

मडगाव: आम आदमी पक्षाच्या गाेवा प्रभारी आतिषी आणि अन्य ‘आप’ नेत्यांनी आपली भेट घेऊन आपल्याला राजकीय ऑफर दिल्याची गोष्ट जरी खरी असली तरी मी किंवा माझी कन्या वालंका यांनी ‘आप’च्या या ऑफरवर अद्याप कुठलाही विचार केलेला नाही. आमचा निर्णय आम्ही याेग्यवेळी घेऊ, अशी प्रतिक्रिया बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केली.
चर्चिल आणि आतिषी यांची भेट सध्या दक्षिण गोव्यात एक राजकीय चर्चेचा विषय बनलेला असताना आलेमाव यांनी आपली भूमिका जाहीर केली. बाणावली व नावेली या दोन्ही मतदारसंघात माझ्याबरोबर लोक आहेत.
त्यामुळे फक्त आपच नव्हे तर अन्य पक्षाचे नेतेही मला भेटत आहेत. मात्र आमचा निर्णय याेग्यवेळी आम्ही जाहीर करू, असे जरी असले तरी वालंका आलेमाव यावेळीही कुठल्याही स्थितीत नावेलीतून विधानसभा निवडणूक लढवतील, असे चर्चिल आलेमाव म्हणाले.
बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यावर ‘आप’चे नेते नाराज आहेत म्हणून तुम्हाला ते भेटले आहेत असे विचारले असता, त्यांच्या पक्षात काय चालू आहे हे मला माहीत नाही आणि मला त्यावर बाेलायचेही नाही. मला माझ्या मतदारांवर विश्वास आहे आणि आजवर त्यांच्या जोरावरच मी राजकारण करत आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.