रस्त्यांतील खड्डे की निवडणुकीची चाहूल?
राज्यातील रस्त्यांच्या अवस्थेवरून उपसभापती जोशुआ डिसोझा आणि मंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळासह सामान्य लोकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे ही नाराजी आपआपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांबाबत व्यक्त झाल्याने चर्चेला आणखी रंग चढला आहे. काहींचे म्हणणे आहे की, लोकांच्या तक्रारी आता थेट त्यांच्या कानावर पोहोचू लागल्या असतील आणि त्यामुळेच हा संताप बाहेर आला असावा. तर काही मिश्कील मंडळी विचारत आहेत की रस्त्यांवरील खड्डे अचानक निर्माण झाले की निवडणुकांची चाहूल लागताच ते अधिक स्पष्ट दिसू लागले? खरे कारण काहीही असो; पण रस्त्यांचा प्रश्न हा आता केवळ विभागीय फाईलपुरता राहिलेला नाही. तो थेट लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे सध्या खड्डे किती आहेत, यापेक्षा कोण नाराज आहे आणि का नाराज आहे, याचीच अधिक चर्चा रंगत आहे!
चर्चिलचा काँग्रेस पुळका!
एरव्ही काँग्रेसपेक्षा भाजपला अधिक जवळ राहणारे चर्चिल आलेमाव यांना आता निवडणूक जवळ आल्यामुळे असेल कदाचित काँग्रेस पक्षाचा पुळका आला असावा. काल एका कार्यक्रमात बोलताना चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेस पक्षाला महासागराची उपमा देताना बारीक सारीक हेलकाव्याने त्यात काही फरक पडणार नाही, असे सांगितले. आपणही या महासागरात डुबकी मारण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले. कदाचित चर्चिल यांना त्यांची कन्या वालंका आलेमाव यांच्यासाठी नावेली मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी पदरात पाडून घ्यायची असेल आणि हे जर जमले नाही तर निदान युतीची उमेदवार म्हणून गोवा फॉरवर्डची उमेदवारी मिळवून घ्यायची असेल. यासाठीच तर ही साखर पेरणी नसेल ना?
सुदिनबाबची कसरत!
मगो पक्षाचे नेते व विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे नेमके काय चालले आहे व सरकार पक्षाची त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे, हे कळणे कठीणच आहे. मगो पक्षाने प्रियोळ, फोंडा, शिरोडा, मडकई या चार मतदारसंघांवर दावा केल्याने भाजपवाले संतापले आहेत. प्रियोळमधून गोविंद गावडे, शिरोड्यातून सुभाष शिरोडकर त्यांच्याविरोधात वक्तव्ये करू
लागले आहेत. एवढेच नव्हे तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे व उपसभापती जोशुवा डिसोझा यांनी वीज खात्यावर टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सुदिननी कॉंग्रेसचे गुणगान सुरू केले आहे. निवडणुका निकट आल्या की सुदिनराव वेगवेगळ्या ठिकाणी चाचपणी करीत असतात. आगामी निवडणुकीत युतीसाठी ‘मगो’ आपले दरवाजे कॉंग्रेससाठीही खुले ठेवतात, अशातला तर हा प्रकार नाही ना?
चर्चिल फुटबॉलाचो ‘पाय’
चर्चिल आलेमाव यांचे फुटबॉलप्रती प्रेम वादातीत आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी तर चर्चिल हे गोव्यातील फुटबॉलचा ‘पाय’ म्हणजेच वडील किंवा प्रवर्तक असे म्हटले आहे. फुटबॉलमध्ये चर्चिलनी अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. फुटबॉल खेळाडूंच्या मानधनात भरीव वाढ करण्याचाही निर्णय चर्चिलचा, त्यामुळे आता फुटबॉलपटूंना लाखो रुपये मिळत आहेत, असे विजयबाबनी सांगितले. विजयनी पुढे हेही सांगितले की, चर्चिल राजकारण व फुटबॉलही एकाचप्रकारे खेळले आहेत. त्यांनी राजकारण खिलाडूवृत्तीने घेतले. राजकारणात कुणाचाही त्यांनी रोष ओढवून घेतला नाही. चर्चिलप्रमाणे राजकारण स्पोर्टींगली खेळण्याची गरज आहे, असे विजयबाब म्हणतात. पण नेमके का? व कसे? हे विजयबाबनी स्पष्ट केले नाही.
संघटनेच्या त्या ‘अमर’ खुर्च्या!
