तोतया मंत्र्याची पुन्हा चर्चा!
अबकारी खात्यातील तोतया आयुक्ताची चर्चा सुरू होताच अनेकांना आठवण झाली ती दोन वर्षांपूर्वीच्या तोतया मंत्र्याची! आपण उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असल्याचे सांगत या महाशयांनी सरकारी इतमामात, पोलिसांच्या गराड्यात आणि सरकारी वाहनांतून राज्यभर मिरवणूक काढली होती. तेव्हा सगळा रुबाब पाहून अनेकांना भुरळ पडली होती म्हणे! आता तोतया मंत्री गेले आणि तोतया आयुक्त आले. सरकारी यंत्रणेच्या नाकाखाली असे प्रकार घडतातच कसे, हा खरा प्रश्न. कुठेतरी पाणी मुरतेय की यंत्रणेतील त्रुटींचाच फायदा घेतला जातोय? तोतयांचा हा सिलसिला थांबणार तरी कधी? आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, अशी चर्चा राज्यभर सुरू आहे.
शिवकुमारांच्या भाषणाचे राजकारण!
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी झुआरीनगर येथे गुरुवारी ‘गोवा रक्षण यात्रे’च्या निमित्ताने कन्नड भाषेतून केलेल्या भाषणावरून गोव्यात राजकारण तापले आहे. झुआरीनगर, सांकवाळ आणि दाबोळी परिसरात कन्नड भाषिकांची संख्या मोठी आहे. शिवकुमार यांनीही त्याच पद्धतीने भाषण केले; मात्र भाजपने त्यावर आक्षेप घेतल्याने आता भाषेवरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दुसरीकडे, शिवकुमार यांच्या भाषणाची पाठराखण करताना काँग्रेसचीही कसरत होताना दिसते. स्थानिकांना समजणाऱ्या भाषेत संवाद साधण्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पण गोव्यात भाषेचा विषय संवेदनशील असल्याने कन्नड भाषेतील भाषण सर्वांनाच रुचले असेल, असेही नाही. आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने कर्नाटकातील अनेक नेते गोव्यात येतील. तेव्हा त्यांच्या भाषणांची भाषा कोणती असेल, याकडे भाजपचेही लक्ष राहणार, हे निश्चित!
‘आप’ची क्रीडांगणे
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निवडणूकपूर्व आश्वासनांमध्ये गोव्यातील प्रत्येक गावात क्रीडांगण बांधण्याचा उल्लेख केला आहे. वास्तविक, गोव्यातील बहुतांश गावांत सरकारच्या मालकीची क्रीडांगणे आहेत. त्यांची देखभाल करताना गोवा क्रीडा प्राधिकरणाला नाकीनऊ येत आहेत. काही ठिकाणच्या मैदानांची दुरवस्था झालेली आहे. त्यात आणखी क्रीडांगणांची भर पडली, तर त्यांची देखभाल कशी करायची, याची चिंता प्राधिकरणाला आतापासूनच सतावू लागली आहे.
बार्देश भवन एक प्रेमकथा...
म्हापशातील जुन्या अर्बन बँकेच्या जागेवर सर्व सोयींनी युक्त असे ‘बार्देश भवन’ उभारण्याचा विचार सुरू आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांनी नुकतीच या जागेची पाहणी केली. तालुक्यातील लोकांची सरकारी कामांसाठी होणारी धावपळ थांबावी आणि सर्व कार्यालये एकाच छताखाली यावीत, हा यामागचा हेतू चांगला आहे. नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत जाण्याऐवजी एकाच इमारतीत आपली कामे मार्गी लावता येणार असतील, तर ही सोय निश्चितच स्वागतार्ह ठरेल. मात्र, यासोबतच म्हापशातील लोकांच्या मनात एक जुनी इच्छाही पुन्हा जागी झाली आहे. कला आणि संस्कृतीची आवड असलेल्या या शहरात गेली कित्येक वर्षे रवींद्र भवनाची मागणी प्रलंबित आहे. प्रशासकीय कामांसाठी बार्देश भवन जरूर व्हावे; पण त्यासोबतच सांस्कृतिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेले रवींद्र भवनही लवकरात लवकर आकारास यावे, अशी साधी अपेक्षा नागरिकांची आहे. आता पाहूया, नागरिकांच्या या अपेक्षांना न्याय मिळतो की नाही?
