युरी व विजय यांच्यात दरी वाढतेय?
एका म्यानमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, असे म्हणतात ते खरे. एकाच उंचीचे दोन नेते एकत्र येणे जरा कठीणच. विजय सरदेसाई व युरी आलेमाव हे जवळजवळ एकाच उंचीचे नेते. दोघांच्या महत्त्वाकांक्षाही जवळजवळ समानच. राजकारणात दोघे एकत्र येणे शक्य आहे का? याचे उत्तर नकारात्मकच मिळणार. युरी आलेमाव व विजय सरदेसाई यांनी दोन वेळा हातात हात धरून ग्रॅण्ड ओपोजिशन अलायन्स स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. युरी आलेमाव यांनी विजय सरदेसाई यांना ‘ज्युदास’ची उपमा दिल्यामुळे दोघांतील दरी रुंदावली होती. पुन्हा विजय व युरी एकत्र येण्याचे संकेत मिळत होते. मात्र, आता युरी आलेमाव यांचे उजवे हात समजले जाणारे कुंकळळी गटाचे युवा नेते ॲड. स्वप्नील देसाई यांनी विजय व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांना तंबू नसलेल्या सर्कसमधील ज्योकर संबोधल्यामुळे युरी व विजय यांच्यातील दरी आणखी वाढणार, हे निश्चित.
शूटिंग नव्हे... प्रत्यक्ष अपघातच
बांबाळी येथे रविवारी झालेला चार वाहनांचा अपघात पाहून अनेकांना क्षणभर एखाद्या ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचा भास झाला. एक चारचाकी थेट दुसऱ्या चारचाकीवर जाऊन अडकली आणि पाहणाऱ्यांच्या तोंडून सहजच, ‘रोहित शेट्टींचे शूटिंग सुरू आहे का?’ असा प्रश्न बाहेर पडला. ‘सिंघम’मधील हवेत उडणाऱ्या गाड्यांची आठवण करून देणारे हे दृश्य प्रत्यक्षात मात्र अंगावर काटा आणणारे होते. सुदैवाने, या थरारक अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, कारने असा ‘जम्प’ नेमका कसा मारला, याचे कोडे अपघात पाहणाऱ्यांपासून वाहतूक खात्यापर्यंत सर्वांनाच पडले आहे. आता या ‘रोहित शेट्टी स्टाइल’ अपघातामागचे खरे कारण काय, ते पोलिस तपासनंतरच कळेल.
आता ‘ताळगाव’ही पोरका
राज्यात फोंड्यापाठोपाठ आता ताळगाव मतदारसंघही पोरका झाला आहे. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे निधन झाल्यानंतर गेले नऊ महिने फोंड्याला लोकप्रतिनिधी मिळाला नाही. त्याचा परिणाम या मतदारसंघातील विकासकामांवर होत असल्याची टीका येथील मतदारांनी यापूर्वीच केली आहे. दुसरीकडे, आता ताळगावच्या आमदार मॅडम जेनिफर यांचे निधन झाल्यामुळे फोंड्याप्रमाणेच हा मतदारसंघही आता पोरका झाला आहे. बाबूश हे या मतदारसंघाकडे सध्या लक्ष देतील, यात शंका नाही. मात्र, मतदारसंघातील लोकांची आपण ‘पोरके झालो’ अशी भावना निश्चितच असेल. त्यातच विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये होणार असल्याची शक्यता असल्याने सरकार घाई करणार नाही, हे निश्चित. यावेळी बाबूश मोन्सेरात हे ताळगावमधून, तर पुत्र रोहित पणजीतून, असे चित्र दिसू शकते.
हरीशचे नाव का नाही?
भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या सचिवपदी फोंडा तालुक्यातील कुर्टीचे झेडपी सदस्य प्रितेश गावकर यांची निवड झाल्याबद्दल फोंडा मतदारसंघात लावलेले अभिनंदनाचे फलक सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. या फलकांवर खांडेपार पंचायतीच्या भाजपच्या सहा पंच सदस्यांची नावे आहेत. मात्र, फोंडा भाजपचे गटप्रमुख तथा याच पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच हरीश नाईक यांचे नाव या फलकांवर दिसत नाही. हरीश हे दिवंगत रवी नाईक यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचे नाव या फलकावरून का वगळले गेले, यावर विविध अँगलने चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या पंचांमधील अंतर्गत गटबाजी याला कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. आता खरे काय ते कळेलच; पण ‘दाल में कुछ काला है’, एवढे मात्र नक्की.
