Goa Politics Khari Khujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; भाजपावाले गोंयकार नाहीत?

Khari Khujbuj: विरोधासाठी विरोध घातक ठरू शकतो. आपल्या गोव्यात प्रत्येकजण सरकारी प्रकल्पांना विरोध करू लागले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

भाजपावाले गोंयकार नाहीत?

‘गोंयकार’ या शब्दाची व्याख्या आपल्या विरोधी पक्षातील राजकारण्यांनी भाजपा विरोधी मतदार अशी केली असावी. भाजपाला हरविण्यासाठी गोंयकार एकत्र आले पाहिजेत, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी जाहीरपणे सांगितले आहे. ‘आप’, गोवा फॉरवर्ड, आरजी, काँग्रेस हे गोंयकार एकत्र आल्याशिवाय भाजपला हरविणे अशक्य असल्याचे युरी म्हणतात. गोवा फॉरवर्ड पक्ष ही गोंय, गोंयकार, गोंयकारपण आपले ब्रीद वाक्य ठरवितात, आरजी तर ‘गोंयकारचा उजो’ पेटविण्याचा प्रयत्न करतात.आता हे सगळे पाहिल्यावर गोमंतकीयांवर सत्ता चालविणारा भाजप परप्रांतीय, बिगर गोमंतकीय आहे का ? असा प्रश्न आम्ही, नव्हे भाजप समर्थक विचारताहेत.

आता नवा मंत्र, ‘आमका नाका’!

विरोधासाठी विरोध घातक ठरू शकतो. आपल्या गोव्यात प्रत्येकजण सरकारी प्रकल्पांना विरोध करू लागले आहेत. प्रत्येकजण ‘आमका नाका’ म्हणत रस्त्यावर उतरू लागले आहेत.जे घातक असते त्याला प्रखर विरोध व्हायलाच हवाय. मात्र, विद्यापीठाला विरोध, आयआयटी सारख्या शिक्षण संस्थांना विरोध हे मात्र न समजण्यासारखे म्हणावे लागेल. केपे तालुक्यातील बेतुल पठारावरची लाखो चौ. मी.सरकारी जमीन विनावापर पडून आहे. या जमिनीवर ‘एरो स्पोर्ट्स हब’ हा पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प उभारण्याला सरकारने प्राथमिक मान्यता दिली आहे. मात्र, याला स्थानिक ग्रामसभेने विरोध दर्शविला आहे. या जमिनीवर तसे काही उगवत नसले तरी स्थानिक ही जमीन सुपीक असल्याचा दावा करून प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतात. बेतुल भागात खासगी विद्यापीठ आल्यास जनतेचा विरोध नाही. सरकारी प्रकल्पांनाच स्थानिक विरोध का करतात? असा प्रश्न पडणे स्वाभाविक.

अविनाश तयारीत

मडगाव पालिकेची या वर्षी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी अनेक माजी नगरसेवक या खेपेला आपले नशीब आजमावून बघण्यासाठी पुन्हा तयारीला लागले आहेत. यात अविनाश शिरोडकर यांचाही समावेश आहे बरे का. या पूर्वी ते दोनदा प्रभाग १९ मधून नगरसेवक म्हणून जिंकून आले होते. मागच्या खेपेला हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. या प्रभागातून लता पेडणेकर या जिंकून आल्या होत्या. आता या प्रभागात पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी अविनाशबाबाने जय्यत तयारी केली आहे.अनेक सामाजिक संघटनेशी त्यांचा निकटचा संबंध आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांची सर्व मदार आता मडगावच्या बाबावर अवंलबून आहे. कारण उघड आहे. लता मॅडमलाही म्हणे पुन्हा एकदा नगरसेविका बनायचे आहे. शेवटी हे राजकारण आहे. ∙∙∙

आधी मान्‍यता, मग विरोध?