वेल डन पोलिस...
पर्वरी येथे श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य संशयित म्हणून नाव घेतले जाणाऱ्या गोपाळ नाईकपर्यंत पोचण्यासाठी संयमाने पोलिसांची बरीच परीक्षा घेतली. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा वापर केला तर आपण पकडले जाऊ याची पुरेपूर माहिती असलेल्या गोपाळ नाईक यांने पारंपरिक पद्धतीने संदेश वहन करत पोलिसांना १५ दिवस गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. तो दूरवर फिरत राहिला तरी पोलिसांनी आपले हात त्याच्यापर्यंत पोचवले नाहीत. तो आपल्या जाळ्यात येईपर्यंत पोलिस वाट पाहत राहिले. तो गोव्यात आला आणि कर्नाटकात पसार होण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याला पकडले आणि तंत्रज्ञानाची मदत नसतानाही पोलिस कामगिरी करू शकतात, हे त्यालाच दाखवून दिले.
दामूंचा सरदेसाईंना टोला!
दामू नाईक आणि विजय सरदेसाई यांच्यातील आरोप-प्रत्यारोप ही आता नित्याचीच बाब बनली आहे. शुक्रवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना विजयचे नाव न घेता दामूंनी पुन्हा चिमटा काढलाच. फातोर्ड्याच्या आमदारांना पराभवाची भीती वाटू लागल्यानेच ते मतदारांची नावे वगळल्याचा टाहो फोडत आहेत, असे दामू बाबांचे म्हणणे. वर फातोर्ड्यातील बीएलओ आणि यंत्रणाही विजयबाबांचीच, मुख्यमंत्रीसुद्धा त्यांचीच कामे करतात, असे दामू सांगतात. मग मतदारांची नावे वगळण्यात आपला दोष काय, असा त्यांचा सवाल! पण चर्चा अशी की, सरकार तर दामू बाबांच्याच पक्षाचे ना! मग मतदारयादीतील घडामोडींची जबाबदारी नेमकी कुणाची? विजयबाबांकडे बोट दाखवताना दामू बाबांनी हा प्रश्नही लक्षात घ्यायला हवा, असे काहीजण म्हणत आहेत. आता या टोलेबाजीला उत्तर कोण देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बंडलबाजांची ई-चलने
एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांना ई-चलने पाठवण्यास सुरुवात झाली आणि भामट्यांचे फावले. त्यांनी लोकांना बनावट ई-चलने पाठवण्यास सुरुवात केली आहे. मेसेज येतो आणि खाली इशारा असतो. ‘डाऊनलोड करणे सक्तीचे! मस्ट!’ लोकही घाबरून तातडीने ते डाऊनलोड करतात. अवघ्या दोन मिनिटांत हा बनेल लफंगा संबंधित व्यक्तीची सर्व माहिती चोरतो. कोळउंदीर जसा रात्रभरात धान्याचे पोते रिकामे करतो, तसा हा बँक खाते शून्यावर आणतो. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. खरी ई-चलने कशी येतात, त्यात कोणत्या गोष्टी असतात आणि कोणत्या नसतात, हे लोकांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे. मध्यंतरी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले होते. त्यावेळी केंद्र सरकारने फोनद्वारे लोकांना सावध करण्यास सुरुवात केली होती. फोन उचलल्यानंतर विशिष्ट क्रमांकावर तक्रार कळवा, फसवणुकीला बळी पडू नका, अशा सूचना ऐकायला मिळत होत्या. बनावट वाहतूक ई-चलनांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठीही अशाच प्रकारची जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे.
