तीच वीट, तेच सरकार!
विश्वजीत राणे यांनी २०२७ नंतर गोव्यात प्रमोद सावंत यांचेच सरकार स्थापन होणार असल्याची घोषणा केल्याने मुख्यमंत्री गोटात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारण पक्षात मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा वाढत चालली होती. या स्पर्धेत नुकतीच आणखी एका ज्येष्ठ मंत्र्याची भर पडली होती. परंतु त्याच काळात विरोधी पक्षाच्या ऐक्याचे तीनतेरा वाजले. विजय सरदेसाईंची तर दमछाक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सत्तेवर येणार हे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे. प्रमोद सावंत यांनी जर पक्ष पुन्हा सत्तेवर आणला तर त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे, हे स्पष्ट झाल्याने २०२७ नंतर पुन्हा सावंत सरकार स्थापन होणार असल्याची वक्तव्ये ज्येष्ठ मंत्री ओळीने करत राहाणार आहेत. विश्वजीत राणे हे तर पुन्हा सरकार जिंकून आणण्याच्या निर्धाराने कामाला लागले आहेत. ते सक्रिय झाल्याची कल्पना मुख्यमंत्र्यांनाही आहे.
अर्थाचा अनर्थ
‘मी दिल्लीला जायला तयार आहे’ असे एक विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. त्याचा वेगवेगळा अर्थ लावण्यात आला. एका प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्राने ते छापले पहिल्या पानावर. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्याच महत्त्वाच्या बातम्या सदर प्रतिनिधीने प्रसिद्ध केल्यामुळे लोकांनी बातमीवर विश्वासही ठेवला. शिवाय निवडणुकीचा हंगाम. भाजपमधील असंतुष्ट नेत्यांना चुचकारण्यासाठी पक्षश्रेष्ठींनीच ही चाल खेळल्याचे अनुमान निरीक्षकांनी काढले. परंतु बातमीत काही तथ्य नव्हते. तो केवळ सनसनाटीपणा होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मन:स्ताप मात्र झाला. त्याला कोण काय करणार? कारण निवडणुकीचा हंगाम असल्याने आता प्रसारमाध्यमे सतत वेगवेगळे अर्थ काढत राहातील. राजकीय बातम्या नेत्यांना द्याव्याच लागतील. मुलाखतीही थांबणार नाहीत. नेत्यांची दमछाक होणार आहे!
ढवळीकरांना उपरती?
निवडणूक निकट येताच सुदिन ढवळीकर आपला व आपल्या पक्षाचा खुंटा हलवून बळकट करण्याच्या प्रयत्नात असतात. सध्या त्यांनी फोंडा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. तेथे राजकीय कामही सुरू केले आहे. सुदिन स्वतः तेथे उभे राहिले तर ते जिंकूनही येऊ शकतात, असे राजकीय निरीक्षकही बोलून दाखवतात. याचा अर्थ फोंडा तालुक्यात मगोप व ढवळीकर यांचे अस्तित्व आहे व ही करामत करून दाखवण्याची या नेत्यांना शेवटची संधी आहे. परंतु भाजप जादा मतदारसंघ मगोपला देणार काय?, शिवाय फोंड्यासारखा खात्रीचा मतदारसंघ त्यांना सोडणार का? या प्रश्नांची उत्तरे विरोधी ऐक्यात दडली आहेत. सध्या तरी विरोधी ऐक्याचे भिजत घोंगडे पडले आहे व ही युती फिस्कटल्यातच जमा आहे. त्यामुळे भाजपच्या यशाची शक्यता वाढत गेली असून नीतीधैर्य आणखी वाढले तर नवल नाही. या पार्श्वभूमीवर मगोप नेत्यांची राजकीय नकारात्मक शक्ती घटत जाणार आहे. ती घटत गेली की ढवळीकर ‘पदरी पडले पवित्र झाले’ या पंक्तीला येऊन पोहोचतील असे भाजप निष्ठावंतांचे म्हणणे आहे. परंतु ढवळीकरांनी विरोधी ऐक्याला झुकते माप दिले तर मात्र भाजपसमोर अडचणी वाढणार आहेत. पाहुया, कोण एकमेकांना वरचढ ठरतो ते!
अशीही चर्चा फुटीची!