सावर्डे मतदारसंघात बांधण्‍यात येणऱ्या बंधाऱ्याला विरोध करण्‍यासाठी मीराबाग येथील लोक रस्‍त्‍यावर उतरलेले असतानाच जवळच्‍या कुडचडे मतदारसंघात शेळवण आणि खामामळ येथे एका खासगी कंपनीकडून बांधण्‍यात येणाऱ्या जेटींना स्‍थानिकांनी विरोध केला आहे आणि मुख्‍य म्‍हणजे, या विरोधात स्‍थानिक आमदार नीलेश काब्राल यांनीही विरोध दाखविला आहे. मात्र यातील लक्षात घेण्‍यासारखी गोष्‍ट म्‍हणजे, शेळवण येथे जी जेटी बांधली गेली त्‍या जेटीला श्‍‍याम सातार्डेकर हे आमदार असताना मान्‍यता मिळाली होती आणि त्‍यावेळी काब्राल यांना श्‍‍यामचे उजवे हात म्‍हणून ओळखले जायचे. दुसऱ्या शेळवणच्‍या जेटीला काब्राल हे आमदार असताना मान्‍यता मिळाली होती आणि त्‍यावेळी ते पर्यावरणमंत्रीही होते. त्‍यामुळे ज्‍यांनी या जेटींना मान्‍यता दिली तेच आता विरोध करतात पण का?, असा प्रश्‍न कुडचडेतील लोक विचारू लागले आहेत. की निवडणूक जवळ आल्‍याने राजकारण्‍यांचा हा दुटप्‍पीपणा चालू आहे? ∙∙∙

‘केराची टोपली’? की चर्चा?

राज्‍यातील जमीन रुपांतरणावरून माजी न्‍यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्‍यासह आमदार विरेश बोरकरही अधिकच आक्रमक झालेले आहेत. या दोघांनीही टीसीपीचे कलम ३९ ‘अ’ रद्द करण्‍याची मागणी करीत गेल्‍या काही दिवसांपासून सरकारला धारेवर धरले आहे. रिबेलो यांनी याबाबतचे विधेयक तयार करून ते येत्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात मांडण्‍यासाठी विरोधकांना पाठवले आहे. तर, दुसरीकडे आमदार बोरकर यांनी जमीन संरक्षणाचे खासगी विधेयक मांडून, गावांमध्‍ये मेगा प्रकल्‍प रोखण्‍यासाठी पंचायत राज कायद्यात दुरुस्‍ती करण्‍याबाबतचेही विधेयक सादर केलेले आहे. पण, सभागृहात भाजपकडे तब्‍बल ३३ आमदारांचे संख्‍याबळ असल्‍याने ही विधेयके ‘केराच्‍या टोपली’त जाणार की सरकार त्‍यांचा विचार करणार? हे अधिवेशन सुरू झाल्‍यानंतरच स्‍पष्‍ट होणार आहे. ∙∙∙

दामू आव्‍हान स्‍वीकारणार?

नगरनियोजन कायद्याच्‍या (टीसीपी) कलम ३९ ‘अ’ला विरोध करीत रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सचे (आरजीपी) आमदार विरेश बोरकर यांनी छेडलेल्‍या आंदोलनाला राज्‍यभरातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाच्‍या माध्‍यमातून जमिनी राखण्‍यासाठी नागरिक रस्‍त्‍यावर उतरल्‍यानंतर भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी ‘स्‍थानिकांना प्रकल्‍प नको असतील, तर सरकार ते आणणार नाही’, अशी हमी दिली. एकाबाजूला सरकार अनेक प्रकल्‍प जनतेवर रेटण्‍याचा प्रयत्‍न करीत असतानाच दामूंनी असे वक्तव्‍य केल्‍याने भाजप आणि सरकारमध्‍ये ताळमेळ आहे की नाही? असाही प्रश्‍‍न जनतेत निर्माण झालेला आहे. हीच संधी साधत आमदार बोरकर यांनी सोमवारी हिंमत असेल तर टीसीपी मंत्र्यांना जमीन रुपांतरण बंद करण्‍यास सांगण्‍याचे आव्‍हान दामूंना दिलेले आहे. आता बोरकरांचे हे आव्‍हान दामू स्‍वीकारणार की भाजप सरकारने केलेल्‍या विकासकामांचा गवगवा करणार? हे पुढील काहीच दिवसांत समजेल. ∙∙∙

पात्रावांचे ‘दोस्त’ गायब?

