कुडतरीत भाजपची शरणागती?
सदानंद तानावडे जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा कुडतरी मतदारसंघात भाजपचे कार्यक्रम जोमात चालू होते. आता तुम्ही म्हणू शकाल कुडतरी आणि भाजपा यांचा ताळमेळ कसा बसू शकतो? पण तरीही अँथनी बार्बोझा आणि डॉ. स्नेहा भागवत यांनी आपल्यापरीने काम करून कुडतरी मतदारसंघातही भाजपा जिवंत ठेवली होती. आता दामू नाईक हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सांगायचे झाल्यास ते कुडतरी मतदारसंघाचे प्रभारीही आहेत. पण हल्लीच्या दिवसांत भाजपचे कुडतरी मतदारसंघातील काम एवढे थंडावले आहे की, या मतदारसंघात भाजप नावापुरता तरी शिल्लक आहे का, असा कुणाला प्रश्न पडावा. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड याना आता अँथनी, स्नेहा आदी शरण गेलेत की, भाजप नेत्यांनी त्यांच्याशी सेटिंग केले आहे म्हणून असे होत आहे? याचे उत्तर कुणी देईल का?
‘ओंकार’ला पळवा!
काही काळापूर्वी रवी पात्रांव हयात असताना ओंकार हत्ती गोव्यात दाखल झाला होता. त्यावेळी रवी पात्रांव कृषिमंत्रीही होते, त्यांनी ओंकार हे गणेशाचेच रुप असून तो गोव्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच आला आहे, त्याचं दर्शन घ्या!, असा सल्ला दिला होता. ‘ओंकार’मुळे सरकारला सुबुद्धी होईल, अन् शेतकऱ्यांना चांगली मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण आत्ता ओंकारमुळे त्रस्त शेतकऱ्यांना सरकारची कोणतीच मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी ‘ओंकारला पळवा’, आमच्या हद्दीत नकोच, अशी आर्त हाक सरकारला देत आहेत त्याचं काय?
नाल्यानंतर तळीतही मासे मृत
बेतोडाहून फोंडा मार्गे कवळेला जाणाऱ्या नाल्यात अधूनमधून मासे मृत होण्याचा प्रकार घडत आहे. बेतोडा येथील मद्यनिर्मिती प्रकल्पातून टाकाऊ घातक रसायन या नाल्यात सोडले जात असल्याने त्यामुळे हे मासे मरतात, असा स्थानिकांचा दावा. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेकदा साकडे घातले, पण नेमका प्रकार काय तो स्थानिकांच्या लक्षात आलेला नाही. मात्र या प्रदूषणामुळे हा नालाच धोकादायक ठरला आहे. बेतोडा नाल्याचे ठीक आहे हो, पण आता कपिलेश्वरी तळीतही मासे मृत झाल्यामुळे इथे कुठले घातक रसायन आले, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. आता एक मात्र खरे, या तळीच्या जवळ आणि पृष्ठभागावर बॉंबसदृष्य कानठळ्या बसवणारे मोठे फटाके फोडण्यात आल्यामुळे त्याचाच हा परिणाम असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता खरी परीक्षा आहे ती प्रदूषण नियंत्रण मंडळाची, त्यांनी त्याची दखल घ्यायलाच हवी, असे लोकच बोलताहेत.
उत्सर्जन आणि प्रदूषण
१९१ ग्रामपंचायतींचा समावेश असलेला ‘कार्बन प्रोफाइल’ (कार्बनविषयक माहितीचा तपशील) गोव्यात तयार होत आहे. यासाठी राज्य सरकार स्थानिक पातळीवर उत्सर्जन आणि कार्बन शोषून घेण्याचे प्रमाण मोजण्यासाठी एक डिजिटल साधन सुरू करणार आहे. या माहितीचा उपयोग हवामान बदलाशी संबंधित उपाययोजनांचे नियोजन व देखरेखीसाठी केला जाईल. प्रत्येक पंचायतीकडून मिळणारी ही माहिती कालांतराने एकत्रित करून राज्यासाठी एकच ‘कार्बन प्रोफाइल’ तयार केले जाईल. वेगवेगळं उत्सर्जन व प्रदूषण यांचं ऑडीट व नियमन झालं तर हरीत सुंदर गोव्याचं संवर्धन होईल. गोव्यात इतके विविध उद्योग आले आहेत की हवेचं आणि पर्यायाने मनुष्यांचं स्वास्थ्य कितपत निरोगी राहतं याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. काळे व इतर धूर हवेत इतके दूरदूर जातात की निसर्गाच्या सीमारेषेकडे आपण प्रतारणा तर करत नाही ना असं वाटतं. कारखाने वाढतील तितके उपाय वाढू दे.