गोव्यात मिकी पाशेको व राधाराव ग्रासियस मिळून युगोडेपा पुन्हा स्थापन करत असल्याच्या बातमीची दखल सत्ताधारी भाजप फारशा गांभीर्याने घ्यायला तयार नाही. भाजपचा एक ख्रिस्ती मंत्री या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा ऐकू येतेय. यासंदर्भात भाजप गोटाचा कानोसा घेतला असता, त्यांनी ती शक्यता साफ फेटाळली. त्यांच्या मते, हा मंत्री इकडे-तिकडे जात असल्याच्या वार्ता आम्ही गेले सहा महिने ऐकत आहोत. या मतदारसंघातच नव्हे तर शेजारील मतदारसंघात आमचे पर्यायही तयार आहेत. शिवाय उत्तर गोव्यात एक मायकल लोबो यांचा मतदारसंघ सोडला - जेथे ५० टक्के ख्रिस्ती आहेत, तर इतर ठिकाणी हिंदू बहुसंख्य मतदार आहेत. ती आयती मते भाजपमुळे आमच्या उमेदवारांना मिळतात. इतर पक्षाच्या तिकिटावर तो निश्चित पराभूत होईल. भाजप असे खुशीचे मांडे खात असली तरी त्यांचा एकसुद्धा प्रभावी मंत्री - त्यात ख्रिस्ती - फुटला तर निवडणुकीपूर्वी खळबळ माजेल, हे खरे नाही का?
सोपटे-माविन द्वंद्व
पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी मांद्रेतून जीत आरोलकर हेच आमदार व्हावेत, असे मत व्यक्त करताच माजी आमदार दयानंद सोपटे यांचा पारा चढला. त्यांनी माविन यांना शेलक्या शब्दांत सुनावत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपली कैफियत पोहोचविली. एवढेच नव्हे, तर कार्यकर्ते आक्रमक झाले तर त्यांना आवरणे कठीण जाईल, असा इशाराही दिला. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनाच आपण नेते मानतो, असे सांगत सोपटे यांनी माविन यांना जणू राजकीय अधिकारपत्रच दाखवले! त्यात भर म्हणजे, ‘माविन कोण?’ हा सवालही त्यांनी केला. आता मांद्रेत आमदार कोण व्हावा, यापेक्षा भाजपमध्ये कोणाचा शब्द चालतो, याचीच चर्चा रंगू लागली आहे. निवडणूक अजून दूर असली, तरी नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई मात्र आताच सुरू झाली आहे!
फोंड्यातील पाणीबाणी
फोंड्यातील ‘सपना पार्क’ या भागातील लोकांना मागचे सहा महिने पाण्यासाठी त्रास सोसावे लागत आहेत. पाण्याला प्रेशर नसल्याने ही समस्या निर्माण झाली असून तहान भागवण्यासाठी टँकर बोलवावा लागतो. काल फोंड्यात ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमात लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई आले असता अपूर्व दळवी यांनी स्थानिक नगरसेवकांबरोबर त्यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या कानावर घातली. मंत्र्यांनीही फळदेसाई यांनीही या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या भागातील लोकांनाही दिलासा मिळाला. अपूर्व दळवी नवरात्री उत्सवात फक्त गरब्याचाच ठेका धरतात असे नव्हे, तर लोकांच्या समस्यांचाही तड लावतात हेच त्यातून दिसून आले.
निसर्गाचे ऋण फेडणाऱ्या दाम्पत्याचा संघर्षमय सहप्रवास
क्लॉड आल्वारीस आणि नॉर्मा आल्वारीस या दाम्पत्याच्या सहजीवनाला ४९ वर्षे पूर्ण झाली. क्लॉड यांची पर्यावरणविषयक अभ्यासक, लेखक आणि कार्यकर्ता म्हणून ओळख, तर नॉर्मा यांची निर्भीड वकील म्हणून ख्याती! या दोघांनी निसर्गाच्या रक्षणासाठी अनेक वर्षे संघर्ष केला. त्यांच्या न्यायालयीन लढ्यांमुळे खाणकामासारख्या विषयांत महत्त्वाचे निर्णय झाले आणि गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणाला बळ मिळाले. या लढ्यांमुळे सरकारी तिजोरीतही हजारो कोटी रुपयांची भर पडली. पण एवढे योगदान देणाऱ्या या दाम्पत्याची सरकार दरबारी म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्यांना गौरवाची फुले मिळोत न मिळोत, पण त्यांच्या संघर्षाचे मोल गोव्याच्या मातीला नक्कीच ठाऊक आहे. प्रश्न एवढाच, गोव्याचे हित जपणाऱ्यांची कदर सरकारला कधी होणार? आल्वारीस दाम्पत्याला त्याची फारशी पर्वाही नाही म्हणा!