दिवंगत पात्राव रवी नाईक यांचा एक खास गुण म्हणजे माणसे जोडणे व त्यातून जनसंपर्क वाढविणे. म्हणूनच तर ते गोव्यातील ‘ऑल टाईम हीट’ राजकीय नेते बनू शकले. त्यांची काही ‘खास माणसे’ असायची. त्यांना रवींचा माणूस म्हणून फोंड्यातच नव्हे. तर गोवा भर ओळखले जात असे. या व्यक्ती राजकारणाबरोबर इतर कार्यक्रमातही त्यांच्याबरोबर दिसायच्या. शिगमोत्सव हा अशांपैकीच एक. शिगमोत्सवावर तर रवींचे भारी प्रेम. म्हणूनच तर शिमगोत्सव आयोजनाच्या एखाद्या बैठकीला या त्यांच्या ‘खास’ दोस्तांपैकी कोणी गैरहजर राहिला की दुसऱ्या दिवशी फोन करून काल का आला नाहीस, असे विचारून पुढच्या बैठकीला हजर राहण्याची विनंती वजा सूचना करत असत. पण रवीच्या निधनानंतर परवा झालेल्या शिगमोत्सवातील महालसा देवींच्या नमन कार्यक्रमाला पात्रावाचे ते नेहमी दिसणारे ‘दोस्त’ काही दिसले नाहीत. आता ते हेतूपुरस्सर आले नाहीत का, त्यांना बोलावलं गेले नाही, हे कळायला मार्ग नसला तरी कार्यक्रमस्थळी त्यांची अनुपस्थिती व त्या मागची संभाव्य कारणे याबाबत उपस्थितांत खमंग चर्चा सुरू होती, एवढे मात्र नक्की! ∙∙

पाटकरही बेरोजगार?

बेरोजगार कोण? ज्याच्याकडे ‘आय’ म्हणजे ‘इन्कम’ नाही तो. गेल्या आर्थिक वर्षात आपण एक पैसाही कमावला नसल्याचे जाहीर भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले होते. आता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बेरोजगार आहे का? असा प्रश्न काँग्रेस समर्थकांना पडला आहे. ‘इन्कम’ नसताना पाटकर जगतात कसे ? असा प्रश्न पक्ष कार्यकर्त्यांना पडणे स्वाभाविक. आता पाटकरांकडे एक वर्ष ‘आय’ आले नाही तर ते उपाशी पडणार नाहीत, याची माहिती पक्ष कार्यकर्त्यांना असायला हवी. एक मात्र खरे काँग्रेससाठी पाटकरांचा त्याग मोठा आहे. इतरांप्रमाणे ‘मोडलेल्या खुर्साक कोण चेपे काडतात’ म्हणून मागे हटले नाहीत.

बोलण्याच्या लयीत बदल!

महानगरपालिका आमदार बाबूश मोन्सेरात यांचे ३० च्या ३० उमेदवार निवडून आणण्याचे स्वप्न सत्यात उतरणार काय? याचे उत्तर त्यांच्याच पॅनलचे उमेदवार ठामपणे देऊ शकत नाहीत. त्यांच्या पॅनलचे उमेदवार हे स्वतःच्या करिष्म्यावर नव्हे तर ‘बाबूश’ यांच्या करिष्म्यावर निवडून येतात. त्यामुळे त्यांनाच आपण निवडून येऊ की नाही, याची ठामपणे खात्री देता येत नाही. यंदाची निवडणूक त्यांना सोपी जाईल, असे वाटत होते. पण त्यांचे ते स्वप्नच राहिले कारण त्यांचे राजकीय विरोधक उत्पल पर्रीकर यांनी इतर विरोधकांची मोट बांधत ‘आमी पणजेकार’ पॅनल उभे केले. तीसही प्रभागांत उमेदवार देऊन बाबूश यांना सहज सोपी वाटणारी निवडणूक खडतर केली आहे. सध्या त्यांच्या बोलण्यातील लयीत जो परिणाम झाला आहे, तो याच विरोधाचा परिणाम आहे की काय, असे त्यांचेच उमेदवार म्हणत आहेत. ∙∙∙

अखेर सरांना, आमदारांना मुहूर्त मिळाला!