खाकीचा भत्ता खिशात, शिस्त मात्र हवेत!
गोवा पोलिसांना दरवर्षी गणवेश भत्त्यापोटी तब्बल १२ हजार रुपये मिळतात, तरीही काही पोलिसांचा पेहराव पाहिला की डोक्याला हात लावायची वेळ येते. कडक इस्त्रीचा गणवेश तर सोडाच, पण बुटांऐवजी चक्क सँडल आणि क्रॉक्स घालून ड्युटी केली जाते. रात्रीच्या गस्तवेळी पोलिसांच्या पायात हमखास चप्पल व सॅंडल पाहायला मिळतात! भर म्हणजे, हातावर आणि मनगटावर खुलेआम गोंदवलेले टॅटू मिरवत अनेक कर्मचारी बिनधास्त वावरताना दिसतात. पोलिस दल म्हणजे शिस्तीचे प्रतीक, पण इथे ड्रेस कोडचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक उरलेला नाही, त्यामुळेच ही अनागोंदी सुरू असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. भत्ता खिशात घालायचा आणि खाकीची शान धुळीस मिळवायची, हा नेमका कुठला कारभार?
नवता अन् परंपरेचा समतोल
नवी पिढी ती ‘जेन झी’ असो की जेन अल्फा, ती संस्कृती परंपरेपासून दूर जात आहेत असा एक टाहो, सूर, गजर चालू असतो. पण प्रत्यक्षात काही गोष्टी अतिशय समाधानकारक आहेत. चतुर्थीला यंदाही आकर्षक माटोळी बांधण्यात युवकांनी जो पुढाकार घेतला तो स्पृहणीय आहे. माटोळीसाठी उत्तेजन द्यायला पुरस्कार वगैरे असतात ती गोष्ट अलाहिदा. पण ही तरूणाई वेगवेगळ्या स्वरूपात, आकृतीबंधात, पर्यावरणस्नेही माटोळी आणि देखावे उभारतात त्याचं कौतुक करायलाच हवं. अशा माटोळी किंवा देखावे इतक्या कलात्मकपणे दशकाआधी होत नव्हते. ही उत्साही कलाकारी, कारागिरी यांना दाद द्यायला हवी. नवतेच्या पुराच्या लाटा उसळूनी येवो. परंपरा त्यात वाहून जाता कामा नये. दोहोंचा तराजूमय समतोल हवा.
दामू इन अॅक्शन...
भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दामू नाईक यांनी पायाला भिंगरीच बांधली असावी. संपूर्ण गोव्याचा कानाकोपरा त्यांनी पिंजून काढला आहे. या वर्षी त्यांच्या घोगळ येथील निवासस्थानी पाच दिवसांचा गणपती होता. मोठ्या जल्लोषात त्यांनी तो साजराही केला. मुख्यमंत्र्यांसह झाडून अन्य मंत्रिगणाने दामूच्या घरी भेट दिली. या गडबडीतही दामूला आपल्या आडपई या मूळ गावचा विसर पडला नाही. पाचव्या दिवशी वेळात वेळ काढून त्यांनी आडपई गाठली व तेथे ते गणरायाच्या पूजेत रममाण झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेवर आणायचे तसेच पुन्हा फातोर्ड्याचा आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न असून, कार्यकर्त्यांना त्यांनी तसा संदेशही पाठवूनही दिला आहे.बघुया दामू सरांची स्वप्ने खरोखरच साकार होतील का ते!