पिंटी तुम आगे बढो!
कुडचडे मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शुकवारी कुडचडे शहरात झालेल्या काँग्रेसच्या ‘गोवा राखण’ यात्रेत माजी नगराध्यक्ष पिंटी होडारकर यांचा उत्साह पाहता कदाचित ही उमेदवारी त्यांनाच मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. २०२२ च्या निवडणुकीतही काँग्रेस उमेदवार म्हणून पिंटी यांचेच नाव घेतले जात होते, पण शेवटच्या क्षणी अमित पाटकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. शुक्रवारी झालेल्या राखण यात्रेत अमित सहभागी झाले नव्हते. त्यामुळे काँग्रेस उमेदवारीच्या शर्यतीत पाटकर नसणार हे नक्की. त्यामुळे यंदा ही माळ पिंटीच्या गळ्यात पडणार ही शक्यता खरी होणार म्हणायची?
असाही धिंगाणा
राज्यात दिवाळीच्या आधीच फटाके फुटायला लागले आहेत. नरकासुर प्रथेच्या नावाखाली चालणाऱ्या धांगडधिंग्यावर मंत्री सुदिन ढवळीकर चांगलेच भडकले आहेत. तसे पाहिले तर ते पूर्वीपासूनच या प्रथेविरोधात बोलत आले आहेत. ते म्हणतात, १९८४ पूर्वी अशी कोणतीही कुप्रथा नव्हती, मग हा गोंधळ नेमका सुरू कोणी केला? त्यात निवडणुका जवळ आल्या की गल्लोगल्ली नवे नरकासुर तयार होतात. या त्यांच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. रात्रभर चालणारी नाचगाणी आणि राक्षसाचा हा अवाजवी उदोउदो बघून मूळ नरकासुरही चक्रावून गेला असेल. तो म्हणत असेल, मला जाळायला पुतळा बनवलाय की माझी जयंती साजरी करायला? त्यात भर म्हणजे, मंत्र्यांनी ‘एक रुपयाचीही वर्गणी देणार नाही’ असा पवित्रा घेतलाय. आता सण म्हटला की थोडा आनंद आणि उत्साह असणारच; पण परंपरा जपताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजेच, इतकाच काय तो या सगळ्या चर्चेचा सरळ आणि साधा अर्थ!
माविनचे मौन म्हणजे वादळापूर्वीची शांतता?
दयानंद सोपटे यांनी ‘माविन कोण?’ असा सवाल उपस्थित केल्यानंतर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी थेट प्रतिहल्ला करण्याचे टाळले. ‘सोपटे मला ओळखत नाहीत, त्यातच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण यावर भाष्य करू इच्छित नाही’ असे सांगत त्यांनी मुत्सद्दीपणाचा मार्ग स्वीकारला. मात्र राजकारणात मौन म्हणजे माघार असे समीकरण नसते! भाजपच्या गाभा समितीचे सदस्य असलेले माविन हा टोला इतक्या सहजासहजी विसरतील का? पण राजकीय वर्तुळात मात्र प्रश्न कायम आहे, हा वाद खरोखर संपला की योग्य वेळेची वाट पाहतोय?
सुदिन सर्वत्र, मग पंगा कशाला?
सध्याच्या विधानसभेत सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याबाबत बोलताना आमदार विजय सरदेसाई नेहमीच ‘भान’ ठेवतात. ढवळीकर यांनी नरकासुर प्रथेसंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून शनिवारी पत्रकारांनी विजयना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी सावध भूमिका घेत उत्तरे दिली. ते म्हणाले, याआधीही आपण ढवळीकर असलेल्या मंत्रिमंडळात काम केले आहे. राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार येवो, सत्तेत कसे सहभागी व्हायचे हे सुदिनना माहीत आहे. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात वाईट असे काही बोलणार नाही. त्यांची ही भूमिका पाहून, भविष्यात आपण काँग्रेस किंवा भाजपसोबत गेलो तर तेथेही सुदिन असणार हे माहीत असल्यामुळेच ते त्यांच्याशी पंगा घेण्यास तयार नसल्याची कुजबूज दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.