ऑल गोवा व्हिलेज पंचायत सेक्रेटरीज असोसिएशनमध्ये सध्या नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न सचिवांनाच पडू लागला आहे. गावोगावी सचिव सरकारी नियम, लोकप्रतिनिधी, आरटीआय अर्ज, जनतेचा रोष आणि न्यायालयीन प्रकरणांचा ताण सांभाळत आहेत; पण त्यांच्या हक्कासाठी लढणारे संघटनेचे नेते मात्र गाढ निद्रेत असल्याची चर्चा आहे. संघटनेच्या स्थापनेपासून काही विशिष्ट चेहरे खुर्च्यांना असे चिकटले आहेत की, फेविकॉल कंपनीने त्यांच्याकडून जाहिरात करून घ्यावी! निवडणुका नाहीत, नवीन नेतृत्व नाही, हिशोब नाही. जणू संघटना ही खासगी मालमत्ताच आहे. सचिवांचे वेतन, सेवा अटी आणि न्यायालयात प्रलंबित प्रश्न याबाबत पाठपुरावा करण्यापेक्षा काहींना सत्ताधाऱ्यांच्या जवळ राहण्यातच अधिक रस असल्याचे बोलले जाते. काम सचिवांनी करायचे, शिव्याही खायच्या आणि श्रेय इतरांनी घ्यायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सचिवांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी ‘जी हुजूर’ संस्कृतीत रमलेले नेतृत्व पाहून अनेक सदस्य आतून वैतागले आहेत. आता सचिवांमध्ये एकच चर्चा ऐकू येते ती अशी की जर नेतृत्व बदलणार नसेल, तर संघटनेच्या कुलपाला नवीन किल्ली तरी लावा ना!
शिवकुमारांच्या शपथविधीला विजय!
कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याशी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची खास दोस्ती अाहे. बुधवारी त्यांच्या झालेल्या शपथविधी सोहळ्याला सरदेसाई यांनी स्वतः उपस्थिती लावली. एवढेच नव्हे तर ते त्यांच्या महनीय व्यक्तींसोबत बसलेले दिसले. यापूर्वी विजय सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवकुमार यांनी त्यांना शुभेच्छा देणारा खास व्हिडिओ संदेश पाठविला होता. या दोन नेत्यांची दोस्ती नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. आता या दोस्तीचा गोव्याला आणि खास विजयला काय राजकीय फायदा होणार, ते मात्र पाहावे लागेल.
विनय यांची ‘गणेश भक्ती’?
माजी खासदार विनय तेंडुलकर हे अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. राजकारणात असूनही त्यांना विरोधक तसे कमीच. हल्ली ते बरेच सक्रिय झालेले दिसत आहेत; पण विशेष म्हणजे त्याचे श्रेय आपल्याकडे न घेता ते मागे झालेल्या गणेश जयंतीला यजमान म्हणून बेतोडा गणेश मंदिरात केलेल्या गणेश पूजेला देतात. हे यजमानपद भूषवल्यापासून आपल्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली असून बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असल्याचे ते उघडपणे सांगताना दिसतात. या गणेश भक्तीवर वा शक्तीवर विसंबूनच कदाचित त्यांनी २०२७ मध्ये आमदार होण्याची खात्री व्यक्त केली असावी, असे वाटते. काही का असेना; पण सध्या तेंडुलकरांची ही ‘गणेश भक्ती’ फोंडा व सावर्डे भागात चर्चेचा विषय ठरला आहे, एवढे मात्र नक्की. ∙∙∙
कारण राजकारण
म्हापसा मतदारसंघात भाजपच्या तिकिटासाठी सध्या मयूर सावकार आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. मयूर सावकार यांनी नुकतेच आपल्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन उरकून घेतले. या उद्घाटनाला सत्ताधारी गोटातील त्यांचे हितचिंतक आणि काही आजी-माजी नगरसेवकांनी आवर्जून हजेरी लावली आणि सावकारांना भरभरून शुभेच्छा दिल्या. काही खास नगरसेवकांच्या उपस्थितीने मयूर सावकार यांचे कार्यालय उघडण्याआधीच उपसभापती जोशुआ यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असणार! आता या आजी-माजी नगरसेवकांची ही हजेरी म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याचा प्रामाणिक हेतू होता, की जोशुआ यांच्याबद्दल मनात साठलेली अस्वस्थता बाहेर काढण्याची संधी? तसेही, आगामी पालिका निवडणुकीत जोशुआ यांच्याकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही, हे आधीच कळून चुकल्यामुळे या नगरसेवकांनी आतापासूनच योग्य ठिकाणी हजेरी लावून आपला राग आणि निष्ठा दोन्ही योग्य पत्त्यावर पोहोचवली आहे, असेच म्हणावे लागेल! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.