Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: चोरी की विसर्जन?

Khari Kujbuj Political Satire: चोरटे चोरी करतात आणि तेही कधी काय चोरतील, याचा नेम नसतो

गोमंतक ऑनलाईन टीम

चोरी की विसर्जन?

चोरटे चोरी करतात आणि तेही कधी काय चोरतील, याचा नेम नसतो. मंदिरात चोरी होणेही काही नवीन नाही. पण गणेशोत्सवाच्या काळात घडलेली एक वेगळीच घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गणेशाची मूर्ती चोरीला गेली म्हणायचे, की काही भाविकांनी श्रद्धेने ती मूर्ती पाहिली आणि थेट विसर्जन करून टाकले, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे! म्हापसा येथे मूर्ती विसर्जन करणाऱ्यांची भावना श्रद्धेची असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. पण ज्यांची मूर्ती होती, त्यांना ती विसर्जित करण्याची संधीच मिळाली नाही, त्यामुळे संशयाचे ढग मात्र कायम आहेत. आता ज्यांनी मूर्ती विसर्जित केली त्या भाविकांनी समोर येऊन ‘आम्ही श्रद्धेने विसर्जन केले’ असे सांगितले, तर ठीक. नाही तर मूर्ती चोरीला गेली, असे म्हणणाऱ्यांनाही दोष देता येणार नाही

अपूर्व दळवींचे गणेश दर्शन

राजकारणी म्हटले तर लोकांच्या गाठीभेटी घेणे आलेच. त्यात चतुर्थी, दिवाळी यांसारखे सण असल्यास या गाठभेट कार्यक्रमाला अगदी भरते येते. सध्या गोव्यातही तेच सुरू आहे. फोंड्यात अपूर्व दळवी यांनी तर यावेळी अख्खा फोंडा पालथा घातला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मागच्या दोन दिवसांत दळवी यांनी अडीचशे-तीनशे घरे पालथी घातली असतील. यापूर्वी अशाच गाठीभेटी डॉ. भाटीकर घ्यायचे. भाटीकर यांची आठवण काढताना अन्य कुणी नसले तरी अपूर्वही सगळीकडे पोहोचले, अशाच लोकांच्या प्रतिक्रिया होत्या.

राजेश वेरेकर ‘निश्चिंत’?

सध्या राज्यात आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांच्या ‘गोवा फर्स्ट’ युतीची चर्चा सुरू असून यामुळे कोणाला कसा फटका बसेल, यावरही भाष्य केले जात आहे. पण काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख राजेश वेरेकर हे मात्र निश्चिंत दिसत आहेत. मागील वेळी फोंड्यात माझा पराभव झाला तो प्रामुख्याने ‘आरजी’ने प्राप्त केलेल्या १,७४० मतांमुळे, पण यावेळी आरजी कॉंग्रेससोबत असल्यामुळे ‘मला भिवपाची गरज ना’ असे ते ज्याला त्याला सांगताना दिसत आहेत. ‘गोवा फर्स्ट’ युतीमध्ये फोंड्याची जागा ‘आम आदमी’ला जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचा रोख या पक्षावर आहे हे उघडच आहे. आता कोणाला ‘भिवपाची’ गरज आहे आणि कोणाला नाही, हे लवकरच कळेल म्हणा. नाही का?

पालिका गेटवरच रंगले राजकारण!

गणेशोत्सवाच्या निमित्ताने म्हापसा शहरात सध्या शुभेच्छांच्या फलकांपेक्षा राजकीय ‘बॅनर वॉर’चीच जास्त चर्चा रंगली आहे. सणाचे निमित्त साधून इच्छुकांनी शहरभर फलकबाजी सुरू केली खरी; पण पालिकेने ‘अधिकृत परवानगी नाही’ असा ठपका ठेवत कारवाईचा बडगा उगारला! गंमत म्हणजे, ज्यांनी फी भरून परवानगी घेतली होती, त्यांचेही बॅनर हटविल्याने पालिकेच्या या कारभारावर तोंडसुख घेतले जात आहे. यात सर्वांत जास्त डोळ्यांत भरतोय तो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी म्हापशातून शड्डू ठोकू पाहणाऱ्या एका नव्या चेहऱ्याचा फलक! सत्ताधारी गोटातून या चेहऱ्याला ताकद दिली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा असतानाच थेट म्हापसा पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच या भावी नेत्याचा बॅनर झळकला. यावर एका सजग सामाजिक कार्यकर्त्याने बोट ठेवत सोशल मीडियावर पालिकेच्या दुटप्पी भूमिकेची पिसे काढली! मग काय, प्रकरण अंगलट येताच तो फलक गेट जवळून हटवावा लागला. निवडणुकांना अजून अवकाश असला, तरी म्हापशाच्या गल्ली-बोळांत या ‘बॅनर पॉलिटिक्स’चीच चर्चा सुरू आहे!