राजेश वेरेकरांची ‘शक्कल’
सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची ‘धूम’ आहे. आणि विधानसभेची निवडणूक जवळ असल्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार या उत्सवाचा प्रचाराकरता वापर करताना दिसत आहे. त्याकरता वेगवेगळे ‘फंडे’चा वापरले जात असल्याचे बघायला मिळत आहे. काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख राजेश वेरेकर हेही यापैकीच एक. परवा फोंड्याच्या बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाच्या गणेश दर्शनाला आलेल्या वेरेकरांच्या बाबतीत याचा प्रत्यय आला. वडील माजी मंत्री शिवदास वेरेकर हे या मंडळाचे सदस्य होते आणि त्यांच्या निधनानंतर आता आपण सदस्य आहोत, असे सांगून त्यांना जसे ‘यश’ मिळवून दिले तसे आपल्यालाही दे, अशी त्यांनी गणरायाकडे प्रार्थना केली. आता कोणते ‘यश’ वेरेकरांना अभिप्रेत आहे हे सांगायला तत्त्ववेत्याची गरज नाही म्हणा. पण तरीही राजकारणाचा उल्लेख न करता केलेली ही मागणी मंडपात चर्चेचा विषय ठरली होती, एवढे मात्र नक्की. आता बघू बाप्पा आपल्या या सदस्याच्या ‘मागणी’ला किती प्रतिसाद देतात ते!
गोव्यातही हवेत विद्यानंद बापट!
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे रस्तोरस्ती जोरजोरात वाजणाऱ्या ‘डीजे’मुळे लेजर लाईट आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निष्पाप गणेश भक्तांना मात्र, कर्णकर्कश आवाजाच्या विघ्नापासून वाचव रे बाप्पा म्हणण्याची वेळ आली आहे. मडगावात तर विसर्जन मिरवणुकीवेळी झालेली आतषबाजी इतकी भीषण होती, त्यात एक आलिशान वाहन भस्मसात झाले. वाहन जळाल्याने झालेले नुकसान मोठे आहे. वाहनमालकाला झालेला मनस्ताप निराळा शिवाय परिसरात राहणाऱ्या लोकांना कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे झालेली हानी त्याहून दांडगी आहे. त्यामुळेच गोव्यातही पुण्याप्रमाणेच कुणीतरी विद्यानंद बापट हवेत, अशी चर्चा जोर धरू लागलीय!
पार्सेकरांची धडपड
तुये पाणी प्रकल्पासह अन्य प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मांद्रेत जीत आरोलकरांना या प्रकल्पांच्या यशाचे श्रेय आपसूकच जाणार, अशी चर्चा आहे. पण पार्सेकर सरांच्या समर्थकांचा दावा आहे, की सरांच्या कार्यकाळात हे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचे श्रेय पार्सेकर सरांनाच जायला हवे. पार्सेकर सरांचीही त्यादृष्टीने धडपड सुरू आहे म्हणे. उगवत्या सूर्याला नमन करणारी जनता, कुणाला झुकते माप देणार, हे येत्या निवडणुकीत दिसेलच नाही का?
‘ते’ खासगी विमान कोणाचे?
काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मोपा विमानतळावर उभे असणारे खासगी विमान कोणाचे? याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. शिवाय या विमानाविषयी माहिती वेळ आल्यानंतर सांगू असेही त्यांनी सांगितले होते. पण अजूनही त्या विमानाचे मालक कोण? याचे उत्तर चोडणकरांकडून कधी येणार आहे, याची वाट निश्चित त्यांचे समर्थक आणि विरोधकही पाहत असतील. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि काँग्रेसकडून गोवा रक्षण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आता मतदार फार हुशार झालेत, तेही कधी काय विचारतील हे सांगता येत नाही. कदाचित गोवा रक्षण यात्रेत त्यांनी ज्या विमानाविषयी प्रश्न उपस्थित केले, त्याविषयी कोणी जागृत मतदाराने मालकीविषयी प्रश्न विचारलाच तर हजरजबाबी चोडणकर त्याचे उत्तर तेथे देतील, असे अपेक्षा सध्यातरी धरायला काही हरकत नाही.
काब्रालांचा आक्रमकपणा!
‘सब्र का फल मिठा होता है’ असे म्हटले जाते खरे. मात्र, संयमाचा बांध तुटला की त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. कुडचडे मतदारसंघाचे भाजपाचे आमदार नीलेश काब्राल यांचे पक्षाने मंत्रिपद काढून घेतले. काब्रालने पक्ष निर्णय शिरोधार्थ मानला. काब्राल यांच्या मतदारसंघात भाजपाचे समांतर नेतृत्व फुलवण्यास पक्षाने व पक्ष नेत्यांनी कठोर परिश्रम घेतले तरी काब्राल गप्प राहिले. मात्र, आता पाणी डोक्यावरून जाऊ लागल्याचे कळताच काब्राल उग्र बनले आहेत. भाजपची उमेदवारी नाकारण्याच्या निर्णयापर्यंत काब्राल पोहचले आहेत असे कार्यकर्ते सांगतात. भाजपाने उमेदवारी नाकारण्यापूर्वी स्वतःच काब्राल उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेऊ शकतात असे काब्राल समर्थक सांगतात. याबाबत चर्चा सुरू होती, मात्र दामू नाईक यांच्या भेटीनंतर काब्राल यांनी भूमिका बदलली आणि पक्ष जो निर्णय घेईल तो, मान्य असे असे सांगितले. मात्र, तरीही काब्रालांचा आक्रमकपणा चर्चेत आहे.
