेत. राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करून निवडणुका लढवण्याची अजून तरी इच्छा नसल्याचे ‘सीजेपी’चे नेते सांगत आहेत, परंतु पक्षाचे संस्थापक दीपके यांनी ‘आप’च्या माध्यमातून गत विधानसभा निवडणुकीत गोव्यात काम केलेले असल्याने निवडणुका लढवण्याची सुरुवात ‘सीजेपी’ गोव्यातून करू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ग्राहक पाणी बिलाच्या शोधात...
राज्यात पाण्याचे बिल वेळेवर येत नसल्याने आता ग्राहकांना पाणी कमी आणि बिलाची चिंता जास्त सतावू लागली आहे. जवळपास तीन महिने उलटले तरी बिलाचा पत्ता नाही, त्यामुळे सुरुवातीला लोकांना वाटले, कदाचित पाणी खात्याने काही सवलत दिली असावी! पण आता सवलतीपेक्षा बिल एकदम हजारोंमध्ये येणार, या भीतीनेच अनेकांनी मनाची तयारी सुरू केली आहे. बिल वेळेवर आले तर रक्कम भरताना त्रास कमी होईल, पण तीन-चार महिन्यांचे बिल एकाच वेळी हातात पडले, तर पाण्यापेक्षा घाम जास्त फुटणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे खात्याने निदान महिन्याला नाही तर दोन महिन्यांतून तरी बिल पाठवावे, म्हणजे ग्राहकांना बिलाचा धक्का एकदम बसणार नाही आणि पाणीपुरवठ्याबरोबर आर्थिक पुरवठ्याचे नियोजनही करता येईल!
अपूर्व देवदर्शन
गोव्यातील लोकांचा हॅपिनेस इंडेक्स वाढण्यासाठी यापूर्वी गोवा सरकारने ‘मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा’ ही योजना सुरू केली होती. त्याचीच पुनरावृत्ती फोंड्याचे नगरसेवक अपूर्व दळवी यांनी केली आहे की नाही हे माहीत नाही, पण दिवाळीच्या सुट्टीचा मुहूर्त साधून त्यांनी १५ बसगाड्या भरून फोंड्यातील लोकांना विविध ठिकाणी यात्रेला पाठविले आहे. यात पंढरपूर, जोतिबा, महालक्ष्मी कोल्हापूर, नरसोबावाडी, अक्कलकोट, बाळूमामा आदी स्थळांचा समावेश आहे. या भाविकांच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्चही दळवी यांनीच उचलला आहे. यामुळे भाविकांचा हॅपिनेस इंडेक्स किती वाढणार ते माहीत नाही, पण अपूर्वचा पॉप्युलॅरिटी ग्राफ नक्कीच वाढला असेल!
गुन्हेगारी वाढल्याचा भास
राज्यात गुन्हेगारी वाढली की सोशल मीडियामुळे ती जास्त दिसू लागली, यावर आता वेगवेगळे तर्क ऐकायला मिळत आहेत. काहींचे म्हणणे आहे की पूर्वीही गुन्हे घडत होते, पण तेवढे सोशल मीडिया नव्हते म्हणून लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. आता एखादी घटना घडली की काही मिनिटांत व्हिडिओ, फोटो आणि बातमी सगळीकडे पोहोचते. त्यामुळे लोकांना गुन्हेगारी वाढल्याचा भास होतो म्हणे! मग प्रश्न असा आहे की गुन्हे कमी झाले की फक्त लपून राहण्याची सोय कमी झाली? कारण सोशल मीडिया नसताना गुन्हे घडत नव्हते असे नाही आणि सोशल मीडिया वाढला म्हणून गुन्हे आपोआप वाढले असेही नाही. आता मात्र गुन्ह्यांची संख्या मोजण्यापेक्षा सोशल मीडियावर किती व्हिडिओ व्हायरल झाले, यावरच कायदा आणि सुव्यवस्थेचा अंदाज घेतला जातो की काय, अशी चर्चा सुरू आहे!
सुरक्षा नेमकी कुणासाठी?
विमानतळ म्हटले की कडेकोट सुरक्षा, जागोजागी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांचा पहारा आणि तपासण्यांचे सोपस्कार! पण दाबोळी विमानतळावरच २९ वर्षीय मुंबईकर दीक्षित हरण यांचे रात्री दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप आहे. भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विमानतळावर प्रवेश करताना प्रवाशांची कसून तपासणी होते; मग अपहरणकर्ते मात्र सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन मोकळे कसे फिरतात? सुरक्षा व्यवस्था कागदावरच कडेकोट आहे की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही!
कुंकळ्ळी मतदारसंघात आपचा उमेदवार कोण?
निवडणुका जवळ आल्या म्हणजे अनेक नेते उगवायला लागतात. अनेकांची आमदार होण्याची सुप्त मनोकामना जागी होते. कुंकळ्ळी मतदारसंघातून आपण आम आदमी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असे एक माजी नगरसेवक सगळ्यांना सांगत सुटला आहे. आपने आपल्याला कुंकळ्ळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची ऑफर दिली असून उमेदवारीबरोबर आर्थिक पॅकेज काय असेल याची अंतिम बोलणी बाकी आहेत. आपण आपल्या दोन्ही मुलांना विचारून लवकरच प्रचारास सुरवात करणार असल्याची पोस्ट या माजी नगरसेवकाने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. आम आदमी पक्षाने मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. अशा उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी देऊन आप काय सिद्ध करणार? असा प्रश्न आम मतदार विचारायला लागले आहेत.
बेताळभाटी पंचायतीत सावळागोंधळ
बेताळभाटी पंचायतीत एकही पंचायत सचिव जास्त काळ टिकत नाही. गेल्या चार वर्षांत या पंचायतीत दहा सचिव आले व गेले. एरवी किनारपट्टी भागातील पंचायतीत वर्णी लागावी यासाठी पंचायत सचिवांमध्ये अहमहमिका सुरू असते. मात्र, बेतालभाटीत वेगळेच चित्र दिसत आहे. आतील माहितीनुसार येथील राजकारण्याचा दबाव हे त्याचे कारण होय. खरे खोटे तो देवच जाणे. मात्र, कॉमन मॅनची कामे मात्र खोळंबून राहतात हे खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.