माविन यांना जीत का हवेत?
जीत आरोलकर गत विधानसभा निवडणुकीत मगोच्या उमेदवारीवर मांद्रेतून निवडून आले. पण, त्यानंतर त्यांचे मन त्या पक्षात कमी आणि भाजपमध्ये जास्त रमू लागले. साहजिकच येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जीत भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजप त्यांना मांद्रेतून उमेदवारी देईल, अशी कुजबूज सुरू झाली. मात्र आपण निवडणूक मगोच्याच उमेदवारीवर लढणार, अशी भूमिका जीत आजही मांडत आहेत. तरीही मंत्री माविन गुदिन्हो मांद्रेतील कार्यक्रमांत जाऊन जीतचे कौतुक करतात, ते विधानसभा निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढतील आणि पुन्हा आमदार होतील, अशी वक्तव्ये करतात. दोन दिवसांपूर्वी सलग दुसऱ्यांना माविन यांनी असे वक्तव्य केल्याने मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे त्यांच्यावर भडकले. तसेच पक्षाने माविनवर कारवाई करावी, अशी मागणी केली. या सगळ्यात माविनना जीत नेमके का हवे आहेत, या प्रश्नाचे उत्तर मांद्रेवासीय शोधत आहेत.
राखण गोव्याची की मतांची?
गोव्यात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. मडगावात मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. आरोग्यमंत्र्यांच्या मते, केवळ रस्त्यावर फिरून गोव्याची राखण होत नसते; त्यासाठी भविष्यात काय करणार, हेही सांगावे लागते. विश्वजीत राणे सध्या मुख्यमंत्र्यांची सतत तारीफ करतात. विरोधकांवर तर ते तुटून पडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर गोव्याच्या राखणदारीची जबाबदारी भाजप समर्थपणे पार पाडत असल्याचे ठणकावले. विरोधकांनी आधी आपला पक्ष सावरावा, असा सल्ला राणे यांनी दिला. आता प्रश्न एवढाच की, गोव्याच्या राखणदारीची ही चढाओढ जनतेच्या प्रश्नांसाठी आहे की निवडणुकीत मतांची राखण करण्यासाठी?
पुरस्कारांची द्राक्षं आंबट आणि कडू
डिसेंबर जवळ येतोय. या महिन्यात साहित्य अकादमीचे पुरस्कार घोषित होतात. यंदा प्रक्रिया जरा थंडावलेली दिसते. कारण शॉर्टलिस्ट होऊन पुढे पोहोचली असती तर दाहीदिशांना कोल्हेकुई सुरू झाली असती. गोपनीयता राखणं कठीणच. गंमत म्हणजे गेल्या वर्षीचे अनुवाद, बाल, युवा पुरस्कार अजून घोषित झालेले नाहीत. संस्कृती मंत्रालय व अकादमी यांच्यात गेल्या वर्षी शीतयुद्ध सुरू झालं होतं. अंतर्गत कारणं कळणं कठीण. डिसेंबरपर्यंत सगळं काम पूर्ण होऊन पुरस्कार जाहीर होतील की नाही याबाबत दिल्लीतील लेखक साशंक आहेत. काय काय गोठणार, हे समजण्यास मार्ग नाही. ज्यांना ते मिळाले नाहीत व जे त्यासाठी तहानलेले होते, ते लेखक मात्र ‘काही अर्थ नाही त्या राजकारणदूषित पुरस्कारांना’ असे म्हणत नाक मुरडू लागले आहेत.
एल्विस-ठाकरे भेट
‘अजूनही आपण काँग्रेस पक्षात आहे’ असे एल्विस गोम्स सांगत असले तरी त्यांनी आपली वेगळी ‘स्वाभिमानी चूल’ मांडली असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. सध्या गोव्यात काँग्रेसची राखण यात्रा सुरू असून त्यासाठी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे मडगावात ठाण मांडून आहेत. ते ‘नानुटेल’ या हॉटेलमध्ये उतरले असून काल त्याच भागात पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले एल्विस गोम्स यांची ठाकरे यांच्याशी गाठ पडली. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. पण त्यांच्यात नेमकी काय बातचीत झाली, हे मात्र कळू शकले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.