चोडणकरांचा आत्मविश्वास
गिरीश चोडणकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पणजी, ताळगाव, सांत आंद्रे, सांताक्रूझ आणि कुंभारजुवे या पाच मतदारसंघांत विजयाची खात्री रविवारी व्यक्त केली. पणजीत बाबूश मोन्सेरात आणि ताळगावात त्यांच्या कुटुंबीयांचा पराभव होईल, असाही दावा त्यांनी केला. विशेष बाब म्हणजे, पणजी मतदारसंघाचा विचार केला तर येथील काँग्रेस गट कुठे अस्तित्वात आहे, कोण अध्यक्ष आहे, हे अनेकांना माहीत नाही. येथे काँग्रेसची हक्काची पाच हजारांपर्यंत मते आहेत. पणजीतील उमेदवाराबाबत त्यांनी पत्ते उघडले नाहीत. वेळ आल्यावर समजेलच, असे विश्वासपूर्ण वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे काँग्रेसच्या गळाला असा कोणता मासा लागणार आहे, जो तेथे भाजपला टक्कर देईल, याची उत्सुकता वाढली आहे.
गिरीशच्या ‘बर्थडे सेलिब्रेशन’ची उत्सुकता
गिरीश चोडणकर यांचा शनिवारी (ता. २५) वाढदिवस आहे. त्या दिवशी ते वयाची साठावी गाठणार आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष असल्याने आणि विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने गिरीशबाबांच्या या वाढदिवसाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आपला वाढदिवस ते अन्य राजकारण्यांसारखा थाटामाटात साजरा करणार की, दरवर्षीप्रमाणे साध्या पद्धतीने, याकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिलेल्या आहेत. गिरीशबाब मात्र सध्या आपल्या ‘बर्थडे सेलिब्रेशन’बाबत ताकास तूर लागू देत नाहीत. त्यांचे जवळचे समर्थक मात्र, यंदा हा वाढदिवस दणक्यात साजरा करू, असे सांगतात. त्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर टक लावून बसलेल्या इच्छुकांचा सहाजिकच मोठ्या संख्येने समावेश आहे, हे कुणास सांगायची गरज नाही.
‘एनजीपीडीए’ आता कोणाला?
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण होते. त्यांच्या निधनामुळे या प्राधिकरणाचे अध्यक्षपद आता कोणाकडे जाणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. भाजपात अनेकजण या पदासाठी इच्छुक असणार आहेत, यात शंका नाही. यापूर्वी सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही हे पद सांभाळले आहे. त्याशिवाय भाजपात सध्या दोन महिला आमदार असून, त्यापैकी डॉ. दिव्या राणे यांच्याकडे वन विकास महामंडळ, तर आमदार दिलायला लोबो यांच्याकडे गोवा मनोरंजन सोसायटी आहे. या दोन्ही महिला आमदार आपल्याकडे जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत. त्यामुळे भाजप यापदी कोणाची वर्णी लावणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. पण काही इच्छुक या पदासाठीही ‘फिल्डिंग’ लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकारणाची धास्ती...
म्हापसा विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार सध्या सक्रिय झाले आहेत. आपला लोकसंपर्क वाढवण्यासाठी त्यांनी सध्या मतदारांना छत्र्यांचे वाटप करणे आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. मात्र, सावकार यांची ही वाढती सक्रियता विद्यमान लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांच्या डोळ्यात खुपू लागली आहे. सावकार यांच्याकडून कोण-कोण छत्र्या घेत आहेत आणि सध्या त्यांच्यासोबत कोण फिरत आहे, यावर आमदारांच्या समर्थकांकडून बारीक लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘प्रतिशोधाच्या राजकारणा’ला घाबरून अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उघडपणे सावकार यांच्यासोबत वावरण्यास कचरत आहेत. एकीकडे, भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळणार, असा ठाम आत्मविश्वास मयूर सावकार व्यक्त करत असले, तरी मतदारसंघातील राजकीय जाणकारांना मात्र वेगळेच वाटते. गेल्या वेळप्रमाणेच ऐनवेळी जोशुआ डिसोझा पुन्हा एकदा बाजी मारून तिकीट पदरात पाडून घेतील, अशी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. आता या तिकिटाच्या शर्यतीत कोण बाजी मारणार आणि कोणाच्या पदरात निराशा पडणार, हे येणारा काळच ठरवेल.