मासे असतील तर वीर...

दीड दिवसाचा गणपती विसर्जित केल्यावर काल गोंयकारांनी माशांवर यथेच्छ ताव मारला. चवथीच्या विशेष शाकाहारी जेवणाने पोटाचा सिलिंडर होतो. अपचन ॲसिडीटी होते. मुगां गांठी, खतखतें, कांदा-लसूण विरहीत जैन शैलीच्या जेवणामुळे जठर मत्स्यगंधासाठी आक्रोश करू लागते. त्यावर मात करण्यासाठी ताज्या फडफडीत बांगड्यांचं हुमण हे औषध ठरतं. भाज्यांचे गडगंज उत्सव गावोगावी होत असले तरी ताटात भाज्या घेऊन खाण्याची इच्छा तशी कमीच. हल्ली कैक घरांत पाच दिवसांचं गणेश पूजन होतं. बाकीबाबांचं एक कवन आहे. ‘नुस्तें आसल्यार गोंयकार वीर, नासल्यार व्हीर’. झाडूचा ‘व्हीर’ असतो, तसा माशांविना गोवेकर काटा होऊ शकतो, इतकं हे मत्स्यप्रेम. एकेकाळी विसर्जन झाल्यावर जवळच्याच मानशेवरून सुंगटां, गांथनी घेऊन परतणारे मत्स्यभक्त कमी नव्हते, असे कोकणी लेखकांनी लिहून ठेवले आहे.

मतदारांना ‘मोठी’ भेट

राज्याची विधानसभा निवडणूक आता सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थीत मतदारांशी जेवढा संपर्क होईल तेवढा बरा, असा विचार करून काही राजकारण्यांनी मतदारांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. याखेपेला काही राजकारणी नेत्यांनी मतदारांना ‘पोटल्या’ही भरभरून दिल्या. मात्र, काही बुजुर्ग, अनुभवी राजकारण्यांनी चतुर्थीला कोणतीच भेट मतदारांना दिलेली नाही. कदाचित निवडणुकीवेळी मतदारांना ‘मोठी’ भेट देण्याचा विचार हे अनुभवी राजकारणी करत असतील की काय, अशा प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त होत आहेत.

बाबूंची सीएमशी खलबते

चतुर्थीच्‍या निमित्ताने कित्‍येक नेत्‍यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांच्‍या घरी भेट दिली. एकेकाळी मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांचे सहकारी असलेले उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांचाही त्‍यात समावेश होता. यावेळी बाबूंनी मुख्‍यमंत्र्यांशी चर्चाही केली. मुख्‍यमंत्र्यांशी खलबते करतानाचे फोटो बाबू कवळेकर यांनी सोशल मीडियावर टाकले आहेत. असे म्‍हणतात, की बाबू जरी आमदार नसले तरी मुख्‍यमंत्र्यांशी त्‍यांचे अगदी निकटचे संबंध आहेत. सीएम बाबूंची कुठलीही कामे अडवून ठेवत नाहीत. बाबू जरी सत्तेबाहेर असले तरी अजूनही मुख्‍यमंत्र्यांना ते बरेच जवळ आहेत, एवढे नक्‍की.

भोलानाथ, पाऊस कसा साठवू?

यंदा पावसाची तूट आहे खरी. पण जे पाणी पडलं ते साठवण्यासाठी किती प्रयत्न होतात हे महत्त्वाचे. सध्या ही बरी बातमी. भूजल पातळीतील घट रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने २०० पर्जन्यजल संचयन प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. विभागातील प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या कार्यक्षेत्रात दोन प्रकल्प स्वीकारून वर्षाच्या आत त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ही योजना उच्च क्षमतेच्या पाणलोट क्षेत्रांवर, विशेषतः औद्योगिक वसाहती आणि शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित करेल. कारखाने आणि महाविद्यालयांसोबत भागीदारी करून, पर्जन्यजल संकलन आणि भूजल पुनर्भरणासाठी मोठ्या छतांच्या जागांचा वापर करण्याचे लक्ष्य आहे. पर्जन्यजल योजना अनेक वर्षांपूर्वी सुरू केली होती. जनतेकडून प्रतिसाद मिळाला नाही. यंदा आशादायी वातावरण आहे.