चर्चेला ऊत
लोकांना बोलायला, बडबडायला विषय पाहिजेच असे नसते. मिळाला तर उत्तमच! गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. अधिसूचना जारी झाल्यावर निवडणुकीची गाडी पाचव्या गिअरमध्ये पडेल. सोयरीक मोडावी तशी युती-आघाडी मोडते, या विषयावर आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. बाजारात, तिठ्यावर, चौकात उकिडवे बसून रगलो, कुष्टा, शांबा, ज्योकीं, रामुलो आपापसांत चर्चेत रंगून जातात. त्यात दोषारोप, फालतू आरोप आणि खास गावठी शिव्यांचा मसाला असतोच. खरं म्हणजे, या महानुभावांचे ‘बाइट्स’ चित्रित करून प्रसारित केले, तर मजा येईल. तळागाळातील सद्यःस्थितीचे चित्र, मतदारांची समज आणि संताप इतरांनाही कळून चुकेल. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. निवडणुका हा लोकशाहीचा प्राण, आत्मा! प्राप्त परिस्थितीत चर्चा करण्यासाठी, मनातील वाफ काढण्यासाठी आणि चघळायला लोकांना काही महिने एकच विषय मिळाला, तरी खूप झाले!
पाऊसकरांनाही ‘महालय’ संपण्याचे वेध
सावर्डे मतदारसंघात यंदा ‘एक से बढकर एक’ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी आमदारकीची लॉटरी नेमकी कुणाला लागणार, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे सर्वच जण बोलत आहेत. यामुळे सावर्डेचे माजी आमदार आणि माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनाही स्फूरण चढले आहे. त्यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. सध्या ‘महालय’ महिना सुरू असल्याने ते शांत आहेत, असे सांगितले जाते. रविवारनंतर तेही आपले पत्ते खुले करणार आहेत. १८ ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस असून, त्याच दिवशी ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.
आदरयुक्त भीती गेली कुठे?
ज्याची आयुक्तपदी नियुक्तीच झालेली नाही, तो थेट अबकारी कार्यालयात जाऊन आपणच आयुक्त असल्याचे सांगतो. खुर्चीवर बसतो आणि कारभारही सुरू करतो! बरं झालं, कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आलं आणि तक्रार झाली; नाहीतर या साहेबांचा कार्यकाळ आणखी किती दिवस चालला असता, हे सांगणं कठीणच! प्रश्न एवढाच की, सरकारी कार्यालयात अशी हिंमत येते कुठून? कायद्याची आदरयुक्त भीती असेल, तर कुणीही उठून कोणत्याही पदावर दावा करणार नाही. आता या प्रकाराला प्रशासकीय हलगर्जीपणा म्हणायचं की कायद्याचा धाक कमी झाल्याचं लक्षण मानायचं?
पाडेलींचे काय होणार?
पाडेली म्हणजे नारळ पाडणारे. नवी पिढी या व्यवसायात यावी, यासाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजनही सरकारने मध्यंतरी केले होते. युवतींनीही हा व्यवसाय स्वीकारल्याचे काय कौतुक झाले होते. आता पाडेलींचे काय होणार, हा प्रश्न पुढे आला आहे. नारळ काढायला रोबोट आले, तर गोव्यातील पाडेलींचे काय होणार? आजवर झाडावर चढून नारळ काढणाऱ्या पाडेलींची जागा उद्या यंत्रे घेणार असतील, तर त्यांच्या रोजगाराचे नारळ कोण फोडणार? रोबोटला ना माडाची भीती, ना मजुरीची मागणी! पण माडाखाली उभे राहून नारळ पडण्याची वाट पाहणाऱ्या माणसांचे काय? तंत्रज्ञानाने नारळ उतरतील; मात्र पाडेलींच्या संसाराचा ताळमेळ कोण घालणार, हा प्रश्न कायमच राहणार! ∙
अर्धशतक होणार नाही!