आमच्या आम जनतेचा नशीब, शुभ व अशुभ, मुहूर्त,राहू काळ याच्यावर भारी विश्वास. गोवा क्रीडा खात्याला कुंकळ्ळीत उभारलेल्या क्रिकेट ‘पीच’ च्या उदघाटनाला अखेर मुहूर्त सापडला. सोमवारी क्रीडा मंत्री तवडकर व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांचा हस्ते क्रिकेट ‘पीच’चे उदघाटन करण्यात आले. क्रिकेट ‘पीच’ उभारून दोन महिने पूर्ण झाले तरी क्रीडा मंत्र्यांना उद्‍घाटनास वेळ मिळत नसल्यामुळे ‘पीच’ खुली झाली नव्हती. याच सदरांत या संदर्भात ‘खरी कुजबूज’ प्रकाशित झाली होती. लाखो रुपये खर्चून उभारलेली ‘पीच’ क्रिकेट खेळाडूंना वापरण्यात मिळत नव्हती म्हणून युवक संतप्त झाले होते. शेवटी रमेश सरांना वेळ मिळाला आणि क्रिकेट ‘पीच’ खेळण्यास मिळाली. आता नव्यानेच उभारलेल्या फुटसाल मैदानाचे उद्घाटन कधी होणार ते मात्र बघावे लागेल!

‘फ्रेंड इन नीड''!

गोव्याचे माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व कोकणी संगीतकार सिद्धनाथ बुयांव हे दोघे जिवलग दोस्त. समाजमाध्यमांवर गिरीशरावांवर स्तुतीसुमने उधळण्याची एकही संधी सिद्धनाथ सोडत नाहीत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी म्हणे गिरीशच्या आशीर्वादाने गोव्यात काँग्रेसच्या प्रचाराचे कंत्राट सिद्धनाथना मिळाले होते. परंतु २०२२ मध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या एजन्सींमुळे बुयांव बाजूला राहिले. आता गिरीश यांनी सिद्धनाथ बुयांवना थेट तामिळनाडू- पुदुचेरीत नेले असून, तेथील आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार व इव्हेंट मॅनेजमेंटचे कंत्राट त्यांना दिले आहे, अशी चर्चा मागील कित्येक दिवस काँग्रेस भवनात चालली होती. आज कॉंग्रेसच्या गोवा सह-प्रभारी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी पुदुचेरीचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्ही. वैथीलिंगम यांच्या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहे, त्यात सिद्धनाथ बुयांव दिसल्याने कॉंग्रेसवाल्यांची चर्चा खरी ठरली आहे. यावरून सध्या कॉंग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी ‘अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इनडीड'', अशी बोलकी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

कला क्षेत्रातील रंग आणि डाग

‘ऐसा रंग दे की रंग नाही छूटे’ अशी एक सुप्रसिध्द पंक्ती एका होळी गीतात आहे. कला अकादमीला रंग कमी लागले, डाग जास्त. वस्त्र डागाळावं तसं झालंय. बहुविध रंग आनंद देतात. डाग आस्थापनाच्या चारित्र्याला असे चिकटतात की कोणत्याही यंत्राने कितीही धुतले तरी जाता जात नाहीत. कलेचं वस्त्र खूपच आरसपानी, पारदर्शक असतं. फुलपाखराच्या पंखाला पकडावं तसं त्याला अलवार पकडावं. भकभक, लोभ, मोहग्रस्त दोन अधिकाऱ्यांनी कलेचा गळा घोटत जी झडप घातली त्यानं कला संवर्धन करणाऱ्या पालक संस्थेचं अपरिमित नुकसान झालं. संत मीराबाईनं लिहिलेल्या एका भजनात ‘और कलंक काजल से काली’ म्हटलंय ते भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सार्थपणे सिध्द केलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भूरूपांतरण रोखण्‍यास संघटित व्‍हा! आपल्‍या विधेयकांना जनतेने पाठिंबा द्यावा, वीरेश बोरकर यांचे आवाहन

Section 39-A protest: 'गोवा पोलिस' आता राजकीय पक्ष बनलाय, कलम '39-अ' आंदोलनावरून अमित पालेकरांचा गंभीर आरोप

Goa Weather: गोव्यात निसर्गाचा 'डबल गेम'! दुपारी अंगाची लाहीलाही तर रात्री हुडहुडी; पाहा हवामान खात्याचा नवा इशारा

Goa Politics: 'आप’च्‍या 'ऑफर'वर अद्याप आपण विचारच केलेला नाही! नावेलीतून वालंका निवडणूक लढविणारच - चर्चिल आलेमाव

IND vs ENG: वानखेडेवर रंगणार भारत-इंग्लंड सेमीफायनलचा थरार; बदला घेण्यासाठी इंग्लिश संघ सज्ज, पाहा संभाव्य 'प्लेइंग 11'

SCROLL FOR NEXT