`रॉयचा मुत्सद्दी पवित्रा

रवी पुत्र रॉय नाईक यांनी सध्या गाठीभेटीचा धडाका सुरू केला आहे. फोंडा नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नेते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. फोंड्याची उमेदवारी त्यांचे ज्येष्ठ बंधू रितेश नाईक यांना नक्की होण्याच्या मार्गावर असल्याने आता इतर मतदारसंघांतून उमेदवारी मिळवण्यासाठी रॉयने बरीच खटपट चालवली आहे. ऐन चतुर्थीच्या काळात रॉय नाईक यांनी आई आणि फोंडा नगराध्यक्षांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणेशाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांचेही रॉयशी मित्रत्वाचे नाते असल्याने या भेटीबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हा विकसित गोवा?

पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास शिवोली येथे फटाक्यांवरून सुरू झालेला वाद हिंसक होतो, घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या पाचजणांना जाब विचारणाऱ्या भाडेकरूंवर हल्ला केला जातो. घराची खिडकीही जवळच्या वस्तूंच्या साहाय्याने फोडली जाते. काही मिनिटांतच तेच टोळके पुन्हा आवारात घुसून हल्ला करते, असे आरोप समोर आले आहेत. शांतताप्रिय आणि सुरक्षिततेसाठी खात्रीशीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात पहाटेच्या वेळी घराच्या दारातच अशा प्रकारे दहशत निर्माण होत असेल तर ‘हा विकसित, भयमुक्त गोवा आहे का?’ असा संतप्त सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

कांद्याच्या दराने डोळ्यांत पाणी!

व्यापारी नव्या पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असल्याने कांद्याचे दर गेल्या आठवड्यापेक्षा १० रुपयांनी वाढून या आठवड्यात सुमारे ७० रुपये प्रतिकिलो झाले. नवीन पिकाची मर्यादित उपलब्धता आणि तुलनेने कमी पाऊस यांमुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘नवीन माल येत आहे, पण पुरवठा फारसा होत नाहीये,’ असे विक्रेत्यांनी सांगितले. येणारा कांदा चांगल्या प्रतीचा असण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. ताजा पुरवठा बाजारात किती लवकर पोहोचतो यावर अवलंबून, सध्याची भावस्थिती आणखी २० ते २५ दिवस टिकू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. नवीन कांद्यांची आवक सुरू झाली आहे, परंतु भाव कमी करण्यासाठी साठा अपुरा आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे कांदा डोळ्यांत पाणी आणणार, असे दिसते.

रोखीचा त्रास

गणेशोत्सवाच्या काळात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याऐवजी साखळीतील गॅस एजन्सीने ऐन सणात ‘यूपीआय’चे ‘श्रीगणेशा’च बंद करून ग्राहकांना रोखीच्या रांगेत उभे केले आहे. हातात मोबाईल, खात्यात पैसे आणि समोर गॅस सिलिंडर असतानाही ‘रोख द्या, मगच गॅस घ्या’ असा आग्रह धरला जात असल्याने ग्राहकांनाही प्रश्न पडला आहे; देश डिजिटल व्यवहारांच्या दिशेने धावत असताना या एजन्सीची गाडी अजूनही नोटांच्या रस्त्यावरच का अडकली आहे? गणेश चतुर्थीच्या काळात ‘कॅशलेस’ नव्हे, तर ‘कॅशच हवी’ असा नवा प्रसाद ग्राहकांच्या वाट्याला आला आहे!

कायदा सरकारचा, प्रश्नही सरकारलाच!