पणजी महानगरपालिकेची बुधवारी सर्वसाधारण बैठक झाली. महानगरपालिकेच्या मासिक बैठका नियमितपणे होत नाहीत. दोन-तीन महिन्यांनी होणारी ही बैठकही त्याच मालिकेतील होती. या बैठकीत महापौरांनी दिलेली माहिती पणजीकरांना नक्कीच विचार करायला लावणारी आहे. पणजी शहरात सुमारे ४० स्पा असून, आता महानगरपालिका नव्या स्पांना परवानगी देणार नाही, असे महापौरांनी जाहीर केले. म्हणजेच स्पांचे अर्धशतक पूर्ण होऊ देणार नाही, असेच म्हणावे लागेल. मात्र, बघता बघता शहरात ४० स्पा कसे उभे राहिले, हा प्रश्न जागरूक नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही. सध्या शहरातील गल्लीबोळांतही स्पा नजरेस पडू लागले आहेत. त्यामुळे पणजीत उशिरापर्यंत पर्यटक आणि त्यांच्या गाड्या दिसू लागल्या आहेत, ही बाबही दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
पर्यटकाची दादागिरी
पणजी पोलिसांना गुरुवारी एका वेगळ्याच पर्यटकाचा सामना करावा लागला. पोलिस मुख्यालयासमोर एका महिला पर्यटकाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तिने अपशब्दांचाही वापर केला. तिला रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसांनाही या पर्यटकाने लाथांनी मारहाण केली. अखेरीस तिची वरात पोलिस ठाण्यात नेण्यात आली. ‘अतिथी देवो भव!’ म्हणणाऱ्या राज्यात अशा मुजोर पर्यटकांशी वागावे तरी कसे, असा प्रश्न या घटनेनिमित्ताने समोर आला आहे.
विश्वनाथ दळवींचा ‘दांडिया’
रविवारपासून (ता. ११) नवरात्रोत्सव सुरू होणार असल्याने सर्वत्र ‘दांडिया-गरब्या’चे पेव फुटणार आहे. फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवीही तयारीला लागले आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेले कित्येक संच सध्या दांडियाची नाटकाप्रमाणे तालीम करताना दिसत आहेत. आता प्रत्यक्ष दांडिया सुरू झाल्यावर हे संच काय रंग भरतात, ते कळेलच! तसं पाहिलं तर राजकारणही दांडियासारखंच असतं. आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवार असलेल्या दळवींनाही आणखी काही दिवसांनी राजकीय व्यासपीठावर ‘दांडिया’ खेळावा लागणार आहे. ही त्याचीच पूर्वतयारी तर नाही ना? हे आम्ही नाही बोलत हो! फोंड्यातील लोकच बोलत आहेत.
न्यायालयाचा आदेश अन्...
नगरपालिका निवडणुकांचा खेळ आता न्यायालयाच्या मैदानात रंगला आहे. आधी ४ जानेवारीपर्यंत नगरसेवकांनी खुर्च्या सांभाळाव्यात, अशी अपेक्षा; पण प्रभाग फेररचनेची अधिसूचना कायद्याच्या कचाट्यात सापडली आणि सगळे गणितच बदलले. न्यायालयाने अधिसूचना रद्द केली, संबंधितांना वेळ दिला आणि निवडणुकीची अधिसूचना काढण्यासाठी १९ फेब्रुवारीची तारीखही निश्चित केली. त्यामुळे निवडणुका नेमक्या कधी होणार, याची उत्सुकता वाढली आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारविरोधकांच्या गोटात वेगळीच चर्चा सुरू आहे. कायद्याच्या कसोटीवर अधिसूचना बाद झाली, पण राजकीय गणितात सरकारची बाजी पडली का? न्यायालयाचा आदेश काय सांगतो, यापेक्षा त्यातून कोणाला राजकीय फायदा झाला, याचीच चर्चा रंगत आहे.
...तर बाणावलीतही तयारी!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार, हे आता काळ्या दगडावरची रेघ बनली आहे. ते दिवसेंदिवस मोठ्या उत्साहाने फिरतही आहेत. गुरुवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना, पक्षाने आदेश दिल्यास बाणावली मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपची पायाभरणी कार्यकर्त्यांच्या जोरावर झाली असून, ती हलवणे कुणालाही शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दामू नाईक यांची सध्याची देहबोली पाहता फातोर्डा मतदारसंघ त्यांनी केव्हाच जिंकला आहे, असेच वाटावे. त्यामुळे विरोधक काही प्रमाणात बॅकफूटवर आले आहेत आणि त्यातूनच नव्या आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, असे भाजपचे कार्यकर्ते आता बोलू लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.