नवे-साकोर्ड्यातील परिसर जेव्हा उजळतो तेव्हा...!
साकोर्डा पंचायतीचे पंचसदस्य महादेव शेटकर म्हणजे एक अवलीया माणूसच. एखादे काम करायचे मनात धरले की त्याचा पाठपुरावा करून ते काम झालेच म्हणजे समजा. त्यासाठी सरकार दरबारी कितीही खेपा घालाव्या लागल्या तरी चालतील. अशी ही व्यक्ती. आता हेच बघा. गेली अनेक वर्षे नवे साकोर्डा येथे गणेश विसर्जन स्थळी ना रस्ता ना विजेचे दिवे, त्यामुळे स्थानिकांकडून कसेबसे गणपतींचे विसर्जन केले जायचे. पण या वेळेला महादेव शेटकर यांनी चंग बांधला, कोणत्याही स्थितीत हा परिसर उजळवून टाकायचा. त्यामुळे त्यांनी कामाचा पाठपुरावा केला. स्थानिक आमदार, सरकार, वीजमंत्री आणि वीज खात्याचे अधिकारी सर्वांना साकडे घातले, आणि अखेर गणराया प्रसन्न झाला. सर्वांच्या सहकार्यामुळे नवे साकोर्डा येथे विजेचे दिवे बसवले गेले आणि परिसर प्रकाशमान झाला. येथील रस्त्यालाही चालना मिळाली. शेवटी कामाच्याबाबतीत पाठपुरावा हा महत्त्वाचा असतो, आणि तो महादेव शेटकर यांना पुरेपूर जमतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
आत्मविश्वास दुणावला!
गोवा रक्षण यात्रेची कल्पना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची आहे आणि त्यांना काहीही करून ही यात्रा यशस्वी करायची आहे. त्यासाठी पक्षाचा पूर्ण पाठिंबा त्यांना मिळालाच आहे, शिवाय त्यांच्या घरातूनही इतर सदस्यांनीही म्हणे पाठिंबा दिला आहे. कारण त्यांच्या घरातील चुलत भाऊ व बहीणही या यात्रेच्या दरम्यान काँग्रेस नेते गोव्यात आल्यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उरकणार आहेत. यात्रेतून पक्षाला बळकटी मिळेल आणि लोकसंपर्क वाढेल, असा अंदाज युरी यांना वाटत आहे. यापूर्वी चोडणकर यांनी पदयात्रा काढल्या होत्या, त्याचा अनुभव त्यांना या यात्रेत होणार आहे. त्यामुळे त्यावेळी पक्षाला काहीप्रमाणात यशही पदरी पडले होते, परंतु आता भाजपविरोधी सुप्त वातावरण आहे आणि ते ‘कॅच’ करण्यासाठी हीच संधी आहे, त्यामुळे चोडणकरांचाही आत्मविश्वास दुणावला असून, तेही आयोजनात मागे पडलेले दिसत नाहीत हे विशेष.
दुसऱ्यांचे भांडण, तिसऱ्याला लाभ?
विरोधकांची एकत्र येऊन भाजपला शह द्यावा, अशी लोकांची इच्छा आहे. आप, कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या तिन्ही पक्षांनी एकत्र यावे, अन् येत्या निवडणुकीत राज्यात एक चांगला पर्याय द्यावा, अशी जनभावना आहे. पण तिन्ही विरोधी पक्षांमध्ये सध्या चाललेल्या घडामोडींकडे पाहता काहीच आलबेल नाही, उलट मानापमानाचे नाट्यही घडते आहे, असे दिसते. त्यामुळे भाजपच्या गोटात दुसऱ्यांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, या न्यायाने आनंदाची लहर तर आली नसेल ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.