

उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातील ममूरा गावात बुधवारी दुपारी पाच मजली निवासी इमारतीला भीषण आग लागून दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग इतकी वेगाने पसरली की काही रहिवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकजण इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फेस-3 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-66 मधील ममूरा गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत स्कूटी चार्जिंग सुरू असताना आग लागली. सुरुवातीला किरकोळ असलेली आग काही क्षणांतच भीषण रूप धारण करत संपूर्ण इमारतीत पसरली. धुराचे मोठे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे आणि इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले. बचावकार्य अद्याप सुरू असून प्रत्येक मजल्याची तपासणी केली जात आहे.
घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन विभागाचे अधिकारी, डीसीपी आणि इतर संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण आणि नुकसानाचा तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार स्कूटी चार्जिंगदरम्यान ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना विद्युत उपकरणे आणि ई-वाहनांची चार्जिंग करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.