सरकार कायदा करते तो लोकांच्या भल्यासाठीच, असे आपण नेहमी ऐकतो. पण बुधवारी एका याचिकेमुळे या कायद्याबाबत वेगळीच चर्चा सुरू झाली. शॅक उभारणीसंदर्भात सरकारने केलेल्या कायद्यामुळे इतर कायद्यांना बगल मिळतेय का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, या कायद्याच्या आधारे इतर कायद्यांचे उल्लंघनही होत असल्याने चर्चेला आणखी रंग चढला आहे. आता हा कायदा खरोखरच इतर कायद्यांवर मात करणारा आहे, की लोकांच्या हितासाठी केलेली वेगळी तरतूद, हे न्यायालयाच्या आदेशानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र चर्चा अशीच रंगणार! कायदा सरकारने केला, त्याची अंमलबजावणीही सरकारचीच; पण आता त्याच कायद्यामुळे सरकारला न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे!

गणेशोत्सवात राजकीय भाष्य

साळगावात गणेशोत्सवाच्या उत्साहाला राजकीय उपरोधाची फोडणी देत ‘कॉकरोच जनता पार्टी’चा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे. नावापासूनच राजकीय टोमणा मारणाऱ्या या देखाव्यातून सध्याच्या राजकारणावर मिश्किल भाष्य करण्यात आले आहे. गणपतीच्या आशीर्वादाने मतदारांना अनेक पक्ष, नेते आणि आश्वासने दरवर्षी नव्याने दिसतात. मात्र, या देखाव्याने राजकीय ‘झुरळांची’ही संख्या कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे साळगावातील हा देखावा केवळ मनोरंजनापुरता न राहता सर्वांनाच ‘आरसा’ दाखवणारा ठरला आहे.

निवडणूक कुणाला नकोय?

सरकारचे आदेश आले, की सरकारी यंत्रणा कामाला लागते यात नवल ते काय? पण आता नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यात नवी चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी ओबीसी आयोगाने न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली. ही चर्चा होताच प्रश्न उपस्थित झाला, की निवडणूक वेळेत नकोय तरी कुणाला? सत्ताधाऱ्यांना निवडणूक लांबवायची आहे का, अशी चर्चाही काहीजणांमध्ये होत आहे. विरोधकांनाही निवडणूक हवी असेल तर त्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठोस भूमिका घ्यायला नको का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे समाजकार्यकर्त्यांत नवे राजकीय गणित मांडले जात आहे. सत्ताधारी म्हणताहेत ‘थांबा’, विरोधक म्हणताहेत ‘पाहू’... आणि निवडणूक मात्र म्हणते, ‘माझे काय?’

आता झाडांची आठवण येईल का?

मंगळवारी रात्री तसेच बुधवारी संध्याकाळी बरसलेल्या सरींनी कडाक्याच्या उन्हात होरपळलेल्या गोमंतकीयांना काहीसा गारवा दिला. पाऊस आला म्हणून लोकही काहीसे शांत झाले. पण या उन्हाच्या चटक्याने एक गोष्ट मात्र चांगलीच जाणवून दिली ती म्हणजे, पावसाळ्यातही ऊन एवढे तापते, तर झाडेच नसतील तर काय होईल? आता पर्यावरणप्रेमींची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. झाडे कापली तर त्याचे परिणाम काय होतात, याचे धडेही दिले जात आहेत. चर्चा सुरू आहे खरी; पण ती सरकारच्या कानापर्यंत पोहोचणार कधी आणि त्या चर्चेचे एखाद्या ठोस निर्णयात रूपांतर होणार कधी, हा खरा प्रश्न आहे. तोपर्यंत पाऊस येईल, जाईल आणि झाडे मात्र कापली जातील, असे दुष्टचक्र सुरू राहणार की काय, अशीही खंत व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळीला उतरती कळा, 'मोपा'ची भरारी! प्रवासी संख्येत 34 टक्क्यांची वाढ; जुन्या विमानतळावर मात्र 13 टक्क्यांची घट

Goa Theft Case: 'मी विसर्जनासाठी मदत करतो' म्हणत बाप्पा हातात घेतला अन् पोबारा; म्हापशात चांदीच्या दागिन्यांसह गणेशमूर्तीची चोरी

US Iran War: मध्यपूर्वेतील 7 महिन्यांचा थरार संपणार? ट्रम्प म्हणाले, 'अमेरिका-इराण युद्ध अंतिम टप्प्यात!' रक्तरंजित संघर्षानंतर अखेर टेबल टॉक्स सुरु?

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

SCROLL FOR NEXT