निष्ठावंत व प्रामाणिक कार्याची पावती
भाजपमध्ये कार्यकर्त्यांना आणि त्यातही निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कार्याची प्रतिष्ठा ही सदैव राखली जाते. त्याचाच प्रत्यय साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीवेळी आला. साखळी नगरपालिका सध्या भाजपच्या झेंड्याखाली व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. यावेळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने नगरपालिकेत नगरसेविका म्हणून असलेल्या सहा महिलांना नगराध्यक्षपदाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्रीही इच्छुक आहेत. दोन जणींना हे पद दिल्यानंतर राहिलेल्या चार नगरसेविकांना हे पद देण्यासाठी विचारविनिमय झाला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी थेट पक्षाशी व आपल्याशी एकनिष्ठ राहिलेल्या विर्डी-साखळीतील अर्जुन कामत यांच्या पत्नी तथा नगरसेविका अंजना कामत यांच्या नावाची निवड केली. या पदावर आपली यावेळी निवड होणार, या आशेने काही नगरसेविका बऱ्याच आशावादी होत्या. परंतु, मुख्यमंत्र्यांनी पक्षनिष्ठेलाच प्राधान्य दिल्याचे अंजना कामत यांच्या निवडीनंतर स्पष्ट झाले.
मग मडगाव मार्केटची दुरुस्ती कधी?
गोंयकारांना मासळीशिवाय चैन पडत नाही. गोव्यात मासळी मोठ्या प्रमाणात मिळते. मात्र, मासळी विक्रीसाठीच्या मार्केटची दुरवस्था झालेली आहे. वास्को मासळी मार्केटबाबतच्या समस्या स्थानिक आमदार दाजी साळकर यांच्यापुढे तेथील मासे विक्रेत्यांनी मांडल्या. पंधरा दिवसांत मार्केटची दुरुस्ती करू, असे आश्वासन देऊन आमदारसाहेब मोकळे झाले. कदाचित ते एवढ्या दिवसांत करूनही देतील, कारण तो त्यांचा मतदारसंघ आहे. मग, मडगावच्या मासळी मार्केटकडे एवढे दुर्लक्ष का? ‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष म्हणून वास्कोच्या आमदारांची मडगावच्या मासळी मार्केटबाबत काही जबाबदारी नाही का? असे प्रश्न मडगावमधील मासे विक्रेते व नागरिक विचारू लागले आहेत. मडगावमधील घाऊक मासळी मार्केटच्या इमारतीलाही कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे. मडगाव मासळी मार्केटच्या दुरुस्तीची जबाबदारी एरव्ही मडगाव व फातोर्डाचे आमदारांनी घ्यायला हवी होती. पण, कुणास ठाऊक, त्यांच्यामध्येही मार्केटच्या दुरुस्तीबाबत अनास्था दिसून येत आहे. असे का?
विजयची ‘कॉपी’ फायद्याची ठरणार?
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई इंग्लंडहून परतताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्टा तत्काळ लंडनमध्ये पोहोचले. विजय यांच्याप्रमाणेच त्यांनीही लंडनमध्ये राहणाऱ्या गोमंतकीयांशी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत युरी आणि एल्टन यांनी सासष्टीतील मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे. या मतदारसंघांत ख्रिस्ती मतदारांची संख्या अधिक असल्याने आणि त्यांचे नातलग लंडनमध्ये स्थायिक असल्याने त्यांच्यामार्फत सासष्टीतील मतदारांवर पकड मिळवण्याचे प्रयत्न युरी आणि एल्टन करीत आहेत. परंतु, विजयची ‘कॉपी’ त्यांना फायद्याची ठरणार की नाही? याचे उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.